“राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांचा राजीनामा”
“सरकारच्या दबावामुळेच मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा”-ठाकरे गटाचा आरोप
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ डिसेंबर २३ मंगळवार
मराठा समाज विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाले असतांना सर्व समाजाचे सर्वेक्षण करण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगात मतभिन्नता असल्यामुळे आता आयोगात घमासान सुरू झाले आहे.कायदेशीर आयोगावर मंत्री दबाव टाकत असून राज्यात या दोन समाजांत तेढ निर्माण झाली आहे.या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक जातीआधारित सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करणे अधिक चांगले आहे.जे समाजातील प्रत्येक घटकाला त्यांची स्वतःची ‘सामाजिक-आर्थिक’ स्थिती ओळखण्यास सक्षम करेल पण राज्य सरकार केवळ मराठा समाजाच्या सर्व्हेसाठी आयोगावर दबाव टाकत आहे यावरून आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता.आता राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे.राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहे.यात अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली.विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतांना याबाबत सरकारने कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही? असा प्रश्न विरोधकांनी केला आहे.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले असून राज्यातले शिंदे-फडणवीस-पवार सरकार आणि प्रशासनाकडून आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप,दबाव यांसह विविध कारणांमुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातील तीन सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे त्यामध्ये आता आयोगाच्या अध्यक्षांची देखील भर पडली आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असतांनाच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.राजीनामा देतांना निरगुडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केल्याची चर्चा सुरू आहे.निरगुडे यांचा राजीनामा ओबीसी मंत्रालयाचे अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी स्वीकारला आहे.
दरम्यान निरगुडे यांच्या राजीनाम्यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.आनंद निरगुडे यांच्यावर राज्य सरकारचा खूप दबाव होता व त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहे असे शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.राऊत यांनी काही वेळापूर्वी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की,राज्य मागासवर्ग आयोग आणि त्याचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता त्यामुळे आधी आयोगातील सदस्यांनी राजीनामे दिले आणि आता अध्यक्षांनीदेखील राजीनामा दिला आहे.खासदार संजय राऊत म्हणाले,आनंद निरगुडे यांनी राजीनामा देऊन आठ दिवस उलटले तरी सरकारने ही गोष्ट जाहीर केली नव्हती यात सरकारकडून कसली लपवाछपवी चालू आहे ते पाहावे लागेल.विशिष्ट प्रकारचा अहवाल देण्यासाठी मागासवर्ग आयोगावर सरकारचा दबाव होता त्यामुळेच आयोगातील सदस्यांसह अध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत.केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाच्या विरोधात भूमिका घेतल्याने राज्य मागासवर्ग आयोगाचे तत्कालीन सदस्य ॲड.बी.एस.किल्लारीकर,प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह इतर सदस्यांना राज्य सरकारने थेट कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तसेच ओबीसींचे आरक्षण रद्द करावे अशी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या खटल्यात राज्य मागासवर्ग आयोगाला पक्षकार करण्यात आले आहे.एक वर्षापूर्वी आयोगाच्या सर्व सदस्यांनी एकमताने एक शपथपत्र तयार केले आहे मात्र राज्याचे महाधिवक्ता शपथपत्र सादर करण्यास नकार देत आहेत असाही जाहीर आरोप प्रा.हाके यांनी केला आहे.एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय तापला असून त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचे राजीनामासत्र सुरू आहे.या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष,माजी न्यायाधीश आनंद निरगुडे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या अखेर त्यांनी आपला राजीनामा राज्य सरकारकडे सुपूर्द केला असून राज्य सरकारने तो स्वीकारला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले,राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे.राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहे.अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली.ते पुढे म्हणाले, विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतांना याबाबत सरकारने कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही? सरकारचे नेमके असे चाललय काय? राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य आणि आता अध्यक्ष का राजीनामा देत आहेत याबाबत सरकारने सभागृहात स्पष्टीकरण द्यावे असेही ते म्हणाले.
राज्य सरकार आणि प्रशासनाकडून आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप,दबाव यांसह विविध कारणांमुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे त्यामध्ये आता आयोगाच्या अध्यक्षांची भर पडली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असतांनाच निरगुडे यांनी ही वेळ निवडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.राजीनामा देतांना निरगुडे यांनी देखील विविध आरोप केल्याचे समोर येत आहे.निरगुडे यांचा राजीनामा ओबीसी मंत्रालयाचे अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी स्वीकारला आहे.राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य आणि आता अध्यक्ष का राजीनामा देत आहेत याबाबत सरकारने सभागृहात स्पष्टीकरण द्यावे असे ट्वीट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.सरकारचे नेमके काय चालले आहे याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.