यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ डिसेंबर २३ मंगळवार
अंकलेश्वर तर बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते बर्हाणपूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे नोटिफिकेशन आज दि.१२ डिसेंबर मंगळवार रोजी निघाले असून यात भूसंपादनाची माहिती देण्यात आलेली आहे.परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या सदरील महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुहूर्त अखेर मिळाला असून याबाबतच्या हालचाली भूसंपादन विभागाकडून सुरु करण्यात आल्या आहेत.
या संदर्भातील माहिती अशी की,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अर्थात अंकलेश्वर-बर्हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग असला तरी तो फक्त दुपदरी असून अनेक ठिकाणी तर अतिशय चिंचोळा आहे यातच गेल्या अनेक वर्षांपासून याची अतिशय भयंकर दुर्दशा झालेली असल्यामुळे यावरून ये-जा करणार्या वाहनधारकांची मोठी कसरत होत असते तर यावर झालेल्या अपघातांमध्ये अक्षरश: शेकडो जीव गेलेले आहेत.या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली असली तरी याकडे कुणाचे लक्ष नव्हते.विशेष करून या नॅशनल हायवेवरील चोपडा ते बर्हाणपूरचा भाग हा केळी पट्टा असल्याने केळीच्या वाहतुकीसाठी अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत असल्याने देखील शेतकरी नाराज होते.या पार्श्वभूमीवर आज दि.१२ डिसेंबर मंगळवार रोजी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाची नोटीस जारी केली आहे.या अनुषंगाने चोपडा,यावल,रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील पुढील गावांच्या शिवारातील जमीनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.यात चोपडा तालुक्यातील १) धानोरे प्र.चोपडा,२) गलंगी,३) वेळोदा,४) गलवाडे,५) हातेड खु.,६) हातेड बु.,७) काझीपुरा,८) चहार्डी,९) हिंगोणे,१०) चुंचाळे,११) चोपडा ,अकुलखेडे, १२) चोपडा शहर,१३) खरग,१४) रुखणखेडे प्र.चोपडा,१५) अंबाडे,१६) नारोद,१७) बोरखेडे,१८) माचले,१९) वर्डी, २०) मंगरुळ,२१) अडावद,२२) लोणी,२३) पंचक,२४) धानोरे प्र.अडावद या गावांचा समावेश आहे.तर यावल तालुक्यातील १) चिंचोली,२) कासारखेडे,३) किनगाव,४) किनगाव खु.,५) किनगाव बु.,६) गिरडगाव,७) चुंचाळे,८) वाघोदे,९) साकळी,१०) वढोदा प्र. यावल,) ११) शिरसाड,१२) विरावली बु.,१३) यावल ग्रामिण,१४) यावल शहर,१५) चितोडे,१६) सांगवी बु.,१७)अट्रावल १८)भालोद,१९) हिंगोणे,२०) हंबर्डी,२१) न्हावी प्र. यावल,२२) फैजपूर ग्रामिण,२३) फैजपूर शहर या गावांमधून हायवे जाणार आहे.रावेर तालुक्यातील १) कोचुर खुः,२) रोझोदे,३) बोरखेडे सिम,४) कोचुर बु.,५) वाघोदा बु.६) चिनावल,७) वडगाव,८) निंभोरे बु.९) विवरे खु.,१०) विवरे बु.,११) निंबोल,१२) रेंभोटे,१३) अजंदे,१४) नांदुरखेडे,१५) सांगवे,१६) विटवे,१७) बोहर्डे,१८)निंभोरे सिम,१९) थेरोळे,२०) धुरखेडे या गावांमधून भूसंपादन करण्यात येईल तर मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी,धामंदे,बेलखेडे,नरवेल आणि अंतुर्ली या गावांमधून हायवे जाणार असल्याचे या नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे.सदरहू दि.२४ जानेवारी २०२४ पर्यंत भूसंपादनाची कामे पूर्ण करण्यात येणार असून यानंतर प्रत्यक्षात हायवेच्या कामाला प्रारंभ होणार आहे असे जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.