मीनाक्षी पांडव
पोलीस नायक(मुंबई विभाग प्रमुख)
ऑक्टोबर महिना हा सण आणि उत्सवांनी भरलेला आहे.या महिन्यात दुर्गा नवमी व्रत मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी आहे त्याचवेळी नवरात्रीच्या ९ दिवसानंतर दसऱ्याचा सण बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दहाव्या दिवशी येत आहे.याशिवाय दिव्याचा सण दिवाळी सोमवार २४ ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे.सण उत्सव म्हटले की आपले मन हर्ष उल्हासाने भरून जाते.कारण सण उत्सवादरम्यान आपले संपूर्ण कुटूंब एकत्र येत असते.सन २०२२ मधील ऑक्टोबर महिना धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.सप्टेंबर मध्ये पितृपक्षाचा काळ सर्वपित्री अमावस्या समाप्त होऊन नवरात्रोत्सवारंभ झाले आणि ऑक्टोबर महिन्याची सुरवात दसऱ्याने होत आहे.तर याच महिन्यात अनेक महत्त्वाचे सण-उत्सव असतील.चला तर मग जाणून घेऊया ऑक्टोबर महिन्यातील सण-उत्सवांविषयी.
दसरा- चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा.साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो.चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो.विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून वाटली जातात.यंदा बुधवार ०५ ऑक्टोबर २०२२ रोजी दसरा साजरा केला जाईल.
पापांकुशा एकादशी- प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते.अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा वा पापांकुशा एकादशी असे म्हटले जाते.महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते.पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो.पापातून मुक्तता मिळते.यंदा गुरुवार ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी ही एकादशी आहे.
कोजागरी पौर्णिमा,ईद ई मिलाद- कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो.इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते.यंदा ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाईल.यादिवशी कार्तिक स्नानारंभ होते.याच दिवशी वाल्मिकी जयंती देखील आहे.तसेच यंदाच्या वर्षी याच दिवशी ईद ई मिलाद साजरा केला जाईल.
संकष्टी चतुर्थी, करवा चौथ- प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात.दिवाळीच्या आधीची येत असलेल्या संकष्ट चतुर्थीला वेगळे महत्त्व आहे.यावर्षी गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी, करवा चौथ व्रत आहे.
वसुबारस आणि रमा एकादशी- यावर्षी शुक्रवार २१ ऑक्टोबर २०२२ रोजी वसुबारस आणि रमा एकादशी आहे.वसुबारस दिवाळी सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो.वसुबारस हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो.हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान ,पूजा करण्यासाठी ओळखला जातो.’वसु’ म्हणजे गाय आणि ‘बारस’म्हणजे बारावा दिवस म्हणून वसु बारस हा शब्द आहे.वर्षभरातील सर्व एकादशींना श्रीविष्णूंचे पूजन केले जाते.मात्र रमा एकादशीला श्रीविष्णूचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते.रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते.
धनतेरस, किंवा धनत्रयोदशी- ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते.या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला.म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.यावर्षी शनिवार २२ ऑक्टोबर २०२२ रोजी धनत्रयोदशी आहे.याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ पुण्यतिथी देखील आहे.धनत्रयोदशीच्या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणं शुभ मानल जात.या दिवशी यमदीपदान हे व्रतही केल जात.यामध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने दीपदान करण्यात येत.आपल्या घरातील व्यक्तीवर अपमृत्यू किंवा अचानक पणे येणारे मृत्यू असे होऊ नये यासाठी करण्याचे दीपदान म्हणजेच यमदीपदान असते असे सांगितले जाते.
लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा यासाठी धार्मिक कृती करतात.अश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन सण साजरा केला जातो.यावर्षी अश्विन महिन्यातील अमावास्या तिथी सोमवार २४ ऑक्टोबर २०२२ रोजी असून यादिवशी लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी साजरी केली जाईल.दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. अभ्यंगस्नान म्हणजे तेल,उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे.नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.