“ज्यादिवशी तू माझ्याविरोधात बोलशील त्यादिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असे राजकारण संविधानाला धरून नाही”- प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशातील छापेमारीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून गेल्या नऊ वर्षात देशातील विविध राजकीय नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली मात्र संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल केला नाही शिवाय संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण न्यायालयात न नेता मध्येच लटकावून ठेवल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी संविधान सन्मान महासभेत बोलतांना केला आहे.
देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,आता हळूहळू जशी सत्ता जात आहे तसा यांचा कार्यक्रमही बदलत आहे.सगळ्याच गोष्टींचा वापर केला जात आहे.आज सकाळपासून किती धाडी पडल्या ते मी बघत होतो.माझ्या माहितीप्रमाणे आज देशभरात सात ठिकाणी धाडी पडल्या मग गेल्या नऊ वर्षात किती ठिकाणी धाडी पडल्या? याचा विचार करा.ज्यांच्यावर धाडी पडल्या त्यांची चौकशी झाली पण त्यांना न्यायालयात उभे केले नाही त्यांना लटकावत ठेवले आहे हे लटकावत ठेवण्याचे राजकारण आहे त्यांना देशात भीती निर्माण करण्याची असून तुम्ही आमच्या विरोधात जाणार असाल तर आम्ही छापेमारी करू आणि तुम्हाला तुरुंगात पाठवू अशा धमक्या देऊन येथील व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर आपण या देशाचे मालक आहोत आणि ज्याला निवडून दिले असून तो आपला नोकर आहे एवढे लक्षात ठेवा परंतु दुर्दैवाने मालकाने आपले मालकपण सोडले आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे.प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की,उद्या आपण केंद्र सरकारला विचारले पाहिजे तुम्ही ज्यांच्यावर आतापर्यंत धाडी टाकल्या त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत?त्यांना न्यायालयात उभे केले असते तर तो आरोपी आहे किंवा नाही? हे न्यायालयाने सांगितले असते परंतु संबंधितांना न्यायालयात घेऊन जायचे नाही व आपल्याच टेबलवर ऑपरेशन करायला घ्यायचे आणि त्याला सांगायचे जोपर्यंत तू माझ्याविरोधात बोलत नाहीस तोपर्यंत तू जिवंत आहेस.ज्यादिवशी तू माझ्याविरोधात बोलशील त्यादिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असे राजकारण संविधानाला धरून नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केली आहे.