Just another WordPress site

“आमचे सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही”- उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२९ जानेवारी सोमवार

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापला असतांना अखेर २७ जानेवारी रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सोपवला.राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या विविध मागण्या मान्य केल्या आहेत यानंतर ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे.ओबीसी नेते आणि राज्यातील सत्ताधारी अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात आवाज उठवला आहे तसेच मुख्यमंत्र्यांचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.यावर महायुतीतल्या महत्त्वाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

छगन भुजबळ म्हणाले,मी ओबीसींबाबत माझी भूमिका मांडत राहीन,मला सोबत घ्यायचे की नाही ते पक्षाने आणि महायुतीने ठरवावे.वेळ पडल्यास माझी पक्षातून बाहेर पडण्याची तयारी आहे परंतु मी माझा लढा चालू ठेवेन.यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची भूमिका मांडली आहे.फडणवीस म्हणाले आमचे सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील तीच भूमिका आहे.आम्हाला ओबीसीचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावेच लागेल आणि  मुख्यमंत्र्यांचेही तेच म्हणणे आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,मी राज्याला स्पष्टपणे सांगतो की,भारतीय जनता पार्टी या सरकारमध्ये आहे तोवर काहीही झाले तरी आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.उद्या अशी वेळ आली की आम्हाला ओबीसींना संरक्षण देता येत नाहीये तर मी स्वतः माझ्या वरिष्ठांशी बोलेन व काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि हीच भाजपाची भूमिका आहे.छगन भुजबळांच्या राज्य सरकारवरील नाराजीबाबत विचारल्यावर फडणवीस म्हणाले,माझे त्यांना एवढंच सांगणे आहे की,त्यांनी संयम ठेवावा.मी लवकरच त्यांच्याशी चर्चा करणार आहे.राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर त्यांचे जे काही आक्षेप असतील ते त्यांनी सांगावे. कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर आपण त्यात परिवर्तन करू व आवश्यकता असेल तिथे सुधारणा करू परंतु ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.