बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी पत्रकार दिन विशेष’ !
समाजाला आरसा दाखवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले !!
दि.६ जानेवारी २३ शनिवार
महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला असून महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार असून त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते व जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता.भाषेत गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.६जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला.जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.वृत्तपत्राची संकल्पना त्याकाळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत मात्र ही संकल्पना जशी रुजली तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत.१८३२ मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र १८४० पर्यंत चालले.
जगभरात घडलेली प्रत्येक घटना आपल्याला टिव्ही,वृत्तपत्रातून मिळते.पत्रकार रात्रंदिवस मेहनत करून ती माहिती तूमच्यापर्यंत पोहोचवत असतात त्याच पत्रकारांसाठी जानेवारी महिन्यातील एक दिवस राखून ठेवण्यात आला आहे व तो म्हणजे ६ जानेवारी पत्रकार दिन.६ जानेवारी रोजी ‘दर्पण’ या पहिल्या साफ्ताहिकाची सुरूवात झाली याच दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला व हाच योगायोगाने दर्पनकार बाळशास्त्री जांभेकरांचाही जन्मदिवस आहे त्यांच्या स्मृतीसाठी हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे,इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्चविद्याविभूषित,पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होय.१९व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधकपर काम केले.जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी १८१२ मध्ये कोकणातील पोंभुर्ले या गावात झाला.वडील गंगाधर शास्त्री यांच्या मार्गदर्शनातच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे मुंबईत येऊन त्यांनी सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ यांच्याकडे इंग्रजी आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे संस्कृतचे धडे घेतले.
जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो.ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती परिणामी त्यांच्या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला.दर्पणचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले.त्यावेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते.एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.दर्पणाचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित झाला.इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत.उभ्या मजकुरात एक स्तंभ मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे.मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता.वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती पण समाजमन सुधारण्यासाठी ही एक आयती संधी त्यांना मिळाली होती.वृत्तपत्रात समाजाविरोधात भाष्य करण्याचा पायंडा त्यांनी पाडला पण दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला.दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता.दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते.‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला.यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल.बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले.
१८४० मध्येच त्यांनी ‘दिग्दर्शन’ या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली व या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले.या मासिकातून त्यांनी भूगोल,इतिहास,रसायन शास्त्र,पदार्थ विज्ञान,निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. जांभेकरांचे भाषाज्ञान अफाट होते व त्यांना संस्कृत,मराठी,इंग्रजी आणि हिंदी या भाषा तर येतच होत्या पण, त्याचबरोबर ग्रीक,लॅटिन,फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या.रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो.१८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्र्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते.बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले.महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्वच वर्गातील वृत्तपत्र आणि मासिकांना बाळशास्त्रींनी एक वाट दाखवली.बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले.बाळशास्त्रींचे अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत निधन झाले.