“कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेला महाराष्ट्र..”, भाजपा नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर काँग्रेसची टीका
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी X पोस्ट करत भाजपा तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ फेब्रुवारी २४ शनिवार
उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली आहे.इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे.भाजपावाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहे त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे.गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता!
महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना दिली असून आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते त्यावेळी आमदार गायकवाड,शहरप्रमुख यांच्यात बाचाबाची झाली यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे.एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत.त्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला.विस्तृत माहिती देण्यास पोलीस नकार देत आहेत.