“तृतीयपंथीयांकडे ‘माणुस’ म्हणून पहायला आणि जगवायला हवे”-परिसवांदातील सुर : शासनासोबत आता समाजानेही पुढे यावे
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही-प्रा.डॉ.रवींद्र शोभणे
सानेगुरूजी साहित्य नगरी,प्रताप महाविद्यालय,अमळनेर
पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :-
दि.३ फेब्रुवारी २४ शनिवार
तृतीयपंथीयांकडे नेहमी नकारात्मकतेने पाहिले जाते त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात सामावून घेण्याची गरज आहे व आता त्यादृष्टीने शासनाने पाऊल टाकले आहे.आता समाजानेही तृतीयपथीयांविषयीची नकारात्मक भूमिका आणि भावना सोडून त्यांना मूळ प्रवाहात सामावून घ्यावे. तृतीय पंथीय जगले,प्रवाहात आले तर साहित्यांची निमिर्ती होईल असा सूर आज ९७ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादातून निघाला.कविवर्य ना.धो महानोर सभागृहात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.या परिसंवादाला रसिकांसह मराठी सारस्वतांसह महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.सभागृह श्रोत्यांनी फुल्ल भरले होते.परिसंवादाचे संवादक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.दीपक पवार यांनी काम पाहिले तर यात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे,बिंदुमाधव खिरे,शमिभा पाटील,डॅनियल्ला मॅक्डोन्सा,विजया वसावे,प्रनीत्त गौडा यांनी सहभाग घेतला होता.परिसंवादाची सुरवात करताना डॉ.दीपक पवार यांनी वंचितांपलिकडे असलेल्यांसाठी आजचा हा परिसंवाद घेत त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे दुसरे पाऊल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने केले असल्याचे सांगत साहित्य मंडळाचे अभिनंदन केले.
निवडणूकीच्या पलीकडेचे तृतीयंपथीयांचे प्रश्न : श्रीकांत देशपांडे
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाहीत निवडणूकीस जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्व लोकशाहीतील मूल्यांना आहे.निवडणूकीच्या निमित्ताने तृतीयपंथीयांचा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा हा प्रश्न केवळ निवडणूकीपुरता मर्यादीत नाही तर त्यापलिकडचे अनेक प्रश्न असल् याचे समोर आले.तृतीयंपंथीयांचे जगण्याचे,शिक्षणाचे,आरोग्याचे,नोकरीचे असे अनेक प्रश्न आहेत यांतून वाट काढत आता निवडणूक आयोगाने या तृतीय पंथीयांना कोणतेही कागदपत्रे न घेता मतदार कार्ड वितरीत केले आहे त्यांना रेशनकार्डही देत समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यास सुरवात केली आहे.भाषेच्या साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटते तर समाजात लोकांचे प्रतिबिंब उमटत असल्याचे सांगीतले.
बिंदुमाधव खिरे-तृतीय पंथीय म्हटले की लिंग,लिंगभाव व लैंगिगकता असे विविध विचार मनात डोकावतात परंतु हे तिनही शब्द व त्यांचे अर्थही वेगवेगळे आहे.तृतीयपंथीय हे अचानक आलेले नाहीत जन्मत: त्यांच्या शरीरात बदल होत असतात त्यानुसार मेंदू हा पुरूषाचा तर कधी स्त्रीचा किंवा कधी मेंदू स्त्रीचा तर शरीर पुरूषाचे अशी रचना होत असते अशा शरीररचनेत कोणत्याही उपचाराने बदल करता येत नाही.बिंदुमाधव खिरे म्हणाले की,तृतीयपंथीय समुदायाचे साहित्यातील व समाजातील स्थान समजून घेताना लिंग,लिंगभाव व लैंगिकता या शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत.
पुनीत गौडा म्हणाले की,पारलिंग पुरुष जन्माने स्त्री असतो मात्र मनाने तो पुरुष असतो त्यांचे मन पुरुषाप्रमाणे घडत असते.
डैनियल मॅक्डोन्सा म्हणाल्या की,माणसाला माणसाप्रमाणे वागविण्यासाठी धर्माची गरज पडत नाही.तृतीयपंथीय व्यक्तींचे मन समाजाने समजून घेतले पाहिजेत.
शमिभा पाटील म्हणाल्या की,पारलिंगी समुदायाचे साहित्यात चित्रण जास्त झाले नाही.अण्णा भाऊ साठे यांच्यानंतर अनेक वर्षांचा कालखंडात लिखाण झाले नाही.स्वाती चांदोरकर,दिशा पिंकी शेख,लक्ष्मी,पारू,मदन नाईक,नागा किन्नरी यांनी पारलिंगी समुदायाचे चित्रण त्यांच्या पुस्तके व कवितांतून मांडले आहे.तृतीयपंथीय समुदायाची स्वतःची भाषा असते.तृतीयपंथी समाज आता समाजमाध्यमातून लिहायला लागला आहे. साहित्यविश्वाने आमच्या जगण्याचे प्रश्न मांडले पाहिजेत अशी अपेक्षाही शमिभा पाटील यांनी व्यक्त केली.विजया वसावे यांनी वनरक्षक भरतीत त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन केले.निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो पण लोकशाही शासनव्यवस्था समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून ती रसरशीत होणेही तितकेच महत्त्वाचे असते.या अनुषंगाने मराठी साहित्यात तृतीयपंथी समुदायाचे चित्रण झाले आहे का? ते कशा प्रकारे केले गेले आहे ते करताना लोकशाही,सांविधानिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटले आहे का,त्यांच्यापर्यंत लोकशाही पोहोचली आहे का, ती पोहोचण्यासाठी काय करता येईल अशा विविध प्रश्नांची चर्चा या परिसंवादात करण्यात आली.
साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी- मंत्री गिरीश महाजन
साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी मिळाली असे विचार ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत शुक्रवारपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
साने गुरुजींच्या कर्मभूमीला नमन करून संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ७२ वर्षांनी जळगाव जिल्ह्यास साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहे ही सर्व जळगाववासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.जळगाव जिल्ह्याबरोबरच अमळनेर तालुक्याला साहित्याची परंपरा आहे.पूज्य साने गुरूजीच्या नगरीत होत असलेले भव्यदिव्य होण्यासाठी संमेलनास येणाऱ्या सर्वांना आवश्यक सोईसुविधा पुरविण्यात येत असून त्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस झटत आहेत.साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.साहित्य,संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीला वाहिलेल्या खान्देशची महती मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही -अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही आहे पण एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपण आग्रही असताना मराठी भाषेच्या,मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे असा प्रश्न पडतो असे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी उपस्थित केला आहे.
प्रा.डॉ.रवींद्र शोभणे पुढे म्हणाले साहित्याने काळासोबत चालावे असे म्हटले जाते अर्थात यात दोन प्रकार संभवतात.पहिला म्हणजे अगदी समकालिन,वर्तमानकालिन,वर्तमानकालिन समाजवास्तव रेखाटणारे साहित्य आणि दुसरा प्रकार म्हणजे बदलत्या काळाचा,वर्तमानाचा विचार न करता,मानवी नात्यातील सनातन मूल्ये आपल्या प्रकृतीने मांडणारे लेखन.अर्थात समकालाचे,वर्तमानाचे साहित्यात चित्रण करताना मानवी नात्यातील सनातन मूल्ये येत नाहीत असे कुणीही समजू नये.पण काही लेखक समाजातील बदलांकडे पूर्णत: पाठ फिरवून लेखन करतात अर्थात अशा प्रकारचे लेखन कमअस्सल असते असेही मानता येणार नाही.मराठी साहित्यात नव्या,ताज्या विषयांना मराठी नाटकांनी अधिक प्राधान्याने रसिकांसमोर आणले यात अनिल बर्वे हा नाटककार,कादंबरीकार अग्रेसर होता.
साठोत्तरी प्रवाह : नव्या वाटा
मराठीत साठोत्तरी काळात दलित साहित्याचा मोठा प्रवाह वेगाने आला आणि संपूर्ण जाणकार वाचकांचे,रसिकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. युगानुयुगांपासूनची ठसठसती वेदना,दु:ख त्या साहित्यातून व्यक्त होऊ लागले त्यात व्यक्त होणाऱ्या विद्रोहाने इथल्या पारंपरिक मूल्यांना जबरदस्त हादरे देत हे साहित्य एका दशकाच्या आतच प्रस्थापित झाले.या साहित्याचा अमोघ वेग आणि जीवनानुभव पाहता श्रेष्ठ,भारतीय पातळीवरची महाकादंबरी दलित साहित्यातूनच जन्माला येईल असा विश्वास अनेक जाणकारांनी व्यक्त केला होता पण जवळजवळ ५० वर्षे उलटूनही या अपेक्षा मात्र त्या साहित्याने पूर्ण केल्या नाहीत असे तटस्थपणे विचार करता म्हणावे लागते.काही लक्षवेधी कादंबऱ्या नक्कीच या साहित्याने दिल्या त्या सगळ्यांचा आदराचा विषयही ठरला.
भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न महत्त्वाचे
जागतिकीकरणाने मराठी भाषासुद्धा शिल्लक राहील की नाही अशी भीती वर्तविली जाते.या जागतिकीकरणाने जगाच्या पाठीवरील किती बोली संपल्या आणि किती बोली संपायच्या मार्गावर आहेत याची मोजदाद भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या देशीवादाच्या निबंधात केली आहे. व्यवहाराची भाषा अणि बोलण्याची वेगळी बोली अशी आपल्या बहुतेक समाजाची स्थिती आहे.व्यवहाराच्या भाषेसोबतच उपजीविकेची भाषा अशीही वर्गवारी करावी लागेल.जागतिक बाजारपेठेत तुम्हाला ती भाषा वापरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न अधिक प्रमाणात महत्त्वाचे असतात.जागतिकीकरण आल्यामुळे खरंच आपल्या भाषा संपणार आहेत का? यावर विचार होणे गरजचे आहे.
काही अपवाद सोडला तर बहुतेक मराठी वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या बंद पडलेल्या आहेत.काही आहेत तर त्यात कथा,कविता छापणे बंद झाले आहे.आता कथा-कविता कोण वाचतं? म्हणून वृत्तपत्रांचे मालक प्रश्न विचारतात.बालविभाग बहुतेक बंद झाले आहेत.शाळामहाविद्यालयात एकांकिका,नाटकांचे प्रयोग बंद झाले आहेत तेथे पाश्चात्य धर्तीवरील कार्यक्रमांची रेलचेल असते.ग्रंथालयांची स्थिती आणखीच वाईट आहे याचा संमिश्र परिणाम म्हणून आज मराठी भाषेची,संस्कृतीची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते असेही प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी स्पष्ट केले.
संत शिकवणीतूनच समाज आणि राजकारणाचे काही प्रमाणात शुद्धीकरण शक्य-परिसंवादातील सुर
दिव्यदृष्टी विकसीत करण्यासाठी संतांची मुल्ये स्विकारली तर समाज आणि राजकारण पूर्णपणे शुद्ध करणे शक्य नसले तरी त्याची तिव्रता कमी करता येऊ शकते असा स्पष्ट सूर राजकीय आणि सामाजिक प्रदुषण यावर संत साहित्य हाच उपाय या परिसंवादातील मान्यवरांच्या चर्चेतून निघाला.मुख्य सभागृहातील खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी सभामंडपात राजकीय आणि सामाजिक प्रदुषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.अध्यक्षस्थानी अमरावतीचे डॉ.मनोज तायडे हे होते तर यात ॲड.धनराज वंजारी (मुंबई),डॉ. ज्ञानदेव राऊत (लातूर) दि.बा.पाटील( वाळवा),इंदूमती सुतार (बिदर),प्रा.चत्रभूज पाटील (धरणगाव) यांनी सहभाग घेतला.
सहभागी वक्त्यांनी विविध संतांनी केलेल्या कार्याची आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीची महती सांगितली.संतांनी धर्माचा वापर समाज कल्याणासाठी करण्याचे सांगत धर्मभेद,जाती भेद नष्ट करण्याचे व सर्वांनी एकोप्याने राहत समाजाच्या प्रगतीचा मार्ग दाखवला आहे मात्र समाज आणि राजकारणी यांनी या शिकवणाीला वेगळे वळण दिल्याने समाज आणि राजकारण गाढूळ झाल्याचे सर्वांनी मान्य केले.मात्र संत शिकवणीचा अंगिकार केल्यास समाज आणि राजकारणात बदल घडवून आणता येऊ शकतो यावर सर्वांचे एकमत झाले.
संत साहित्याने जातीभेद नष्ट करण्याचे काम केले.अंधश्रद्धेचे खंडण करण्याचे काम केले.आपण संतांना आदराचे स्थान देत असलो तरी आज समाज आणि राजकारण प्रदुषित झाले आहे कारण समाज आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.कारण निवडणुकीत रेशनच्या कीट वाटणारे नेते सर्वत्र दिसत आहेत असे चित्र जर असेल तर संतांनी कितीही कीर्तने केली तरी समाज राजकारणी सुधरणार नाहीत. कारण शेकडो वर्षांच्या परंपरेत शैल संप्रदाय,विरशैव संप्रदाय,महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांनी समाज कल्याणाच्या,एकोप्याची शिकवण दिली आहे मात्र वारकरी कितीही प्रामाणिक असला तरी समाज बदलायला तयार नसेल तर राजकारणी समाजाला विकून खातील अशाी भीतीही या परिसंवादात व्यक्त करण्यात आली.राजकारणही आता पूर्वीसारखे संवेदनशिल राहिले नाही याचा दाखला देताना भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी मतदाराला गाडी देऊन रेल्वेने प्रवास केल्याची आणि राजीव गांधी यांनी अटलबिहरी वाजपेयी यांनी आजारपणावर उपचारासाठी विमानाने पाठवल्याची उदाहरणे दिली.परिसंवादाचे सुत्रसंचालन डॉ.प्रभाकर जोशी यांनी केले.
बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण
गुरुवार १ फेब्रुवारीला बाल साहित्य संमेलन पार पडले.या मेळाव्यात बाल साहित्यिकांनी कथाकथन,काव्य वाचन,नाट्य प्रवेश सादर केले होते.यातील निवडक बालकांना खान्देशकन्या बहीणाबाई चौधरी व्यासपीठ येथे आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली.काल झालेल्या कथाकथन सत्रात एकूण ६ कथाकथनातून २ निवडक आकांक्षा पाटील व गार्गी सुनिल जोशी या विद्यार्थिनींची निवड करण्यात
आली होती.काव्यवाचनात एकूण ९ काव्यवाचनातून ओवी तुषार चांदवडकर व प्रांजल अमोल सोनवणे यांची आज सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती.नाट्यप्रवेश एकूण ७ नाटय प्रवेशातून संस्कृती पवनीकर,जळगाव व शारदा माध्यमिक विद्यालय,कळमसरे या टीमची निवड करण्यात आली यानंतर निवड झालेल्या बलसागर भारत होवो पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूल अमळनेर संघाने सादर केले. बालसाहित्यातील या वर्षाचा भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालमेळावा समन्वयक एकनाथ आव्हाड यांचा सत्कार बालमेळावा आयोजकांनी केला.समारोपीय भाषणात एकनाथ आव्हाड यांनी बाल साहित्यिकांनी सादर केलेल्या कलाप्रकराचे कौतुक केले. आजच्या बाल मेळाव्यातील साहित्यातून उद्याचे दर्जेदार साहित्य घडतील असा आशावाद व्यक्त केला.यावेळी बाल मेळावा टीम संदिप घोरपडे, भैय्यासाहेब मगर,वसुंधरा लांडगे,स्नेहा एकतारे,श्री.धर्माधिकारी सर,गिरीष दादा चौक,भाऊसाहेब देशमुख,ॲड.सारांश सोनार उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार भैय्यासाहेब मगर यांनी मानले.