“भाजपाला ४०० पेक्षा जागा मिळाल्या तर या देशाची राज्यघटना बदलून २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा नव्या राज्यघटनेनुसार केला जाईल” संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती
भाजपाकडून नवी राज्यघटना लिहिण्याचे काम सुरू-शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांची टीका
नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार
भाजपामध्ये जोपर्यंत प्रवेश करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कुठलाही निधी मिळणार नाही हे भारतीय घटनेच्या विरोधात असलेले तत्त्व वापरले जात आहे परिणामी न्यायाचे समान तत्त्व सरकारकडून वापरले जात नाही व नुकताच झालेला प्रजासत्ताक दिन हा बहुतेक शेवटचा प्रजासत्ताक दिन असेल.उद्या जर दुर्दैवाने भाजपाला ईव्हीएमच्या मदतीने ४०० हून अधिक जागा मिळाल्या तर या देशाची राज्यघटना बदलून २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा नव्या राज्यघटनेनुसार केला जाईल व त्यादृष्टीने तयारी सुरू आहे असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.नाशिक येथे पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवार टीका केली आहे.
आजच्या अर्थसंकल्पात नवे काही मिळणार नाही असेही संजय राऊत यांनी सांगितले.अर्थसंकल्पाच्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे त्यानंतर कदाचित अर्थसंकल्पात दोन रूपये कमी करून परत स्वतःचीच पाठ थोपटवून घेतली जाऊ शकते अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.तसेच काल राष्ट्रपती अभिभाषणासाठी संसदेत आल्या असतांना त्यांच्यापुढे सेंगोल घेऊन एक व्यक्ती चालत असल्याचे दिसले याबाबत राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,ही नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी सुरू आहे.उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान एखाद्या धार्मिक मिरवणुकीतूनही संसदेत येऊ शकतात.देश इराणच्या दिशेने वाटचाल करत आहे.इराणमध्ये अयातुल्ला खोमेनी यांनी राज्य केले तसे भारतात ही खोमेनीशाही आणून हा देश ५०० वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.मागच्या ७० वर्षांत ज्ञान,विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेले होते.त्या देशाला मोदी,शहा आणि त्यांचे लोक देशाला अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत.लोकांना हे मान्य असेल तर त्यांनी ते स्वीकारावे.
राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे मात्र ही सुनावणी फार्स असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.शिवसेनेने या फार्सचा अनुभव घेतला आहे.आता राष्ट्रवादीलाही हा अनुभव येईल.शरद पवार स्वतः हयात असतांना तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? हा प्रश्न जर राहुल नार्वेकर यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न घेताच निकाल द्यावा अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.