Just another WordPress site

“मोदींनी मात्र आपल्या पत्नीला सोडले अशी त्यांची ओळख आहे मग ते पूजा कशी काय करू शकतात?”

राम मंदिर उद्दघाटन सोहळ्यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांची टीका

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२८ डिसेंबर २३ गुरुवार

बहुप्रतिक्षित असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण आता जवळ आले असून २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उदघाटनासाठी येत आहेत.नव्या संसद भवनाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका झाली होती.आता राम मंदिराचे उदघाटन करण्यावरून भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी हे गेल्या काही काळापासून भाजपावर आणि विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने टीका करतांना दिसत असून नोटबंदीपासून ते करोना काळात घेतलेल्या काही निर्णयांवर त्यांनी टीका केली आहे.आता राम मंदिराच्या उदघाटनावरून केलेल्या टीकेमुळे ते चर्चेत आहेत.एक्स या सोशल मीडिया साईटवर सकाळी पोस्ट टाकून स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राम भक्तांनी परवानगी कशी दिली?रामाने १४ वर्ष वनवास भोगला,पत्नी सीतेच्या सुटकेसाठी युद्ध केले.मोदींनी मात्र आपल्या पत्नीला सोडले अशी त्यांची ओळख आहे मग ते पूजा कशी काय करू शकतात? सदरील सुब्रमण्यम स्वामींच्या पोस्टवर भाजपा नेत्यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नसली तरी ज्या एक्स सोशल साईटवर त्यांनी सदर पोस्ट टाकली आहे त्याखाली अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.काहींनी म्हटले आहे की,माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान मोदी यांनी तुम्हाला मंत्रिपद दिले नाही याचे मला दुःख वाटले होते मात्र त्या दोघांनी किती योग्य निर्णय घेतला होता हे आता कळत आहे.

२२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन होणार असल्यामुळे संपूर्ण अयोध्या नगरीत लगबग सुरू असून सुमारे आठ हजार जणांना उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व सरसंघचालक मोहन भागवत हे तिघे प्रमुख अतिथी असतील.दरम्यान राम मंदिराच्या तळमजल्यावर रामलल्लाच्या सुमारे पाच फूट उंचीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.या नव्या मूर्तीबरोबर रामलल्लाची आधीची मूर्तीही विराजमान असेल तसेच भरत,लक्ष्मण व शत्रुघ्न यांच्याही पुरातन मूर्ती असतील.मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल तिथे राम व तिघा बंधूंसह सीतामाईची मूर्ती असेल अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे (न्यास) महासचिव चंपत राय यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.