वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना २० लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा
दिल्ली :- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यात वाढ करण्यात आली असून ती आता १५ लाखावरून २० लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी २४ रोजी विधानसभेत केली.याबाबतचा शासन निर्णय २३ ऑगस्ट २२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
राज्याच्या वनविभागाच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरु असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या द्रुष्टीने जंगला लगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वनविभागामार्फत प्रबोधन करण्यात येत असून डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमार्फत स्थानिक लोकांना जंगलांवर कमी अवलंबून राहण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत.वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात सन २०१९ ते २०२२ या तीन वर्षाच्या काळात २१३ जणांचा मृत्यु झाला आहे.वाघ,बिबट्या,रानडुक्कर,गवा,अस्वल,लांडगा,कोल्हा,हत्ती यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या अर्थसाह्यात वाढ करण्यात आली असून यापुढे १५ लाखाऐवजी २० लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.तर व्यक्ती कायम अपंग झाल्यास ५ लाख व सदरील व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास १ लाख २५ हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणार खर्च देण्यात येणार असुन त्याची मर्यादा २० हजार रुपये इतकी राहील.
तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय,म्हैस,बैल यांचा मृत्यु झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली असुन ६० हजार रुपयांऐवजी ७० हजार रुपये दिली जाणार आहे.मेंढी बकरी व इतर पशुधनाचा मृत्यु झाल्यास झाल्यास १० हजार रुपयांऐवजी १५ हजार रुपये देण्यात येणार आहे.तर गाय,बैल,म्हैस यांना कायमचे अपंगत्त्व आल्यास १० हजारावरून वाढवून १५ हजार व मेंढी बकरी याकरिता ५ हजार रुपये देण्यात येणार आहे.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी व त्यामुळे संबंधित कुटुंबीयांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्या पार्श्वभुमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय फारच महत्वपुर्ण मानला जात आहे.