गावात सामूहिक प्रयत्नातून ग्रामीण विकास शक्य-बारीपाड्याचे सुपुत्र चैत्राम पवार यांची मुलाखत
बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे-खान्देशी बोलीभाषा परिसंवादात सूर
पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर
पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :-
दि.३ फेब्रुवारी २४ शनिवार
कोणत्याही गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर संपूर्ण गावाने संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे असे मत बारीपाडा गावाचे सुपुत्र चैत्राम पवार यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय मराठी महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरद्वारा आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन’ या विषयावर चैत्राम पवार यांची मुलाखत झाली.सभामंडप क्रमांक दोनमध्ये ही मुलाखत झाली.ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत घासकडबी यांनी ही मुलाखत घेतली.धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या ३०० घरांची वस्ती असलेल्या गावाचा चैत्राम पवार यांनी सर्वांगीण विकास केला आहे अशी ही मुलाखत ऐकण्यासाठी सभामंडप पूर्णपणे भरलेला होता.ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन हा विषय साहित्याशी संबंधित नसला तरी समाजाशी संबंधित आहे म्हणूनच घेतला आहे असे मुलाखतकाराने आधीच स्पष्ट केले.चैत्राम पवार म्हणाले,जंगल,जल, जमीन,जन व जानवर ही पंचसूत्री स्वीकारून गावाचा विकास करण्याला प्राधान्य दिले आहे असे चैत्राम पवार म्हणाले.गावात आधी व्यसन तसेच वृक्षतोडीचे प्रमाण जास्त होते ही बाब लक्षात घेऊन गावाच्या गरजा काय आहेत हे आधी पाहिले.नांदेडचे एक डॉक्टर बारीपाडा गावात आले आणि त्यांनी वनवासी कल्याणाश्रमाचे आरोग्य केंद्र गावात सुरू केले.एवढ्या लांबून येऊन एखादा माणूस गावाचे आरोग्य जपण्यासाठी येतो तर मग आपण गावातच गावाचा विकास कसा करू शकत नाही ही बाब ध्यानात घेतली.गावातील वनांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही गावकऱ्यांसोबत एकत्र बसून काही नियम केले.कोणी झाडे तोडताना आढळल्यास त्याला दंड करणे,तो कोणीही असो अशाच एका प्रसंगात वनविभागाच्या कर्मचाऱ्याने वृक्षतोड केली तेव्हा त्यालाही चार हजार रुपये दंड केला व पकडून देणाऱ्यासही ५०१ रुपये बक्षीस जाहीर केले. वृक्षतोड बंद केल्यामुळे घरातील चूल कशी पेटवायची असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला तेव्हा २० वर्षांपूर्वी एलपीजी गॅस आणला.यानंतर आयआयटी पवई येथून सौर उर्जेवरचे कुकर विकसीत केले तसेच गावात धूरविरहीत चूलही विकसीत केली.गावात आजही चार प्रकारच्या चुली आहेत.
वनसंवर्धनासाठी २००३ मध्ये आंतरराष्ट्रीत पातळीवरील पुरस्कार मिळाला.शासकीय योजनांच्या मागे न पळता आम्ही गावाचा विकास केला. वनसंवर्धन करताना झाडांना कोणतीही हानी पोहोचू दिली नाही.मोहाची फुले वेचताना खाली वाकावे लागते यातून कंबरेला त्रास होतो म्हणून मोहाच्या झाडांना नेट लावले.पारंपरिक शेतीच्या पलीकडे शेती सुधार प्रकल्प गावात राबविला.नगदी पिकांऐवजी दैनंदिन गरजा भागविणाऱ्या पिकांवर भर दिला.बारीपाड्यातील शेतीवर जर्मनीतील एका प्राध्यापकाने पीएच.डी.केली आहे.शेती उत्पन्नातून पुढे शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली.पारंपरिक बियाणे बाहेरुन मागविण्यापेक्षा स्थानिक बियाण्यांवर भर दिला.पशुपालनालाही प्राधान्य दिले आहे.कोंबडी आमच्या दृष्टीने ‘एटीएम’ आहे.एक कोंबडी बाजारात नेली तर ती विकून ५००-६०० रुपये मिळतात.गावात शाळा होती पण शिक्षक कधी तरी १५ दिवसातून एक वेळा यायचे ही बाब गावकऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी या शिक्षकाला जाब विचारला तेव्हा विद्यार्थी येत नाही असे या शिक्षकाचे म्हणणे होते नंतर या शिक्षकालाही दंड केला.११०० एकरमध्ये वनसंवर्धनाचे काम झाले आहे.श्रमदानातून ग्रामस्थांनी ४८५ वनबंधारे बांधले यातून परिसरातील शेतीला लाभ होतोय.एकेकाळी पाणीटंचाईचा सामना करणारे बारीपाडा गाव आज परिसरातील पाच गावांना पाणीपुरवठा करते.पावसाळ्यात ७-८ फुटांवर विहिरींना पाणी असते तर इतर वेळेस १५-२० फुटांवर पाणी असते.शाश्वत विकास करायचा असेल तर घरात वर्षभराचा अन्नसाठा पाहिले.जैवविविधतेसाठी वनभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते.१८ वर्षांपासून हे हा महोत्सव सुरू आहे.आताच्या वनभाजी महोत्सवात २१८ महिलांनी नावे नोंदणी केली आहे यात ११० वनभाज्या होत्या.गावात स्त्री-पुरुष समानता आहे.गावात एकही कुटुंब भूमीहिन नाही.गावातील प्रश्न गावातच सोडवले जातात.आपण ज्या गावात राहतो त्या गावासाठी आपण काय करू शकतो याचा आजच्या युवकांनी विचार केला पाहिजे असा सल्ला चैत्राम पवार यांनी युवकांना दिला.
बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे-खान्देशी बोलीभाषा परिसंवादात सूर
बोली भाषांना प्राचीन इतीहास असून अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लूप्त होत गेल्या.आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्व प्रथम बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे असा सूर खान्देशी बोलीभाषा (अहिराणी,तावडी,भिल्ली,लेवा गणबोली,गुर्जर) परिसंवादात उमटला.कविवर्य ना.धो.महानोर सभागृह,सभामंडप क्रमांक २ मध्ये पार पडलेल्या खान्देशी बोलीभाषा परिसंवादात डॉ.रमेश सूर्यवंशी (अहिराणी) -कन्नड,अशोक कौतिक कोळी (तावडी)-जामनेर,डॉ.पुष्पा गावीत-(भिल्ली)-धुळे,डॉ.जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली) भालोद,डॉ.सविता पटेल -(गुर्जर) -नंदुरबार यांनी सहभाग घेतला.अध्यक्षस्थानी डॉ. रमेश सूर्यवंशी होते सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.
डॉ.सविता पटेल यांनी प्रत्येकाला आपल्या बोली भाषेचा अभिमान असला पाहिजे असे मत नोंदवत गुर्जर भाषेचा इतीहास व सद्यस्थितीची आढावा घेतला. डॉ.जतीनकुमार मेढे यांनी संपूर्ण भारतात जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील २२० गावांमध्ये लेवा समाजाची वस्ती असल्याचे मत नोंदवले व ही भाषा उच्चारदृष्ट्या साधी आणि सोपी बोली असल्याचे सांगितले.डॉ.गावित यांनी भिल्ली बोलीभाषा अती प्राचीन असून महाभारतातही भिल्ल जमातीचा उल्लेख असल्याचे सांगितले.कौतिक कोळी यांनी तावडी भाषेचा आढावा घेत भाषेचे संवर्धन होण्याची अपेक्षा व्यक्त केली.डॉ.सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीभाषेवर बोलतांना ही खान्देशची मुख्य बोली भाषा आहे.या भाषेत गोडवा आहे.या भाषेला मोठा इतीहास असल्याचे सांगितले.
पारधी, मरीआई व नंदी बैल या समाजाला मूळ प्रवाहात सामावून घेण्याची गरज-पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीतून उलगडले भटक्या विमुक्त समाजाचे दर्शन
मरीआई,नंदी बैल व पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यास समाजानेही साथ देणे गरजचे आहे. आधुनिकतेची कास धरत चंद्रावर जात असताना भटक्या विमुक्त समाजालाही समजून घेत त्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे साहित्य आणि युवक तयार होणे ही काळाची गरज असल्याचे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठाच्या पहिल्या सत्रात रवींद्र गोळे (मुंबई),सारंग दर्शने( मुंबई) यांनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले.ते म्हणाले की,सी.एम.केतकर,माजगावकर,शरद कुलकर्णी अशा आमच्यात साहित्य परिषदेत मार्क्सवादावर खडाजंगी चर्चा होत असे त्यावर माणूस या साप्ताहिकात लेखन करत असे मात्र माजगावकरांनी नुसते असे लेखन करण्यापेक्षा कृती करून लेखन करण्याचा सल्ला दिला आणि तो तंतोतंत अंमलात आणला.त्यासाठी मी काही दिवस खेडेगावात राहण्यास गेलो.रेल्वेने जाण्यासाठी स्टेशनवर आलो असता तेथे खुप मोठी गर्दी दिसली.३० ते ४० जण परिवारासह तेथे आले होते त्यावेळी कोणताही कार्यक्रम,राजकीय सभा नसताना एवढी गर्दी पाहून उत्सुकता वाढली त्यामुळे त्यांच्याशी बोलणे केले त्यानुसार त्यांच्या गावात पाण्याची टंचाई असल्याने शेती पिकली नाही.पिण्यास पाणी नाही म्हणून गाव सोडून जात असल्याचे त्यांनी सांगितले आणि मनात धस्स झाले.
निमगाव म्हाळगी येथे राहत असताना गावात नंदी बैलवाला,मरीआई वाले,पारधी भिक्षा मागण्यास येत.शिक्षण,संस्कार या सारख्या विविध बाबींचा गंधही नसलेल्या या समाजाबद्दल जवळून माहिती घेतली आणि ठरवले की या समाजाच्या प्रगतीसाठी आपण काम करायला हवे ही स्थिती तेव्हाची असली तरी आजही ग्रामिण भागातील स्थिती फारशी वेगळी नाही.ग्रामीण भागात आजही पाण्याची स्थिती गंभीर आहे तेव्हा हा समाज गावाच्या प्रमुखाची कामे विनामोबदला करत त्या बदल्यात प्रमुख त्यांना धान्य देत असे.काळ बदलला.प्रमुखाकडून मोफत धान्य देणे बंद झाले आणि बारा बलुतेदार त्यांच्या कामासाठी व मोबदल्यासाठी वणवण फिरू लागले.कामधंदा नसल्याने चोऱ्या करू लागले.पोलीस त्यांना पकडू लागले.कोठे काही झाले की पहिला संशय यांच्यावरच.पोलीस येत पुरूषांना पकडून घेवून जात.त्यांच्या महिला मग कोर्टकचेऱ्यातच आयुष्य घालवत त्यातुन तो सुटला तर दुसरे पोलीस हजर अशा रितीने या समाजांचे जीवन हालाखीचे झाले आहे ही सामाजिक असंतोषाची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले.
परिसंवाद*-‘लिव्ह इन ला’ समाजमान्यता मिळणे पूर्णत: चुकीचे-परिसवांदातील मान्यवरांचा सूर
मराठी साहित्यात असलेली जीवनमूल्ये आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करताना विसरत आहोत हा आपला दोष आहे.मराठी साहित्याचा नाही कारण लेखक हा त्याच्या लेखनातून चांगलेच मूल्य रूजवत असतो.आता लिव्ह इन लाही समाजमान्यता मिळत आहे की जे पूर्णत: चुकीचे आहे. यात जीवन मूल्ये हरवण्यास आपणच जबाबदार नव्हे का ? असा प्रश्नात्मक सुर खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर ‘आजच्या मराठी साहित्यातून जीवन मूल्ये हरवत चालली आहेत का’ ?या विषयावरील परिसंवादात उमटला.परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जबलपुरचे प्रशांत पोळ होते तर डॉ.किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन केले.यात डोंबिवलीचे श्रीराम शिधये व डॉ.पी.विठ्ठल यांनी सहभाग घेतला.डॉ.किशोर पाठक यांनी जीवन मूल्यांबाबतची माहिती दिली.मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी जीवनमूल्ये ही आताच निर्माण झालेली नाहीत तर त्यांचे बीजारोपण बालपणापासून संस्कारांच्या रुपातून केले जात असते.बालकथा ते साहित्य यातून जीवन मूल्यांची पेरणी केली आहे.यासोबतच आपल्या घरातील आजी आजोबा यांच्याकडूनही गोष्टीच्या रूपातून चांगले वाईटाबाबतचे संस्कार आपल्या मनावर बिंबवले गेले आहेत त्यामुळे मराठी साहित्यातून जीवन मूल्ये हरवलेली नाहीत.
जीवनातील मूल्यांना उजाळा देण्याची गरज : श्रीराम शिधये
यावेळी मत मांडताना श्रीराम शिधये म्हणाले की,साहित्यातून जीवनमूल्यांचे दर्शन होत असते मात्र त्याचा अवलंब होताना दिसत नाही.पाश्चात्यांचे अंधानुकरण करताना दोन मुले झाल्यानंतर विवाह झाले तर ती आजची जीवनशैली म्हणून आपण सहज स्विकारतो त्यामुळे जीवनमूल्य हरवलेली नाहीत तर ती आपणच हरवत आहोत.बदल अपरिहार्य असल्याने जीवनशैलीही बदलत आहे हे स्पष्ट करताना त्यांनी एक उदाहरण दिल की आई वडीलांनी त्यांच्या मुलाला विचारले की तो मोठेपणी काय करणार त्यावर त्याने उत्तर दिले की मोठे झाल्यावर तो त्यांना घराबाहेर काढणार कारण त्यांच्या आईवडीलांनी त्यांच्या आईवडीलांना घराबाहेर काढले होते हा पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम आहे.आता लिव्ह इन लाही समाजमान्यता मिळत आहे की जे पूर्णत: चुकीचे आहे.यात जीवन मूल्ये हरवण्यास आपणच जबाबदार नव्हे का.आता तीन पालक असलेले मुल जन्माला येत आहेत.दोन मुले झाल्यांनतर विवाह केला जातो.स्पर्म डोनेट व आयव्हीने मुले जन्माला येत आहेत अशावेळी आपली जीवनमूल्ये कोठे आहेत यासाठी मराठी साहित्य जबाबदार नाही तर आपण स्वत :आहोत.जीवन हे जीवनासारखे आहे याचा शोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सजीवसृष्टीचे हित अभिप्रेत : डॉ.पी.विठ्ठल
यावेळी बोलताना नांदेडचे डॉ.पी.विठ्ठल म्हणाले की,आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत चालली आहेत असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा एक प्र्रश्न उपस्थित होतो.तो असा की कधीतरी साहित्यात जीवनमूल्य होती आणि आता ती हरवत आहे हा विरोधाभास का निर्माण झाला. मानवी मूल्ये यात नुसते मानवी हित अभिप्रेत नाही तर मानवासह सजीव सृष्टीचे हित व्हावे असे अभिप्रेत आहे.ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो ने सत्य,शिव व सौंदर्य ही जीवनाची मूल्ये सांगीतली होती.स्वातत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर जीवनमूल्ये बदलली आहेत.साहित्यात संस्कृती व समाजाचा संबंध येतो. समाजातील रूढी,परंपरांचा समावेश साहित्य येतो.चांगला लेखक मूल्यांची,रूढींची चिकित्सा करून ते लिहत असल्याचे सांगीतले.तर अध्यक्ष म्हणून प्रशांत पोळ यांनी मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत नसल्याचे ठामपणे सांगितले.शामची आई,फास्टर फेणे,बोक्या सातबंडे यांच्यासारख्या बाल साहित्यातून बालकांवर जीवनमूल्ये रूजवली तर मोठ्यांच्या साहित्यातूनही ती रूजवली जात आहेत.मराठी साहित्यात असलेली जीवनमूल्ये आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करताना विसरत आहोत हा आपला दोष आहे.मराठी साहित्याचा नाही कारणे लेखक हा त्याच्या लेखनातून चांगलेच मूल्य रूजवत असल्याचेही त्यांनी सांगीतले.