पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेना पक्षाची दोन भाग झाल्यामुळे दोन्ही गटांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष होणे स्वाभाविक आहे.पण हे सर्व करताना व त्याचबरोबर दसरा मेळाव्या दरम्यान देखील एक मर्यादा कायम ठेवा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना व शिंदे गटाला दिला आहे.एका पक्षाचे दोन भाग झाल्यामुळे ही स्पर्धा सुरु झाली आहे.दसरा मेळावा त्या सगळ्याचे सूत्र म्हणून आयोजित करण्यात आला आहे.राजकारणात अशा गोष्टी होत असतात यात काही नवीन नाही.संघर्ष होतो पण त्याला मर्यादा असली पाहिजे. ती मर्यादा सोडून काही झाले तर ते चांगले नाही अशी परिस्थिती टाळण्यासाठी माझ्यासकट राज्यातील जबाबदार नेत्यांनी वातावरण नीट करण्यासाठी पावले टाकली पाहिजेत असे मत शरद पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केले आहे.
यावेळी शरद पवार यांनी जेष्ठत्वाच्या नात्याने शिवसेना आणि शिंदे गटाला एक सल्ला दिला आहे.मुख्यमंत्री हे फक्त पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेचे प्रमुख असतात त्यामुळे त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे.दसरा मेळावा जरूर घ्यावा पण यावेळी वातावरणात कटुता निर्माण होईल अशी मांडणी भाषणांमधून होता कामा नये अशी अपेक्षा दोन्ही बाजूंकडून आहे असे शरद पवार यांनी सांगितले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मदत करत असल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही.दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. या सगळ्या गोष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.अंधेरी पूर्व जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे यानिवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत सामना होणार आहे.आपला पाठिंबा कुणाला?या पत्रकारांच्या प्रश्नांवर क्षणाचाही विलंब न लावता राष्ट्रवादीची ताकद आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे उभी करु असे उत्तर शरद पवार यांनी दिले.महिनाभरावर आलेल्या निवडणुकीत अंधेरीपूर्व जागेवर आम्ही शिवसेनेला सहकार्य करु अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.