Just another WordPress site

राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे-लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार

शिक्षणात मोफत व सक्ती ही क्रांती करणारा राजा सयाजीराव-परिसंवादात सूर

पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर

पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :-

दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार

राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही असे म्हणणे चुकीचे आहे.राजकारणात राहून साहित्य लेखनही करता येते.राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे.उत्तम साहित्य हे चांगला विचार देते यासाठी ग्रंथवाचन केले पाहिजे असे आग्रही विचार लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरद्वारा आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी होते.तर व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,संमेलनाध्यक्ष तथा ग्रांमीण विकासमंत्री गिरीश महाजन,संमेलनाचे संरक्षक तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील,भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे,जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी,संमेलनाचे महाव्यवस्थाप्रमुख बजरंगलाल अगवाल,चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण,जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर,कार्यवाह प्रा.डॉ.उज्ज्वला मेहेंदळे,सचिव राजेंद्र भामरे,कोषाध्यक्ष प्रकाश पागे,समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक,कोषाध्यक्ष नीरज अग्रंवाल,अखिल भारतीय महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते,विलास मानेकर,डॉ.दादा गोरे,डॉ.रामचंद्र काळुंखे,प्रा.किरण सगर,प्रा.मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार,डॉ.गजानन नागरे,पुरुषोत्तम सप्रे,डॉ.विद्या देवधर,कपूर वासनिक,जयंत कुळकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीतील सभामंडप एकमध्ये उद्घाटन करताना सुमित्रा महाजन यांनी व्यासपीठावरील उपस्थितांची सर्वांची नावे न घेता ‌‘सभी मेरे अपने’ असे म्हणून आपल्या भाषणाची सुरुवात केली त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.खान्देशातील मातीला कर्तृत्वाचा सुगंध आहे.पूज्य साने गुरुजी,ना.धों.महानोर यांच्यासारखे कर्तृत्ववान माणसं लाभले आहेत असेही सुमित्र महाजन यांनी स्पष्ट केले.प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.रमेश माने यांनी लिहिलेल्या व उत्तराताई केळकर आणि डॉ.अमोघ जोशी यांनी गायिलेल्या ‌‘माय मराठी नित्य लाविते टिळा’ या गीताने संमेलनाची सुरुवात झाली.मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.

मंत्री अनिल पाटील
पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील म्हणाले,आमचा अमळनेर हा अवर्षणग्रस्त तालुका असताना महामंडळाने साहित्य संमेलन घेण्याचा मान दिला याबद्दल पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आभार मानले.ही संतांची भूमी आहे पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी आहे.जगात पोहोचलेल्या विप्रो कंपनीचे अजिज प्रेमजी,श्रीमंत प्रतापशेठजी यांना विसरुन चालणार नाही.कष्टकऱ्यांना या संमेलनातून पाझर फुटावा अशी अपेक्षाही मंत्री अनिल पाटील यांनी साहित्यिकांकडून व्यक्त केली.यावेळी जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे,राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार स्मिता वाघ,केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ.भरतदादा अमळकर आदी मान्यवर तसेच विविध शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी,शिक्षक,राज्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी,नागरिक उपस्थित होते.संमेलनाचे सहसचिव डिगंबर महाले व मृण्ययी भजक यांनी सूत्रसंचालन केले.उज्ज्वला मेहेंदळे यांनी आभार मानले.
वाचन संस्कृती टिकली पाहिजे -अजित पवार

अलीकडे डिजिटल क्रांतीमुळे वाचन संस्कृती बदलली आहे मात्र वाचन संस्कृती टिकली पाहिजे कारण त्याची गरज आहे असे विचार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ९७ व्या साहित्य संमेलनाला डिजिटल टच देण्यात आला आहे. ‘चॅटबॉट’सारख्या तंत्रनाचा वापर यात खुबीने करण्यात आला आहे अशा शब्दात त्यांनी आयोजकांचे कौतुक देखील केले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरद्वारा आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत होत असलेल्या साहित्य संमेलनाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.साने गुरुजी अमळनेर येथील ज्या तत्त्वज्ञान केंद्रात शिकले असे तत्त्वज्ञान केंद्र राज्यात क्वचितच दिसेल.साहित्य,कला,संस्कृती,क्रीडा यांचे काम मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे.तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडायचे आहे.
साने गुरुजींचे स्मारक उभारणार

साने गुरुजींचे अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात वास्तव्य होते.येथे साने गुरुजींचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे ना.अजित पवार यांनी सांगितले.साने गुरुजींच्या नावाला साजेसे असे स्मारक व्हावे यासाठी राज्य सरकार निधी देईल असेही ते म्हणाले यासाठी प्रस्ताव पाठवावा अशा सूचनादेखील त्यांनी केल्या.

नवी मुंबईत मराठी भाषा भवन -शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील साहित्यिक मुंबईत आल्यानंतर त्यांना राहण्याची अडचण निर्माण होते ही अडचण दूर करण्यासाठी नवी मुंबईत ‌‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येणार आहे असे भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरद्वारा आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत दररोज एक तास वाचनावर भर दिला आहे.मराठी भाषा धोरण महिनाभरात जाहीर करणार आहे असे त्यांनी सांगितले.आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत असताना जगभरातील पालक त्या-त्या ठिकाणच्या मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना दररोज एक तास पाठवतात.महाराष्ट्राबाहेरही बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संमेलनांना २५ लाख रुपये निधी देण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे.मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी युवक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये अनुदानही देण्यात येईल.मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या कळवा असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

शिक्षणात मोफत व सक्ती ही क्रांती करणारा राजा सयाजीराव

वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी राजगादीवर बसणाऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सामाजिक,साहित्यिक,शैक्षणिक व धार्मिक अशा सर्वंच क्षेत्रात भरीव योगदान दिले.शिक्षण मोफत व सक्तीने देण्याची क्रांती करणारे देखील सयाजीराव हे पहिले महाराजा ठरले.आपल्या कार्यकाळात सुमारे ७ हजार ५०० ग्रंथ प्रकाशित करण्याचा विक्रम देखील सयाजीराव गायकवाड यांच्या नावावर होता.आज सयाजीराव यांचे विचार समाजात रुजण्याची आवश्यकता असण्याचा सुर परिसंवादात व्यक्त झाला.अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी कविवर्य ना.धो.महानोर सभागृहात सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान या विषयांवर परिसंवाद पार पडला. परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक बाबा भांड तर परिसंवादात प्रा.तुषार चांदवडकर व प्रा.रमेश माने या वक्तव्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी बोलताना बाबा भांड म्हणाले की,१२ व्या वर्षी राजा झालेल्या सयाजीराव गायकवाड यांनी सहा वर्षांत स्वतःच साक्षर होवून सन १८८० मध्ये अस्पृश्य व आदिवासी यांच्यासाठी प्रथमच सक्तीच्या शिक्षणाचा हुकूम काढून महात्मा फुले यांचे स्वप्न साकार केले.सयाजीरावांनी पुरोहित कायदा केला.त्याकाळात जगात ७ व्या क्रमाकांचे श्रीमंत असलेल्या सयाजीराव यांनी सुमारे ८९ कोटी रूपयांची शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या माध्यमातून समाजाला मदत केल्याचेही बाबा भांड यांनी सांगितले.आजच्या काळात सयाजीराव गायकवाड यांच्या विचाराची गरज विषद केली.
वक्ते तुषार चांदवडकर यांनी साहित्य व भाषा प्रसारातील सयाजीराव यांचे कार्य आपल्या मनोगतातून मांडले तर वक्ते रमेश माणिक यांनी सयाजीरावांनी केलेल्या सामाजिक विकासांचा आढावा घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.