Just another WordPress site

“जाणीवपूर्वक मराठा-ओबीसी वाद कायम राहावा व महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी काही राजकीय पक्ष,समाजमाध्यमे,वाहिन्या आणि अन्य काही मंडळी काम करत आहेत !!”

शंभराव्या नाटय़संमेलनाच्या व्यासपीठावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकीय सद्य:स्थितीवर भाष्य

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.८ जानेवारी २४ सोमवार

महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी काही राजकीय पक्ष,समाजमाध्यमे,वाहिन्या आणि अन्य काही मंडळी काम करत असून त्यातूनच मराठा-ओबीसींसह समाजा-समाजात जाणीवपूर्वक वाद घडविले जात आहेत.एकेकाळी राज्यकर्ता असलेला मराठी समाज मात्र एकमेकांशी भांडत बसला आहे अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शंभराव्या नाटय़संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय सद्य:स्थितीवर भाष्य केले आहे.कलाकार,कलावंत आहेत म्हणून अराजकता दिसत नाही.चित्रपट,मालिका,नाटक,संगीत अशा विविध माध्यमांतून कलाकारांनी मोठे काम केले आहे मात्र कलाकारांनी एकमेकांना मान द्यावा.टोपण नावाने हाका मारू नयेत.कलाकार ज्या पद्धतीने एकमेकांना आवाज देतात एकमेकांची ज्या पद्धतीने नावे घेतात त्यावरून त्यांना कोणीच मान देणार नाही.कलाकारच चुकीच्या पद्धतीने एकमेकांशी बोलत असतील तर त्यांना कोण लक्षात ठेवेल असे सांगत त्यांनी कलाकारांचे कानही टोचले.

शंभराव्या अखिल भारतीय नाटय़संमेलनामध्ये ‘नाटक आणि मी’ या विषयावर राज यांची मुलाखत झाली.दीपक करंजीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.केवळ सुशिक्षित असून चालत नाही तर सुज्ञपणा हवा.महाराष्ट्राला सुज्ञ नागरिकांची गरज आहे त्यादृष्टीने मध्यमवर्गीयांनी राजकारण, समाजकारण आणि विविध संस्थांमध्ये आले पाहिजे मात्र या स्तरावर महाराष्ट्र चाचपडतो आहे.देशासाठी दिशादर्शक असलेल्या महाराष्ट्रासाठी ही बाब योग्य नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.राज ठाकरे म्हणाले की,निवडणूक लढविण्याची लाज वाटते.स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये पहिली निवडणूक झाली,गेल्या ७० वर्षांत पाणी,रस्ते,आरोग्य,शिक्षण याच मुद्दय़ांवर निवडणुका लढविल्या जात आहेत याला प्रगती म्हणता येणार नाही.जातीपातीमध्ये लोकांना अडकविले जात आहे.हे लोण आता नाटक-चित्रपटातही येत आहे.जातीपातीमध्ये आपण एवढे गुंतलो आहोत की आपली संस्कृती,परंपरा आणि आपल्या माध्यमांचा विसर पडला आहे हि मोठी शोचनीय बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.