अ. भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली जळगावी बहिणाबाईंच्या वाड्यास भेट
साने गुरुजींच्या हस्ताक्षरातील छात्रालय दैनिकाचे आकर्षण
साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर
पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार
पूज्य साने गुरुजींनी १०० वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले हस्ताक्षरातील ‘छात्रालय दैनिक’ साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आकर्षण ठरले आहे.विशेष म्हणजे साने गुरुजींनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्यावेळी लिहिलेले दैनिक आजही पाहायला मिळत आहे.जुलै १९२३ मध्ये पूज्य साने गुरुजी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अमळनेरमध्ये आले.महाविद्यालयात शिकत असतांना त्यांच्यातील कलागुण आणि कौशल्य पाहून श्रीमंत प्रताप शेठ यांनी साने गुरुजींना शिक्षकाची नोकरी दिली.१९२४ ते ३० पर्यंत साने गुरुजींनी शिक्षक म्हणून नोकरी केली.शिक्षकाची नोकरी करत असतानाच साने गुरुजीनी विद्यार्थ्यांसाठी छात्रालय दैनिक सुरू केले त्यावेळी विद्यार्थी दैनंदिनी लिहित.त्या दैनंदिनीचा साने गुरुजी अभ्यास करीत नंतर त्याचा सार काढून लिहित ते दैनिक त्यावेळी लोकप्रिय झाले होते.साने गुरुजींनी १०० वर्षांपूर्वी हस्ताक्षरात लिहिलेले दैनिक आजही पाहायला मिळते.१९३० च्या लाहोर अधिवेशनाच्या प्रचारासाठी साने गुरुजींनी अमळनेरमधील शिक्षकाची नोकरी सोडली.साने गुरुजींच्या हस्ताक्षरातील दैनिकाच्या मूळ प्रतीच्या साक्षांकित प्रती आजही प्रताप विद्यालयात उपलब्ध आहेत अशी माहिती मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. रमेश माने यांनी दिली.
१०० हात करताहेत साहित्य नगरीची स्वच्छता
उद्या दि.२ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या साने गुरुजी साहित्य नगरीत संमेलन परिसराच्या स्वच्छतेचे काम गेल्या १५ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे सुपरवायझर हैबतराव पाटील यांनी दिली.साहित्य संमेलन प्रताप महाविद्यालयात होत आहे त्यानुसार मुख्य सभामंडपासह पूर्ण परिसर झाडणे,कचरा उचलून तो ६ घंटागाड्यात टाकून तो निर्धारीत कचरा डेपोत टाकला जात आहे.परिसरात १५ फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.यासाठी अमळनेर,धरणगाव,शेंदुर्णी,चोपडा येथून फिरते शौचालय मागविण्यात आले आहेत.प्रत्येक सभागृहाजवळ दोन फिरते शौचालय ठेवण्यात आले आहेत.या शौचालयाची सकाळी,दुपारी व सायंकाळी अशा तीन वेळा सफाई कर्मचारी स्वच्छता ठेवणे,पाण्याची व्यवस्था करीत आहेत.अमळनेर नगरपरिषदेचे टँकर या शौचालयाना सतत पाणी पुरवणार आहे तर एक व्हॅक्युम क्लिनरही येथे ठेवण्यात आले आहे.
५० कर्मचारी करताहेत स्वच्छता
गेल्या १० दिवसांपासून अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे ५० कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती केली आहे ते २४ तास परिसरात स्वच्छता ठेवत आहेत त्यांच्यावर नियंत्रणासाठी आरोग्य निरीक्षक संतोष संदानशिव,नितीन बिराडे,राम कलोसे हे काम पाहात आहेत.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली जळगावी बहिणाबाईंच्या वाड्यास भेट
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि नामवंत साहित्यिक प्रा.डॉ. रवींद्र शोभणे यांनी बुधवारी सायंकाळी जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ऐतिहासिक वाड्यास भेट दिली त्यांनी बहिणाबाईंच्या कुटुंबियांशी संवाद साधला.प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांचे नागपूर येथून काल सायंकाळी जळगाव येथे आगमन झाले.यानंतर त्यांनी जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात भेट दिली यावेळी कुटुंबियांशी संवाद साधताना ते म्हणाले,खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे कार्य अप्रतिम आहे.सर्वप्रथम बहिणाबाईच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.बहिणाबाईंचे कार्य उल्लेखनीय असल्याचे याप्रसंगी डॉ. शोभणे यांनी सांगितले.बहिणाबाईंच्या संसारोपयोगी वस्तू पाहून ते भारावले यावेळी त्यांनी बहिणाबाईंनी वापरलेल्या व सध्या संग्रहित असलेल्या वस्तू पाहिल्या व या वस्तू पाहून ते रोमहर्षित झाले.यावेळी बहिणाबाई चौधरीच्या नात सून श्रीमती पद्माबाई चौधरी,पणतू देवेश चौधरी,आमदार सुरेश दामू भोळे,माजी महापौर सीमा भोळे,माजी उपमहापौर सुनील खडके या सर्वानी बहिणाबाईंचे पुस्तक व श्रीरामचे मंदिर भेट देऊन डॉ.शोभणे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी स्मिता चौधरी,अनिल खडके,पोलीस पाटील प्रभाकर पाटील,सुनील काळे,विशाल चौधरी,मनोज भांडारकर,विवेक जगताप,योगेश शिंपी,अभिजीत भांडारकर आदी उपस्थित होते.
अमळनेरात आजपासून सारस्वतांची मांदियाळी
अखिल भारतीय मराठी महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्या २ फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी अमळनेरात सुरू होत आहे.या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. साहित्य संमेलनामुळे सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.१९५२ साली साहित्य संमेलन झाल्यानंतर अमळनेरात पुन्हा एकदा ७२ वर्षांनी हे संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होत आहे.साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्य नगरीत तीन सभामंडप उभारण्यात आले आहेत यातील सभामंडप क्रमांक एकमध्ये उद्घाटन समारंभ होईल.याआधी वाडी संस्थानपासून सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल.ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होईल.
सभामंडप क्रमांक १ मधील कार्यक्रम
दि.२ रोजी सकाळी १० वाजता प्रा.उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होईल.सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल.प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी असतील.लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहतील.दुपारी २ वाजता बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल.बालमेळाव्याचे समन्वयक एकनाथ आव्हाड मनोगत व्यक्त करतील.भैय्यासाहेब मगर सूत्रसंचालन करतील.दुपारी ३.३० वाजता राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद होईल.अमरावतीचे डॉ.मनोज तायडे अध्यक्षस्थानी असतील यात मुंबईचे ॲड.धनराज वंजारी,लातूरचे डॉ. ज्ञानदेव राऊत,वाळवा येथील दि.बा.पाटील,बिदर येथील इंदुमती सुतार,धरणगाव येथील प्रा.चत्रभूज पाटील सहभागी होतील.सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रभाकर ज.जोशी करतील.सायंकाळी ५.३० वाजता कविसंमेलन होईल व रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
सभामंडप क्रमांक २ मधील कार्यक्रम
दि.२ रोजी दुपारी २ वाजता परिसंवाद होईल.‘कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे प्रा.अविनाश कोल्हे असतील.दुपारी ३.३० वाजता ‘सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल.छत्रपती संभाजीनगरचे बाबा भांड अध्यक्षस्थानी असतील यात पुणे येथील डॉ.केशव तुपे व अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रमेश माने सहभागी होतील.दुपारी ४.३० वाजता ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ या विषयावर परिसंवाद होईल.सायंकाळी ५.३० वाजता स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल.
सभामंडप क्रमांक ३ मधील कार्यक्रम
दि.२ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कविकट्टा कार्यक्रम होईल.राजन लाखे आणि सहकारी या कविकट्ट्याचे संयोजक आहेत.
संमेलनास उपस्थितीचे आवाहन
२ ते ४ फेब्रुवारी २४ दरम्यान तीन दिवस होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी,उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे,रमेश पवार,कार्यवाह नरेंद्र निकुंभ,शरद सोनवणे,सोमनाथ ब्रह्मे,कोषाध्यक्ष प्रदीप साळवी,कार्यकारी सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे,बन्सीलाल भागवत,स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे,वसुंधरा लांडगे,भैय्यासाहेब मगर,प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी,प्रा.श्याम पवार,प्रा.शीला पाटील,स्वीकृत सदस्य अजय केले,बजरंगलाल अग्रवाल यांनी केले आहे.