गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२४ नोव्हेंबर २३ शुक्रवार
तेल्हारा नगरपरिषदेच्या गलथान कारभाराबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत असून त्यांच्या कारभाराबद्दल शहर वासियांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून याचीच प्रचिती म्हणून तेल्हारा येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सुईवाल यांनी चक्क तेल्हारा नगरपरिषदेच्या गलथान कारभाराची नगर परिषद स्थापनेपासून तर आजपावेतो असलेला वेगवेगळ्या विकास कामांकरिता प्राप्त निधी व आजपर्यंतचे झालेल्या विकास कामांच्या खर्चाचे व नगरपरिषद कार्यालयामध्ये जमा झालेला निधी या संपूर्ण निधीचे उच्चस्तरीय सीएजी ऑडिट करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गोकुलचंदजी सुईवाल यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे नुकतीच केली आहे.
तेल्हारा नगरपरिषदेचा भोंगळ कारभारात दिवसेंदिवस वाढ होत असून शहरवासीयांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे यात अधिकारी वर्ग केवळ कागदोपत्री कामे दाखवून लाखो रुपयांचा मलिदा मारीत असल्याची चर्चा शहरामध्ये चर्चिली जात आहे परिणामी शहराचा विकास कमी व अधिकारी व कर्मचारी यांचा विकास जास्त झाला असल्याची परिस्थिती सद्या तेल्हारा शहरवासीयांना पाहायला मिळत आहे.सदरहू तेल्हारा नगर परिषदेच्या स्थापनेपासून तर आजपावेतो मंजूर निधी व वेगवेगळ्या कामावर खर्ची करण्यात आलेल्या निधीचे उच्चस्तरीय सीएजी ऑडिट करण्यात यावे अशी मागणी नरेंद्र सुईवाल यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना दिलेल्या लेखी अर्जाद्वारे केली आहे.
सदरहू नरेंद्र सुईवाल यांच्या विनंती अर्जावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.