“जातीचे प्रश्न ज्या पद्धतीने सरकारने हाताळले त्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळले जात नाहीत”
सरकारला घरचा आहेर देत बच्चू कडू यांनी व्यक्त केली नाराजी
अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० जानेवारी २४ मंगळवार
मराठा आरक्षण आंदोलनात कधी मनोज जरांगे पाटील व सरकारमध्ये मध्यस्थी करतांना तर कधी आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरलेले बच्चू कडू गेल्या काही काळापासून चर्चेत राहिले आहेत.शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अनेकदा बच्चू कडूंनी आपल्याच सरकारविरोधात ठाम भूमिका घेतली आहे.आता पुन्हा एकदा बच्चू कडू याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत आपल्याला सत्तेतून बाहेर काढले तरी त्याची पर्वा नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.बच्चू कडू यांनी यावेळी पंतप्रधान आवास योजनेत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला असून पंतप्रधान आवास योजनेत शहरासाठी अडीच लाख व मागेल त्याला घर दिले जाते.परंतु तीच योजना गावात अटी घालून फक्त सव्वा लाखात दिली जाते असून हा अपमान आहे.आम्ही अशा फाटक्या घराला मोदींचे पोस्टर लावले हा असा अन्याय का? आमची मतांची किंमत सारखीच आहे असे बच्चू कडू म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी बच्चू कडूंनी आपण राज्यात सरकारमध्ये असल्याचा आपल्याला काही फरक पडत नाही असे स्पष्ट केले आहे.लोकशाहीत अशी विषमता निर्माण केली जात असेल तर ती आम्ही स्पष्टपणे मांडू मग आम्हाला तुम्ही सत्तेतून बाहेर काढले तरी चालेल.आम्ही काही त्याची पर्वा करत नाही.मी काही सत्तेत गेलो नव्हतो त्यांचेच फोन मला आले होते त्यामुळे मी त्याचा विचार करत नाही.आमचे दु:ख स्पष्टपणे मांडण्याची आमची भूमिका आहे.बच्चू कडू असा आहे.पटत असेल तर ठेवा नाहीतर नका ठेवू अशा स्पष्ट शब्दांत बच्चू कडूंनी त्यांची भूमिका मांडली आहे. अलिकडेच राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या मान्य केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी राज्य सरकारविषयी केलेले विधान चर्चेत आले आहे.आज कांद्याचे भाव पडले,उसाचे भाव पडले,कापसाला,सोयाबीनला भाव नाही मग असे म्हणायला काही हरकत नाही की ‘आमच्या शेतमालाला कुणीच भाव दिला नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला मत देत नाही’ अशी हिंमत आहे का शेतकऱ्यांमध्ये? तेवढा एक बोर्ड लावायचा.ते म्हणतात ना.. सोन्याचा देव त्याला चोराची भीती,लाकडाचा देव त्याला अग्नीची भीती,राजकारणाचा देव त्याला मतांची भीती.आम्ही मत देणार नाही असे म्हणा.आंदोलन करण्याची गरज नाही.जातीचे प्रश्न ज्या पद्धतीने सरकारने हाताळले त्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळले जात नाहीत अशी नाराजी बच्चू कडूंनी बोलून दाखवली.