मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच स्वतंत्रपणे आणि अभूतपूर्व असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यानिमित्ताने जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीपुढे भाषणाची संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य भाषणाच्या आधी आपल्यालाही भाषणाची संधी मिळावी यासाठी ठाकरे व शिंदे गटातील नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.नुकतेच शिवसेना नेतेपद बहाल केलेले खासदार अरविंद सावंत,आमदार भास्कर जाधव,उपनेत्या सुषमा अंधारे,माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा शिवसेनेकडून तर गुलाबराव पाटील,रामदास कदम,दीपक केसरकर यांचा शिंदे गटाकडून विचार सुरू असल्याचे समजते.शिवसेनेसाठी पक्षातील सर्वांत मोठ्या बंडानंतरचा पहिला तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे.खरी शिवसेना कोणाची याचा निकाल निवडणूक आयोगाच्या दरबारात लागेलच पण त्याआधी खऱ्या शिवसेनेची ताकद कोणामागे आहे ते दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. आपल्याच मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमावी यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार नियोजन करण्यात आले असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवसेना कशी हिंदुत्वापासून दूर गेली आहे याचा सूर बीकेसीच्या मैदानात तर शिवसेनेशी एकनाथ शिंदे यांनी कशी गद्दारी केली आहे याचा सूर शिवाजी पार्कच्या मैदानात गाजणार आहे.या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हेच प्रमुख आकर्षण असले तरी त्यांच्या आधी दोन्ही बाजूंकडून काही नेत्यांनाही भाषणाची संधी मिळणार आहे.शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांना होणारी गर्दी लाखांच्या घरात असेल.शिवाय या दोन्ही मेळाव्यांची नोंद राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात निश्चितच होणार आहे. त्यामुळे भाषणांच्या यादीत आपले नाव असावे यासाठी दोन्हीकडील नेते इच्छुक असून त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही केल्याचे समजते. शिवसेनेने अलीकडेच अरविंद सावंत,भास्कर जाधव यांना शिवसेना नेतेपद दिले असून त्यांना भाषणाची संधी मिळणार असल्याचे समजते. याशिवाय शिवसेनेत अलीकडेच प्रवेश करणाऱ्या सुषमा अंधारे यांनाही संधी दिली जाईल.याआधी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे व्यासपीठ गाजवणारे रामदास कदम,गुलाबराव पाटील यांना शिंदे गटाकडून संधी दिली जाणार आहे.याशिवाय दीपक केसरकर तसेच इतर एक-दोन जणांचाही या यादीत समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.