यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ नोव्हेंबर २३ बुधवार
तालुक्यातील यावल-चोपडा महामार्गासह विविध रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असुन यावल ते भुसावळ दरम्यानचा राजोरा फाटा ते अंजाळे गावापर्यतच्या रस्त्यावर जिवघेणे खड्डे निर्माण झाले आहे.यात यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभाराने कळस गाठला असुन या गंभीर विषयाकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांनी त्वरीत लक्ष वेधुन या मार्गावरील रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी असंख्य वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
यावल ते भुसावळकडे जाणारा मार्ग हा गुजरात आणी मध्यप्रदेश या दोन शेजारच्या राज्यांशी जोडणारा व रेल्वेचे जंवशन तसेच मोठी बाजारपेठ असल्याने या मार्गावर नियमित सर्व प्रकारच्या वाहनांची मोठी वर्दळ होत असते.सदरहू यावल ते भुसावळ दरम्यान असलेल्या राजोरा फाटा ते अंजाळे अशा महत्वाच्या मार्गावरील रस्त्याची अत्यंत भयावह करून सोडणारी दरावस्था झाली असुन रस्त्यावर जिव घेणारी मोठे मोठी खड्डे निर्माण झाली आहे.यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याच्या अवस्थेकडे बघण्याची वेळ आहे का? असा संतप्त प्रश्न वाहनधारकांमध्ये व्यक्त होत आहे.यावलच्या सार्वजानिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन एक दोन वर्षात या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून निकृष्ठ प्रतिची थातुरमातुर देखाव्याची दुरुस्ती केली जाते मग काही दिवसांनी हा रस्ता खड्डे पडून त्याच्या जुन्या अवतारात समोर येतो व मग सुरू होते या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांची आपले जिव धोक्यात घालुन वाहन चालविण्याची कसरत करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने वरिष्ठ पातळीवर या रस्त्याची दक्षता घेता त्वरित या मार्गावरील रस्त्याची गुणवत्तापुर्ण चांगल्या प्रकारची दुरूस्ती करावी अशी अपेक्षा असंख्य वाहन धारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.