नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ नोव्हेंबर २३ शुक्रवार
राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार ! अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली असून महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दि.२४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी नागपुरात प्रसार माध्यम प्रतिनिधिंशी बोलतांना केला आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की,भाजपाचे मोठे नेतेही ४५० रुपयांमध्ये सिलिंडर देण्याची भाषा करत आहेत.महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही?महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केले आहे का? ही सर्व बनवाबनवी असून उज्ज्वला गॅस योजनेत केवळ २० टक्के सिलिंडर रिफील केली जात असून ही योजना फेल गेली आहे.उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजपा सरकारने बंद केले आहे.नफा कमावणे हे सरकारचे काम नाही परंतु २०१४ पासून सरकार नफा कमावण्याचे काम करत असून जनतेची लूट करून नफा कमावणे हे भयावह असल्याचे नाना पटोले यांनी नमूद केले आहे.