“याचा अर्थ संसदीय लोकशाहीसंदर्भातली प्रतिष्ठा व रक्षणाबाबत सत्ताधाऱ्यांना यत्किंचितही गांभीर्य नाही”
खासदार निलंबन कारवाईबाबत शरद पवार यांची टीका
देशाच्या राजकारणात सध्या खासदारांचे निलंबन हा मुद्दा प्रचंड चर्चेत असून लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी करून स्मोक कँडलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर त्यावरून विरोधकांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करण्याची मागणी लावून धरली यामुळे मोठा गदारोळ झाला यावर कारवाई म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मिळून आत्तापर्यंत १४१ खासदारांना निलंबित करण्यात आल्याने विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलंबनाच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.तब्बल पाच वेळा उत्तम संसदपटू म्हणून निवड करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे दुसरे खासदार अमोल कोल्हे यांचेही निलंबन करण्यात आले आहे या निलंबनाच्या कारवाईवर शरद पवारांनी टीव्ही ९ ला प्रतिक्रिया देताना हा सगळा सत्तेचा गैरवापर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
काही लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून पास घेऊन सदनात प्रवेश घेतला.प्रेक्षक गॅलरीतून उडी टाकली.विशिष्ट प्रकारचा गॅस फोडायचा प्रयत्न केला.संसदेच्या बाहेरही तसाच प्रयत्न केला ही अतिशय गंभीर बाब होती.५०० पेक्षा जास्त खासदार तिथे बसतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता याची माहिती आम्हाला द्या ही मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केल्यानंतर ही माहिती देण्याची तयारी सत्ताधारी पक्षाची नाही?असे शरद पवार म्हणाले.गृहमंत्र्यांनी सदनात येऊन ते कोण लोक होते? त्यांचा हेतू काय होता? त्यांच्यावर काय कारवाई करणार याची माहिती द्यावी ही मागणी विरोधकांनी केल्यानंतर त्यांच्यावरच कारवाई केली गेली? ही यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांच्यावर कारवाई नाही पण जे घडले त्याची माहिती मागतात म्हणून खासदारांवर ही कारवाई करण्यात आली याचा अर्थ संसदीय लोकशाहीसंदर्भातली प्रतिष्ठा आणि रक्षण याबाबत सत्ताधाऱ्यांना यत्किंचितही गांभीर्य नाही याचे हे उदाहरण आहे अशा शब्दांत शरद पवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. माहिती मागणाऱ्या सदस्यांवर कारवाई केली गेली.सभागृहात आमच्या पक्षाचे हे धोरण नेहमीच राहिले आहे की वेलमध्ये जायचे नाही,नियम तोडायचा नाही.मी ५६ वर्षं राजकारणात आहे पण मी एकदाही कधी मधल्या वेलमध्ये गेलो नाही हे धोरण आम्ही पाळतो असे असतांना अशी कारवाई करणे हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.