“फडणवीस सरकार ब्राह्मण बाबांवर कारवाई करत नाही,फक्त आदिवासी,दलित…”, श्याम मानव यांचा गंभीर आरोप
सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
२००५ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा तयार होत असतांना एक सामाजिक न्याय राज्यमंत्री होते व त्यांनी मला चिडून असे सांगितले की कायद्याचे जे प्रारुप तुम्ही तयार करत आहात त्याने काय होणार आहे? २००५ मध्ये कायदा संमत झाला त्यावेळी मला ते असे म्हणाले की,या कायद्यानुसार तुम्ही आमच्या आदिवासी बाबांवर या कायद्याच्या माध्यमातून कारवाई कराल.गरीब आणि दलितांवर कारवाई कराल.उच्चभ्रू बाबा,ब्राह्मण असलेल्या बाबांवर कारवाई तुम्ही करु शकणार नाही.पोलीस काय किंवा सरकार काय? कुणीही कारवाई करणार नाही असे मला ते म्हणाले होते.मी त्यांना सांगितले कायदा सगळ्यांसाठी समान आहे त्यामुळे असे होणार नाही.उच्चभ्रू असोत,वरच्या जातीमध्ये जन्माला आलेले असतो किंवा खालच्या जातीत जन्माला आलेले असतील त्याने फरक पडणार नाही.मी त्या मंत्र्यांना हे समजावले होते मात्र मी जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारचे कृत्य पाहतो त्यावेळी मला हे म्हणता येते की,जे उच्चभ्रू किंवा ब्राह्मण जातीत जन्माला आले आहेत त्यांच्याविरोधात सरकार कारवाई करत नाही.सर्वसाधारणपणे दलित,आदिवासी जातीत जन्माला जे आले आहेत त्यांच्यावर पोलीस सहजपणे या कायद्याच्या आधारे कारवाई करतात.धीरेंद्रकृष्ण शास्त्री जन्माने ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असा प्रश्न मी आधीही विचारला आहे कारण त्या व्हिडीओत ते ‘हम ब्राह्मण हैं,ये अछूत छूना मत’ असे म्हटल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे.देशात अॅट्रॉसिटी कायदा आहे असे म्हणणारा माणूस महाराष्ट्रात येतो,जादूटोणा विरोधी कायद्याचे व ड्रग्ज रेमेडीज कायद्याचे उल्लंघन करतो तरी सरकार या बाबांवर कारवाई करत नाही असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी केला आहे.
श्याम मानव हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ,हिप्नोथेरपी तज्ज्ञ आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात तसेच त्यांनी स्वसंमोहनाद्वारे व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा घेऊन स्वसंमोहनाचे तंत्र अनेकांना शिकवले आहे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ जानेवारी २४ बुधवार
देवेंद्र फडणवीस सरकार उच्चभ्रू आणि ब्राह्मण जातीच्या बाबांवर कारवाई करत नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केला आहे.कायदा सगळ्यांसाठी समान आहे त्यामुळे खरेतर कारवाई व्हायला हवी मात्र तसे घडत नाही असा गंभीर आरोप श्याम मानव यांनी केला आहे तसेच धीरेंद्रकृष्ण शास्त्री जन्माने ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असाही प्रश्न श्याम मानव यांनी विचारला आहे.