मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ डिसेंबर २३ गुरुवार
राज्यात सध्या महाविकास आघाडी व महायुती अशा दोन प्रमुख आघाड्या पाहायला मिळत असून एकीकडे सत्ताधारी महायुतीकडे मोठे संख्याबळ असतांना दुसरीकडे महाविकास आघाडीनेही पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे.त्याआधी १० जानेवारी रोजी राहुल नार्वेकरांकडून आमदार अपात्रतेसंदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतांनाच महायुतीतील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बच्चू कडू यांच्या घरी चहापानासाठी जाणार असून त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.१० वर्षांपूर्वी विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार इतर ठिकाणी होणार होता तेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते.मी आणि आर.आर.आबा त्यांना भेटायला गेलो तेव्हा शंकरसिंह वस्त्रोद्योग मंत्री होते त्यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केल्यामुळे ती मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली त्याची जाणीव म्हणून आम्ही शरद पवारांना आमंत्रण दिले त्यामुळे ते घरी चहापानासाठी येणार आहेत असे बच्चू कडू म्हणाले.मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला व आता इथून चाललेच आहेत तर घरी या असे आम्ही त्यांना सांगितले असून ते आमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे असे बच्चू कडूंनी नमूद केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडूंनी राज्यातील महायुती सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून नाराजी किंवा प्रसंगी टीका केल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे त्यावर बच्चू कडूंनी यावेळी भूमिका स्पष्ट केली.त्यासाठी सरकारवर टीका-टिप्पणी,नाराजी वगैरे सगळे करण्याची गरज नाही.आम्ही सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहोत जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही.एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नसतील तर मग कदाचित आम्ही तसा निर्णय घेऊ असे थेट आमदार विधान बच्चू कडू यांनी केले आहे.आमचा पक्ष आहे.पक्षाचे भले कुठे होत आहे त्यानुसार विचार केला जाईल. जिथे राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा राजकीय सोबती असेल असे सांगतानाच बच्चू कडूंनी जर सरकारमधून बाहेर पडायची वेळ आलीच तर कोणत्या जागांसाठी आग्रह धरणार याविषयीही भाष्य केले असून आम्ही एक-दोन जागेसाठी काही करणार नाही.केले तर तीन-चार जागा घेऊनच महाविकास आघाडीकडे जाण्याचा विचार करू नाहीतर तसे काही करण्यात अर्थ नाही असे बच्चू कडू यांनी नमूद केले आहे.