“आम्हाला गोळ्या घातल्या,हाणले तरीही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही ! “- मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा
जालना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ डिसेंबर २३ बुधवार
मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल?ते आम्ही गुरुवारी सांगणार आहोत असे आज मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले असून सदरील लढा हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे आणि तो सुरुच राहिल असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा आणि कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडले आहेत व असे असतांना आम्हाला त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या फुफाट्यात कशाला ढकलत आहात? असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.आम्हाला जे आरक्षण दिले जाईल असे सांगितले जात आहे ते टिकणार आहे का? आम्ही ते नाकारले नाही आम्हाला सगळ मान्य आहे मात्र सरकारने सांगावे की ते टिकणार का? तसे होणार असेल तर आम्ही ते घ्यायला तयार आहोत.आमची भूमिका मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे अशी आहे.आमच्या हक्काचे ते आरक्षण आहे आणि आम्हाला ते मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे.जे हक्काचे आहे तेच आम्ही मागतो आहे असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.विखे पाटील वगैरे नेत्यांनी आमच्याबद्दल मागून बोलू नये.धरसोड मी नाही तर त्यांनी केली त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांची बैठक घेतली का? हे त्यांना विचारा.सरकार म्हणत आहे की आरक्षण २० जानेवारीपर्यंत आरक्षण देईल त्यामुळेच आम्ही आंदोलनाची दिशा ठरवली आहे जर सरकार २० तारखेच्या आत आरक्षण देणार असेल तर आम्हाला काहीही हौस नाही मुंबईला जाण्याची असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
जी गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे ती हीच आहे की आम्हाला आरक्षण द्या.आम्हाला गोळ्या घातल्या,हाणले तरीही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही.आता मुंबईत गेल्यावर आम्ही मागे हटणार नाही.सगळी शक्ती,सगळी ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे व तसे केले नाही तर आमच्या पोरांचे वाटोळ होणार आहे त्यामुळे मराठा समाजाला माझी विनंती आहे की त्यांनी आंदोलनासाठी सज्ज व्हा आणि सावध राहा असे आवाहनही मनोज जरांगेंनी केले आहे.मुंबईतल्या आंदोलनात मराठे मुंग्यांसारखे बाहेर पडेलेले दिसतील.कुणीही घरी बसू नका.आपण बसून राहिलो तर आपल्या मुलांचे हाल होणार आहेत त्यामुळे मुंबईकडे चला असे आवाहन मी तुमच्या माध्यमातून करतो आहे असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.