Just another WordPress site

साने गुरूजींच्या पुस्तकांचे इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यात यावे-सुधा साने

सानेगुरूजी साहित्य नगरी,अमळनेर

पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :-

५ फेब्रुवारी २४ सोमवार

श्यामची आई या पुस्तकाचे १३ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे तसेच जपानी,चीनी व इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे त्यांच्या काही महत्त्वाचे पुस्तकांचे अनुवाद झाले पाहिजे याकरीता प्रकाशकांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने व्यक्त केली.साने गुरूजींचे १२५ जन्म वर्ष असून त्यांच्या साहित्यांची खुप गरज आहे.येणाऱ्या काळात महामंडळाने यासंदर्भात उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.गुरूजींच्या मृत्यूला ७५ वर्ष पूर्ण होत आली आहेत परंतु आजही खान्देशाच्या मातीत त्यांचा प्रेमाचा दरवळ असल्याचे त्या म्हणाल्या. साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने यांचा सत्कार करण्यात आला.हा सत्कार लोकसभा माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.या सत्काराला उत्तर देताना सुधा साने यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की,१९२३ सालच्या जुलै महिन्यात गुरूजींनी अमळनेरच्या मातीत पहिले पाऊल टाकले.खान्देशाच्या मातीत एकरूप झाले.कामगारांना न्याय मिळावा म्हणून लढे उभारले त्यांनी ५० वर्षांच्या आयुष्यातील साडे आठ वर्ष तुरूगांत काढले.साहित्याचे विविध प्रकार हाताळले.१९२४ साली त्यांनी प्रथम पुस्तक लिहिले.१०० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली त्यांच्या कर्मभूमीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे त्यांच्या कामांची दखल घेतली त्यांचा गौरव समजते असेही त्या म्हणाल्या.

अलक्षित साने गुरूजी परिसंवादातून उलगडले विविध पैलू

अलक्षित साने गुरूजी या परिसंवदात पूज्य साने गुरुजी यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंचा समग्र विचारमंथन करण्यात आले यात प्रामुख्याने साने गुरूजी यांनी नेहमीच मातृहृदयी लेखक म्हणून ओळखले जाते परंतु त्यांची ओळख तेवढीच नव्हती ते समाज सुधारक,कामगार नेते, विचारवंत,स्त्री आणि दलितांसाठी चळवळ उभारणारे नेते म्हणून पाहिले गेले पाहिजे अशी अपेक्षा या परिसंवादातून व्यक्त करण्यात आली.
डॉ.मंजूषा कुलकर्णी यांनी साने गुरूजी यांच्याकडे साधन नसतांना देखील वेगवेगळे कार्य सिघ्दीस नेले असल्याचे सांगितले.गुरूजी हे वेद व वेदाचे ज्ञाता होते.मरणोप्रांत जीवनाचे उत्तम उदाहरण हे साने गुरूजी होते असे त्यांनी स्पष्ट केले.डॉ.ललित अधाने म्हणाले की,साने गुरुजी यांना असामन्य व्यक्तीमत्त्व लाभले होते.ते सर्व पिढीचे आवडते लेखक आहेत.भालचंद्र नेमाडे यांनी गुरूजींना संत परंपरेतील साहित्य म्हणून गौरवीले असल्याचे स्पष्ट केले आहे.गुरूजींने जे अनुभवले तेच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.प्रा.लक्ष्मण गंगाधर सोनवणे म्हणाले की,साने गुरूजी यांचे जीवन एक कोडे बनले आहे.गुरूजी लेखक,विचावंत,स्वातंत्र्यवीर,कामगार नेते अशा विविध भूमिका साकरल्या आहेत.येववडा कारागृहात असताना त्यांची आर्चाय विनोबा भावे यांची भेट झाली होती यातून त्यांना सामाजिक कार्यांची प्रेरणा मिळाली त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी १९३७ साली सोन्या मारोती नावाची कांदबरी लिहली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डॉ.परमानंद बावनकुळे म्हणाले की,साने गुरूजी यांनी शिक्षणी पेशाचा राजीनामा देऊन स्वातत्र्य संग्रमात उडी घेतली होती त्यांचे कार्य दुर्लक्षित राहिले आहे यात ते लेखक,संत,स्वातंत्र्य सेना म्हणून कार्य केले. परंतू त्यांच्यातील लेखकाने संत,स्वातत्र्य सेनानी हे पैलू दुर्लक्षित राहिले आहेत त्यांनी सामाजिक कार्य करतांना दुसऱ्यांचे आंधानुकरण केले नाही. जगातील चांगले साहित्य मराठी अनुवादीत करण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे त्यांनी बहुजन,पिडीत वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण देखील केले होते त्यांनी निर्भिडपणे नेतृत्व केले.प्रकाश पाठक यांनी गुरूजींनी मातृधर्माला कुटूंब धर्माची जोड दिली.वसुंधरा कुटूंब कल्यमनुसार त्यांनी संपूर्ण जगावर प्रेम केले.सामाजिक जीवन ममत्त्वने जोडले पाहिजे.त्यांनी त्यांचे जीवन समता स्वातंत्र्य बंधूता यांनी जोडले आहे हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे ते समतेचे पुरस्कर्ते होते त्यांचा हा गुण दुर्लक्षीत झाला आहे.अध्यक्ष चैत्रा रेडकर यांनी साने गुरूजी यांच्या श्यामची आई सोबत त्यांच्या सोन्या मारोती,संध्या,सुधास पत्र यांचे देखली वाचन केले गेले पाहिजे असे अपेक्षा व्यक्त केली.गुरूजी निर्भय व करारी होते. त्यांनी कागमारांचे आंदोलन केले.आता पेटवू सारे रान असे म्हणत शेतकऱ्यांसाठी लढा उभारला.जगण्यात करुणा नसेल तर धर्म अभिव्यक्तीसाठी मानावे का असा प्रश्न उपस्थित केला होता.

विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रुढ झाला नाही -परिसंवादातील खंत

अजूनही विनोद ऐकला जातो.विनोद वाचला जातो.विनोदामुळे रसिक,प्रेक्षक खुशही होतात पण तरीही विनोदी साहित्यात पाहिजे तसे सकस आणि विपूल प्रमाणात लेखन झाले नाही त्यामुळे इतर साहित्य प्रवाहाप्रमाणे विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रुढ झाला नाही अशी खंत ‌‘मराठी साहित्यात विनोदाचे गांभिर्याने चिंतन होणे आवश्यक आहे’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली.अखिल भारतीय मराठी महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरद्वारा आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सभामंडप २ कविवर्य ना.धों.महानोर सभागृहात ‌‘मराठी साहित्यात विनोदाचे गांभिर्याने चिंतन होणे आवश्यक आहे’ या विषयावरील परिसंवाद झाला.अकोला येथील किशोर बळी यांनी सूत्रसंचालन केले.ठाण्याचे श्रीकांत बोजेवार अध्यक्षस्थानी होते.या परिसंवादात शिरुर ताजबंद,पुणे येथील द.मा.माने, पुणे येथील डॉ.आशुतोष जावडेकर,वणी,नाशिक येथील डॉ.दिलीप अलोणे,नंदुरबारचे प्रा.डॉ.माधव कदम यांनी सहभाग घेतला.द.मा.माने यांनी विनोदी साहित्याची वाटचाल व आढावा स्वातंत्रयपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळात या स्वरुपातून मांडला.डॉ.आशुतोष जावडेकर यांनी विनोदाचे प्रकार,उपहास कोटी,प्रहसन असे प्रकार सांगून नाट्यातून विनोद निर्मिती होते.परिस्थिती सापेक्ष विनोद निर्मिती होते.मराठी भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतील विनोदी लेखकांचे संदर्भ दिले.डॉ.दिलीप अलोणे यांनी शालेय जीवनापासून विनोदी लेखकाची भूमिका कथन केली. तेव्हापासून विनोद आवडू लागला.विनोद समजायला लागला,लिहिलेला विनोद समजण्यासाठी कसे बुद्धीचातुर्य असले पाहिजे हे सांगितले. चालता-बोलता विनोद घडतो,फक्त तुमची निरीक्षण शक्ती पाहिजे असे सांगितले.प्रा.डॉ.माधव कदम यांनी इतर साहित्यप्रवाह जसे समृद्ध झालेत तसे विनोदी साहित्य प्रवाह समृद्ध झालेला दिसत नाही.आधुनिक मराठी वाङ्मयात विनोदी लेखन करणारे श्रीपाद कोल्हटकर यांचे ३७ विनोदी लेख,चिं.वि.जोशी यांची २५ पुस्तके,वि.आ.बुवा यांची १५० पुस्तके,रमेश मंत्री यांची ३५ पुस्तके अशी लक्षवेधी साहित्यसंपदा लिहिणारी अशी लेखक मंडळी कमी आहे असे नमूद केले.अध्यक्षीय भाषणात डॉ.श्रीकांत बोजेवार म्हणाले की,हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे.आज आपण आपल्याच आजूबाजूला पाहिले तर विनोद हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे.विनोदी नाट्य,टीव्हीवरील शो,विनोदी चित्रपटांना प्रेक्षकांची पहिली पसंती असते.सोशल मीडियावरदेखील विनोदी साहित्य व्हायरल होते यामुळे मराठी साहित्यात विनोदाकडे अजिबात दुर्लक्ष झाले नाही असे मतही डॉ.बोजेवार यांनी व्यक्त केले.

कविसंमेलनातून उलगडले कविमनांचे भावविश्व-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पडला अनेक कवितांचा पाऊस

पूज्य साने गुरुजीच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीवर कवी मनांच्या काव्य प्रतिभेला धुमारे फुटणार नाही असे कधी होणार नाही,जे न देखे रवी ते देखे कवी यानुसार वेगवेगळी कविसंमेलने आणि कवीकट्टा कार्यक्रमांना रसिकांनी दिलेल्या टाळ्यांनी चांगलेच रंगले.शनिवारी सायंकाळी सभामंडप दोनमध्ये कविसंमेलन उत्साहात पार पडले.प्रकाश केटुजी होळकर,लासलगाव अध्यक्षस्थानी होते.या कविसंमेलनात गीतेश शिंदे-ठाणे,मेघना साने-ठाणे,प्रथमेश किशोर पाठक-ठाणे,कीर्ती पाटसकर कांदिवली,वैभव अशोक वऱ्हाडी-वाशी,सुजाता राऊत-ठाणे,नरसिंह इंगळे-चिखलठाणा,अभय दाणी-छ.संभाजीनगर,भारत सातपुते- लातूर,आशा डांगे छ.संभाजीनगर,माधुरी चौधरी-छ.संभाजीनगर,हबीब भंडारे- छ.संभाजीनगर,कविता मुरुमकर-सोलापूर,धनंजय सोलंकर-पुणे,देवा झिंजाड-पुणे,कांचन प्रसाद संगीत-नवी मुंबई,चैतन्य मातुरकर-ब्रह्मपुरी, नरेंद्र कन्नाके वरोरा,राम वासेकर-गडचिरोली,गणेश भाकरे-सावनेर,अमोल गोंडचवर-मलकापूर,हर्षदा कुलकर्णी-पठाडे,पौर्णिमा राजेंद्र केरकर – गोवा,माधुरी खर्डेनवीस-भोपाळ,आनंद हिरालाल जाधव,बिदर,डॉ.संजीवकुमार सोनवणे धरणगाव,बी.एन.चौधरी-धरणगाव,रतन पिंगट लासलगाव,मीनाक्षी पाटील-मुंबई,मारुती कटकधोंड सोलापूर,जिजा शिंदे-छ.संभाजीनगर,प्रा.सुमती पवार-नाशिक,गणेश खारगे कुंडल,रवींद्र लाखे या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.अजीम नवाज राही साखरखेडा यांनी सूत्रसंचालन केले.

खान्देशी कविसंमेलन
शनिवारी सायंकाळी सभामंडप-३ बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात खान्देशी कविसंमेलन चांगलेच रंगले.ज्येष्ठ कवी कृष्णा पाटील अध्यक्षस्थानी होते.यात नंदुरबारचे ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक रमाकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारीत ‌‘आत्महत्या’ ही कविता सादर केली.‘अरे माझ्या दोस्ता,हो तू आता शहाणा,अपयशापायी मरणाचा नको करू तू बहाणा’ ही लक्षवेधी कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.यासोबतच जळगावच्या ज्येष्ठ कवयित्री पुष्पा साळवे यांनी ‌‘सद्य:स्थिती’वर आधारीत ‌‘बाईपण’ ही कविता सादर केली. जळगावच्याच कवयित्री यांनी ‌‘देव दगडाचा’ ही कविता सादर केली याशिवाय मराठी गझलकार डॉ.संगीता म्हसकर यांनी विविध तीन गझल सादर केल्या त्यात ‌‘वाऱ्यावरती उडून गेले,फुल गुलाबी सुकून गेले,गुन्हा असावा लाटेचा हा,नाव आपले पुसून गेले’ या गझलेने लक्ष वेधून घेतले. याशिवाय ज्ञानेश्वर शेंडे,एरंडोलचे नामवंत साहित्यिक आणि गझलकार प्रा.वा.ना.आंधळे,ॲड.विलास कांतीलाल मोरे,मुक्ताईनगरचे अ.फ. भालेराव,अमळनेरच्या सुनीता रत्नाकर पाटील व गोकुळ बागुल,चाळीसगावचे दिनेश चव्हाण,नगरदेवळ्याचे गो.शि.म्हसकर याशिवाय सुभाष पाटील (घोडगावकर),निरेंद्र खैरनार,एस.के.पाटील,महेंद्र पाटील,वि.ना.बागूल,वीरेंद्र बेडसे,जगदीश पाटील,अरुण सोनटक्के,संजय वाघ, विनोद गोरवाडकर,प्रभा बैकर,शिवानी मुळे,कृपेश महाजन,किशोर काळे,राजश्री मोरे,विलास पाटील खेडीभोकरीकर,ज्ञानेश्वर भामरे,बाहुबली बारकुट,शरद पाटील,राजेंद्र कांबळे,डॉ.राजेश गायकवाड,प्रा.राजश्री चव्हाण या कवींनी आपापल्या कविता सादर कविसंमेलनाचा आनंद घेतला.जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

‌‘आठवणीतल्या कविता -रसास्वाद’

शनिवारी दुपारी सभामंडप एकमध्ये खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर ‌‘आठवणीतल्या कविता – रसास्वाद’ हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी अशोक बागवे,ठाणे (मंगेश पाडगावकर) होते.यात किरण येले (शांता शेळके) अंबरनाथ,श्रीधर नांदेडकर (बी. रघुनाथ) -छ. संभाजीनगर,संजीवनी तडेगावकर (ना.धों.महानोर) -जालना,डॉ.माहेश्वरी वीरसिंग गावीत (कुसुमाग्रज) -अहमदनगर-मीना संजय शिंदे (केशवसुत) -पुणे प्रमोदकुमार अणेराव (सुरेश भट) भंडारा,श्याम माधव धोंड (कवी अनिल)-नागपूर,पौर्णिमा हुंडीवाले (भा.रा.तांबे) बऱ्हाणपूर यांनी कवी आणि त्यांच्या कवितांविषयी विविध अंगांनी माहिती दिली.संजय बारी यांनी सूत्रसंचालन केले.

‌‘कळ्यांचे निश्वास’ या संग्रहाने स्त्रियांच्या कथासाहित्यात परिवर्तनाला सुरूवात-परिचर्चेत वक्त्यांनी टाकला विविध पैलूवर प्रकाश

१९२० च्या दशकात स्त्रीयांच्या मनातील व्यथा व भावभावनांचे यर्थाथ चित्रण विभावरी शिरूरकर अर्थात मालती बेडेकर यांनी कळ्यांचे निश्वास या कथासंग्रहातून व्यक्त केला आहे त्या काळात स्त्रीयांवर अनेक बंधने असताना मालती बेडेकर यांनी हे धाडस केले खरे पण आपले खरे नाव त्यांनी १३ वर्ष उघड होऊ दिले नाही जेव्हा स्थिती योग्य वाटली तेव्हा त्यांनी एका कार्यक्रमात ती विभावरी शिरूरकर त्या असल्याचे जाहिर केले. या पुस्तकातील विविध लेखांवर वक्त्यांनी उहापोह करून कथा संग्रहातील स्त्री जीवनावरील विविध पैलुंवर प्रकाश टाकला.
कविवर्य ना.धो.महानोर सभागृहात झालेल्या या परिचर्चेच्या अध्यक्षस्थानी गोरेगावच्या डॉ.अनघा मांडवकर होत्या तर यात उमा आवटे (डोंबिवली),सुषमा मुलमुले(नागपूर),वसंत बिरादार (अहमदपुर) डॉ.शशिकांत पाटील (पाचोरा) यांनी सहभाग घेतला होता.विभावरी शिरुरकर अर्थात मालती बेडेकर यांनी त्या काळात अनुभवलेल्या तत्कालीन स्त्री जीवनाला साहित्याच्या रूपात उतरवले.कौटुंबिक आणि सामाजिक वास्तव परीस्थितीची चिकित्सा न करता,स्त्रीमनाच्या व्यथांची जाणीव करून देणारे मराठी साहित्य विभावरी शिरूरकर उर्फ मालतीबाई बेडेकर यांनी लिहिले.विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात त्यांनी स्त्रीमनाचा ठाव घेणाऱ्या साहित्यातून समाजासमोर एक झंझावाती वादळ निर्माण केले.रूढी,परंपरा,पूर्ण समाजातील स्त्रीयांच्या दुःखद स्थितीचे सहानुभूतीने चित्रण करणाऱ्या साहित्यातील पुरूषी औदार्यभावाला बाजूला ठेवून केवळ स्त्रीनिष्ठ जाणिवांतून स्त्रीप्रश्नांना वाचा फोडणारे साहित्य पहिल्यांदाच मराठीत शब्दबध्द करण्याचे धाडस त्यांनी केले.स्त्रीस्वातंत्र्याच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे साहित्य यापूर्वीच्या पुरूषी दडपशाहीला नकार देऊन स्वतंत्रपणे स्त्रीकेंद्री कलेचा शोध घेणारे ठरले.स्त्रीयांच्या व्यथित मानसिक आंदोलनांना वाङ्मयरूपात सादर करणाऱ्या या लेखिकेचे क्रांतीरूप पुरूषसत्ताक वाङ्मयात दुर्लक्षिले गेले असले तरी स्त्रीयांचे मन साहित्यात उतरवण्यासाठी स्त्री साहित्यिकच असायला हवा.मराठी वाङ्मयाच्या इतिहासात इ.स. १९३३ ते १९४५ या काळात विभावरी शिरूरकर यांच्या लेखनाने एक वादळ निर्माण केले.१९३३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‌‘कळ्यांचे निश्वास’ या संग्रहाने स्त्रियांच्या कथासाहित्यात परिवर्तनाला सुरूवात झाली.

निंदा,टिकेला गेल्या सामोऱ्या

त्या काळात स्त्रीयांनी पुरूषांशी बोलू नये सोबत काम करतांनाही बोलू नये तसे दिसले तर गैरसमजाचे डोंगर उभे राहत आणि त्याचा त्रास त्या महिलेला सहन करावा लागत असे.त्या काळात या सर्व लेखनाची निर्माती करणारी ‌‘विभावरी शिरूरकर ही व्यक्ति कोण आहे ? या विषयी कुतुहल निर्माण झाले.पुरूषांवर टिका करते म्हणजे काय ? हे साहित्य अश्लिल आहे.ते जाळा अशी टिका व निंदा झाली हे एवढ्यावरच थांबले नाही तर विभावरी यांची प्रेतयात्राही त्या काळात काढण्यात आली.

अखेर त्यांनीच जाहिर केले ती मीच

विभावरी शिरूरकर बी.ए.या नावाने प्रसिद्ध होणारे लेखन श्रीमती मालतीबाई बेडेकर लिहित होत्या याचे रहस्य १९३३ ते १९४६ पर्यत सुमारे १३ वर्षे उलगडले नव्हते.स्त्रीयांवरील एका व्याख्यानाप्रसंगी त्यांनीच ते प्रकट केले व ती विभावरी शिरूरकर म्हणजे मीच मालती बेडेकर.विभावरी शिरूरकर ही दुसरी तीसरी कोण नसुन आपली पत्नी आहे हे खुद्द त्यांचे पती बेडेकरांनाही माहित नव्हते.विभावरी शिरूरकरांनी स्त्रीकेंद्री कथा, कादंब-या,नाटकांचे लिखाण केले त्यात शबारी,लग्न की कौमार्य,पतिची निवड,शेवग्याच्या शेंगा,वहिनीच्या बांगडया,अंतःकरणाचे रत्नदीप,ताई हेच बरे,सुखाचे संसार,प्रेम विष की अमृत,तू आई की दावेदारीण,रिकाम्या भांडयाचे निनाद,त्याग,बाबांचा संसार माझा कसा होईल,शिकारी, दोघांचे विश्व, खरे मास्तर,प्रेम की पशुवृत्ती,प्रेमाची पारख,मोरणी,एकच क्षण,पारध,हिरा जो भंगला नाही यासारख्या साहित्याद्वारे विभावरी शिरूरकरांनी स्त्रीयांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भावनात्मक समस्या समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता.विभावरी शिरूरकर यांचे लेखन त्या काळच्या इतर स्त्री लेखिकांपेक्षा संपूर्णपणे नव्या शैलीचे होते.स्त्री-प्रश्नांची मानसिक बाजू त्यांनी फार प्रभावीपणे आपल्या कथांतून माडली, प्रौढ कुमारिकांच्या मनातला मानसिक कोंडमारा,कुरूप मुलींचे लग्नाचे प्रश्न आणि त्यांची मानसिक कुचंबणा,हुंड्याचे प्रश्न,प्रेमातील पाशवीपणा, अशारीर प्रेम,बाहेरख्यालीपणा इत्यादी स्त्रीजीवाचे अनेकविध बाजूचे दर्शन घडविण्यात त्यांच्या कथा यशस्वी झाल्या असल्याचे सांगत वक्त्यांनी त्यांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला या परिचर्चेचे सूत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी केले.

लोककला,लोकसंगीत कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात आज लोककला,लोकसंगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला.खच्चुन भरलेल्या सभागृहात कलावंतांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.नगरदेवळा येथील खान्देश शाहीर शिवाजीराव पाटील यांनी सादर केलेल्या पोवड्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.बापूसाहेब हटकर यांनी कर्ण जल्मानी कहाणी सादर केली.विनोद ढगे यांनी वही गायन सादर केले.प्रविण पवार यांनी केलेल्या संबंळ नृत्याने सभागृह उत्सहाने भरुन गेले होते.खान्देशी पोवडा म्हणून प्रसिद्ध असलेला टिंगरीवाला भिका भराडी यांनी जोशात सादर केली.खान्देशी लोकगीतात वसुंधरा यांनी हळद कूटन कूटा वं कूटा वं खांड…,पायतं,तेलन,पोखान,खेसर,देव वरन म्हणजेच देव नाचवणं व आखाजी नं गीत आथानी कैरी तथानी कैरी व गौराई गीत गायली यावर मृणाल धनगर यांनी नृत्य सादर केले.
यासोबतच जागरण,गोंधळ,गोंधय धोंडी गीत परशुराम सुर्यवंशी यांनी सादर केली.वन्हे विकास राजपूत यांनी सादर केले.शेषराव गोपाळ व सुनंदा कोचुरे यांनी तामाशातील गण व गवळण सादर करुन रंगत आणली.मुंबईचे बापू हटकर व गिरडचे रमेश धनगर याचे संयोजक होते.

आंतरभारती काळाची गरज-परिसंवदात वक्त्यांचा सुर

साने गुरुजी यांनी आंतरभारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना अनेक भाषाा शिकण्याची संधी दिली.विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणासाठी उपक्रम राबविले.आजच्या स्पर्धात्मक युगात त्यांच्या आंतरभारतीची आवश्यकता असल्याचा सुर आंतरभारती काल आज-उद्या या परिसंवदात उमटला.
खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षपदी डॉ.सुभाष किन्होळकर धामणगाव बडे हे होते यात युवराज मोहिते (गोरेगाव),अमर हबीब(अंबाजोगाई),चंद्रकात भोंजाळ (अंधेरी),जयेश म्हाळगी (वडोदरा),डॉ.अलका कुलकर्णी (शहादा) यांनी सहभाग घेतला.डॉ.अलका कुलकर्णी म्हणाल्या की,भारतीय खंड हा बहुभाषिक,बहुप्रांतीय,बहुसांस्कृतीक होता त्यांचा बंधूभाव हाच धर्म होता.साने गुरुजी यांनी १९२४ साली मुलांसाठी दैनिक काढल्यानंतर दिड वर्षांनी मुलांसाठी मासिक काढले.विद्यार्थ्यांना मूल्य शिकविण्याचे उपक्रम राबविले त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावाचा इतिहास शोधण्याचा सल्ला दिला यातून त्यांनी स्थानिक प्रथा,परंपरा,इतिहास यामागील कारणमिमांसा केल्यास शेतकऱ्यांबद्दल बंधूभाव निर्माण होईल अशी गुरुजींची भूमिका होती.आंतरभारती संस्थेचे महत्त्व विशद केले.विद्यार्थ्यांना अनेक भाषा शिकण्याची संधी मिळाली.१७ मे १९५० साली साधनाच्या अंकांत आंतरभारतीची कल्पना मांडली व त्यासंदर्भांचा ठराव साहित्य संमेलनात पास करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.युवराज मोहिते म्हणाले की,भाषावर प्रांत रचना ही दुधारी तलवार आहे.आंतरभारती संस्था असती तर दोन राज्या राज्यांमध्ये वाद निर्माण झाला नसता.दहावी,बारावीतील मुले फ्रेंच,जर्मन यासारखे विषय घेतात ते भारतीय भाषा घेऊ शकत नाही का असा प्रश्न उपस्थित केला.विद्यार्थ्यांना प्रांतावर भाषा शिकवा म्हणजे ते इतर राज्यात जावू शकतात असे मत मांडले.अमर हबीब म्हणाले की,दोन समाजातील संवाद बंद करणाऱ्या भिंती उभारण्यात आले आहेत.गांधी पुसण्याचा उद्योग सुरू झाला आहे.गांधी समजून घेतल्या शिवाय देश समजून घेता येत नाही.गांधीमुळे देश एक झाला.आंतरजातीय विवाहांना मानवीय विवाह संबोधले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत भोंजळ म्हणाले की,आंतरभारतीत विविधतेचा एकता पाहण्याचे सामर्थ्य आहे.मानसिक दुरावा कमी करण्यासाठी आंतरभारतीची गरज आहे.दुसऱ्या भाषेतील बेस्ट सेलर,वादग्रस्त पुस्तकांचे अनुवाद होत आहेत यातून आंतरभारतीचे तत्त्व पुढे जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनुदानाकरीता धोरण ठरविले गेले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.युवराज मोहिते म्हणाले की,मानवी संस्कृतीचा उदय आदान प्रदानातून झाला आहे.ज्ञानेश्वर माऊलींनी वेदांचे भाषांतर केले.साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे केलेला मंदिर प्रवेश हा आंतरभारतीचा प्रयोग होता.
अध्यक्ष डॉ.सुभाष किन्होळकर म्हणाले की,साने गुरुजी यांनी स्वप्न साकार नाही झाले तर स्वप्नाचा पाठलाग करत जगत राहावे हा संदेश दिला आहे.त्यांची दृष्टी ज्ञान,प्रांत,पक्षापुरती मर्यादित राहिली नाही.आंतरभारती नाविन्यपूर्ण विचार पेरणारी प्रेरणा आहे.आंतरभारती संकल्पनेचा विस्तार कसा होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे.भारतीयांत ऐक्य हवे.ऐकोपा,संमजस्यपणा आपापसातील वैर संपविते म्हणजेच आंतरभारती असल्याचे मत विषद केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.