यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ नोव्हेंबर २३ शनिवार
तालुक्यातील डांभुर्णी येथील रहीवासी व सद्या चोपडा येथे वास्तव्यास असलेले निंबाजी सोनवणे यांचे नातू व गोंदिया येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दिनेश निंबाजीराव सोनवणे यांचे चिरंजीव चारुदत्त दिनेश सोनवणे यांनी संघ लोकसेवा आयोग(यूपीएससी) ने घेतलेल्या कम्बाईन डिफेन्स सर्विसेस (CDS)च्या परीक्षेतून ऑल इंडिया रँक ९६ घेतल्याने त्यांची भारतीय स्थलसेनेत लेफ्टनंट परमनंट कमिशन ऑफिसर पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.चारुदत्त पाटील यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल निंबाजी काका सोनवणे आणि दिनेश सोनवणे व चंद्रशेखर सोनवणे परिवाराचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
चारुदत्त पाटील यांनी अगदी दहावीपासून किंबहुना त्याअगोदर पासूनच उराशी बाळगलेले स्वप्न त्याने जिद्दीने,कठोर मेहनतीने व अभ्यासाने पूर्ण केले असून या प्रवासात त्यांना आईवडिलांचा सक्षम पाठिंबा लाभला.त्यांची जिद्द एकच होती आणि ती म्हणजे लेफ्टनंट व्हायचे तेही इंडियन आर्मी मधेच त्यामुळे वायू सेनेची परीक्षा पास होऊनही त्यांनी पुढे मार्गक्रमण केले नाही एवढच नव्हे तर मागच्या वर्षी पूर्वपरीक्षा,मुख्य परीक्षा आणि सर्विस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्यू यशस्वी पूर्ण करून त्यांची निवड झालेली होती मात्र मेडिकलमध्ये डोळ्याच्या अत्यंत छोट्याशा अडचणीमुळे त्याला जॉईन करता आले नव्हते.नाहीतर आतापर्यंत त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असते.परंतु तरीही त्यांनी खचून न जाता पुन्हा तयारी केली आणि यावर्षी विजयश्री अगदी दिमाखात खेचून आणली.चारुदत्त पाटील यांना त्यांच्या पुढील सैनिकी करिअरसाठी आणि आपल्या राष्ट्रभूमीच्या रक्षणासाठी व देशसेवेसाठी प्रचंड शक्ती,साहस आणि यश मिळो अशी प्रार्थना आणि शुभकामना संपूर्ण सोनवणे परिवार व ग्रामस्थ डांभुर्णी,स्वयंदीप प्रतिष्ठान डांभूर्णी,मराठा सेवा संघ जळगाव,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र,स्वराज्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जळगाव,दिनवार्ता समुह आणी सह्याद्री बिल्डर्स जळगाव यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत.