“लोकांच्या मनात लोकशाहीच्या निर्णयाविरोधात संशय असेल तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे”
संजय राऊत यांची तीन राज्यांतील निकालावरून टिप्पणी
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ डिसेंबर २३ सोमवार
मध्य प्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात भाजपाने अभूतपूर्व मुसंडी मारली असून छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाने सत्तांतर घडवून आणले आहे तर मध्यप्रदेशातील दोन दशकाची सत्ता कायम ठेवली आहे मात्र हा विजय भाजपाचा नसून ईव्हीएमचा जनादेश असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला आहे.
संजय राऊत म्हणाले की,चार राज्यांचे निकाल हातात आले असून निकाल आश्चर्यकारक आणि अनपेक्षित असले तरीही आम्ही लोकशाही मानणारे आहोत.लोकशाहीत लागलेला निकाल आमच्या विरोधात गेला तरी तो जनादेश स्वीकारायचा असतो.काल विधानसभा निकालांमध्ये तीन राज्य भाजपा आणि एक राज्य काँग्रेसकडे गेले.मध्य प्रदेशचे निकाल आश्चर्यकारक नाही तर धक्कादायक आहेत.इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत त्यावेळी दिग्विजय सिंग मुंबईत होते त्यांची अशी भूमिका होती की ईव्हीएम संदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा व्हायला हवी कारण हे सगळे संशयास्पद आहे.कपिल सिब्बल,दिग्विजय सिंग यांची भूमिका होती की त्यासंदर्भात ईव्हीएम कसे मॅनेज केले जातात यांचे एक प्रेझेंन्टेशन व्हावे परंतु आम्ही असे कितीही म्हणालो तरी आताचे सरकार त्यावर चर्चा करणार नाही.लोकांच्या मनात लोकशाहीच्या निर्णयाविरोधात संशय असेल तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे.चार राज्यातील जे निकाल लागले आहेत ते ईव्हीएमचा निकाल आहे आणि ते स्वीकारले पाहिजे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.ईव्हीएम आदेशाला जनादेश मानतो. ईव्हीएमवर विश्वास असो वा नसो पण लोक अजूनही धक्क्यात आहेत परंतु ईव्हीएमचा जनादेश आहे.भाजपाला मोठा विजाय प्राप्त झाला आहे. ते जिंकले आहेत तर त्यांचे आम्ही अभिनंदन करू.तेलंगणातील निर्णय महत्त्वपूर्ण आहे.तिथेही मोदी गेले होते.अमित शाहांनी डेरा घातला होता. नड्डा गेले होते परंतु तिथे भाजपाला १० जागाही मिळाल्या नाहीत.राहुल गांधींनी तिथे मोठा प्रचार केला होता त्यामुळे त्यांना यश मिळाले असेही संजय राऊत म्हणाले.