Just another WordPress site

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध -विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा यासाठी नागरिकांनी आग्रही राहावे-अभिरूप न्यायालयातील मत

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर

पोलीस नायक,तालुका (प्रतिनिधी) :-

दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार

मराठी भाषा मुळात अभिजात,संपन्न,घरंदाज आहे.आज विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत आहे.शासकीय पातळीवर मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत मात्र मराठी नागरिक ही मराठी भाषेचा वापर कमी करत आहेत तेव्हा मराठी भाषेचा न्यूनगंड काढून मराठी बोलली,वाचली गेली पाहिजे.सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा यासाठी मराठी नागरिकांनी आग्रही राहावे असे मत साहित्य संमेलनात पार पडलेल्या अभिरूप न्यायालयात व्यक्त करण्यात आले.

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का ?’ याविषयावर आगळेवेगळे अभिरूप न्यायालय पार पडले.अभिरूप न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांनी काम पाहिले तर शासनाच्यावतीने वकिल म्हणून उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काम पाहिले तर साक्षीदार म्हणून डॉ.गणेश चव्हाण,प्रा.एल.एस.पाटील,मराठी भाषा विभागाचे संचालक श्यामकांत देवरे यांनी आपले मत मांडले.तर याचिकाकर्त्यांचे वकिल म्हणून अँड.सुशील अत्रे,याचिकाकर्ते म्हणून पत्रकार विनोद कुलकर्णी,ॲड दिलीप पाटील यांनी आपले मत मांडले.उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आपल्या युक्तिवादात म्हणाल्या की,वैद्यकीय क्षेत्रातील भाषा मराठीत असली पाहिजे यासाठी डॉक्टरांनी औषधांचे प्रिस्क्रीप्शन मराठीत लिहावेत.पालकांनी मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत शिकवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आतापर्यंत विधानसभेत ६७ वेळा व विधानपरिषदेत ७० वेळा मराठी भाषेविषयी चर्चा झाल्या.वेगवेगळ्या माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.येत्या काळात तंत्रज्ञानाचा उपयोग मराठीत करणे आवश्यक आहे.शासन व समाज दोन्ही पातळीवर अभिजात भाषेसाठी पाठपुरावा केला जात आहे.मराठी भाषेला जगमान्यता आहेच मात्र या भाषेला तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पुढे नेण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही उपसभापती डॉ गोऱ्हे यांनी दिली.

न्यायमूर्ती मुदृला भाटकर म्हणाल्या की,मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा केंद्राचा धोरणात्मक निर्णय आहे तोपर्यंत मराठी भाषिकांनी न्यूनगंड झटकत सार्वजनिक पातळीवर एकमेकांशी मराठी भाषेतूनच संवाद साधावा.मराठीतून संवाद व्हावा यासाठी आग्रही राहावे तसेच राज्य शासनाने शासननिर्णय जाहीर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.ॲड सुशील अत्रे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, मराठीच्या योग्य वापरासाठी क्षेत्र तयार आहेत मात्र अभिजात भाषेसाठी शासनाकडून केंद्र शासनाकडे अधिक प्रयत्न होणे आवश्यक असून त्याकरिता सकारात्मक भूमिका घेऊन कसोशीने प्रयत्न झाले पाहिजेत.यावेळी विनोद कुलकर्णी म्हणाले की,भाषेला दर्जा मिळावा यासाठी निवेदने देण्यात आली.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.मराठी साहित्य परिषदेने यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत.महाराष्ट्र शासनाने ही केंद्र शासनाकडे अभिजात भाषेच्या दर्जासाठी अधिक प्रयत्न करावेत.शासनाच्या वतीने साक्षीदार म्हणून एल.एस.पाटील यांनी बाजू मांडली ते म्हणाले,शासनाने अलिकडच्या काळात विविध शब्दकोश तयार केले आहेत.इंग्रजीमधून शिकविले जाणारे अभ्यासक्रम मराठी केले जात आहेत मात्र विद्यापीठ स्तरावरूनही यात अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहेत.डॉ.दिलीप पाटील म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात सध्या मराठीत भाषेत व्यवहार होत आहे त्यामुळे मराठीच्या अभिजात भाषेसाठी वैद्यकीय क्षेत्र सज्ज आहे.डॉ गणेश चव्हाण म्हणाले की,जगातील सर्व भाषेत बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी २२ व्या क्रमांकावर आहे तर भारतात तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे.मराठी भाषा २ हजार वर्षे जुनी भाषा आहे.गाथासप्तशती हा ग्रंथ १५०० वर्षांपूर्वीचा आहे त्यामुळे येत्या काळात मराठीला निश्चितच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे.श्यामकांत देवरे म्हणाले की,मुंबई येथे २५० कोटींच्या निधीतून मराठी भाषा भवनाची इमारत बांधण्यात येत आहे.जगपातळीवरील मराठी भाषिकांचा आंतरराष्ट्रीय समन्वय मंच स्थापन करण्यात आला आहे.मराठी भाषा धोरण अंतीम टप्प्यात आहे. पुस्तकांचे व कवितांचे गाव तयार करण्यात येत आहेत.मराठी भाषेच्या अभिजाततेसाठी राष्ट्रपतींना लाखो पत्र पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन वेळोवेळी खंबीर पावले उचलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.सूत्रसंचालन ॲड सारांश सोनार यांनी केले.

भविष्यातील साहित्य विज्ञानाधारीत असेल-परिसंवादातील सूर

भविष्यातील साहित्य हे विज्ञानावर आधारीत असेल,विज्ञान साहित्याच्या चिंतनाचा परीघ वाढेल आणि त्याच्या प्रेरणाही बदलतील.विज्ञान साहित्याच्या चिंतनाचा परिघ वाढेल व त्याच्या प्रेरणाही बदलतील असा सूर ‌‘मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल’ या विषयावरील परिसंवादात उमटला.९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी दुपारी सभामंडप -१ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर ‌‘मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल’ या विषयावरील परिसंवाद झाला त्यात सुनील सुळे,पुणे,विश्वाधार देशमुख, नांदेड,डॉ.कोमल ठाकरे,नागपूर,डॉ.फुला बागुल,शिरपूर,डॉ.रंजन गर्गे,छत्रपती संभाजीनग या लेखकांनी सहभाग घेतला.पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर अध्यक्षस्थानी होते.डॉ.फुला बागुल म्हणाले,भविष्य काळातील साहित्य हे विज्ञानावर आधारीत असेल हे साहित्य ग्रामसंवेदन केंद्रित असेल ते अस्तित्व वादाच्या अंगाने जाईल.सुनील सुळे म्हणाले,वास्तव विज्ञानादी आधारीत विज्ञान कथा हिच विज्ञानाची खरी असेल आणि ती लिहिली जाईल.विश्वाधार देशमुख म्हणाले,विज्ञान साहित्याबद्दलचे संभम दूर अगोदर दूर होणे गरजेचे आहे.डॉ.कोमल ठाकरे म्हणाले,संभवनीयतेच्या अंगाने भविष्यातील विज्ञान कथा लिहिली जाईल.डॉ.रंजन गर्गे यांनी सरोगेट मदर या वैज्ञानिक सूत्राशी निगडित कथा या अंगाने परिसंवादात विवेचन केले.डॉ.पंडित विद्यासागर यांनी अध्यक्षीय समारोप करताना भविष्यातील येणारी कथा ही नवनव्या विज्ञान तंत्रज्ञानाला कवेत घेणारी असेल.प्रा.गोपीचंद धनगर यांनी सूत्रसंचालन केले.
९७ वे अ. भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर -साने गुरुजी,बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह १० ठराव मंजूर

१) गेल्या वर्षात ज्या मान्यवर व्यक्तींचे दु:खद निधन झाले त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मांडत आहे.

२) ग्रामिण भागात अनेक मराठी शाळा बंद पडून दुसऱ्या शाळांबरोबर जोडल्या जात आहेत त्यामुळे विद्यार्थी व पालक ह्यांच्या अडचणी वाढत आहेत यावर सरकारने परिणामकारक योजना कराव्यात अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- डॉ.रविंद्र शोभणे अनुमोदक :- श्री.अशोक बेंडखळे

३) मराठीसह सर्व भारतीय भाषांची आकाशवाणी दिल्ली येथून प्रसारीत होणारी राष्ट्रीय वार्तापत्रे त्या-त्या राज्यांच्या राजधानीत पाठविण्यात आली त्यामुळे त्या भाषांचे दिल्लीतील राष्ट्रीय स्थान संपुष्टात आले आहे. ही वार्तापत्रे पुन्हा दिल्लीहून प्रसारीत व्हावी अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे. सूचक :- डॉ. श्रीपाद जोशी अनुमोदक :- श्री. प्रकाश पागे

४) गुजराथी, मराठी शब्दकोशाची आवृत्ती सुधारून परत तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- श्री.संजय बच्छाव अनुमोदक :- श्रीमती शैलजा जोशी

५) बृह्नमहाराष्ट्रातील मराठी शिक्षण संस्थांना आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने एक रकमी अनुदान द्यावे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- श्री.गुरैय्या स्वामी अनुमोदक :- श्री.रमेश वंसकर

६) काळाच्या ओघात कान्हादेशाचे अपभ्रंश होऊन खान्देश असे नामकरण झाले आहे ते पूर्ववत कान्हादेश असे करण्यात यावे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- अॅड. पंकज गोरे
अनुमोदक :- श्री. जगदिश देवपुरकर

७) अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे प. पूज्य साने गुरूजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाने करावी अशी मागणी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- डॉ. अविनाश जोशी अनुमोदक :- श्री. निरज अग्रवाल
८) कान्हादेशाचे वैभव असलेल्या प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाने करावी अशी मागणी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- डॉ. धनंजय दिक्षीत अनुमोदक :- डॉ.अविनाश जोशी
९) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक विचारवंतांनी पुरावे दिले आहेत आणि साहित्य संस्थांनी लोक चळवळ उभारून हा विषय ऐरणीवर आणला आहे, तरीही महाराष्ट्र शासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून त्याचा पाठपुरावा होतांना दिसत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक :- प्रा. डॉ. नरेंद्र पाठक अनुमोदक :- श्री.प्रदीप दाते
१०) जळगांव व धुळे जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणारे पाडळसे धरण केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट करून तसा प्रस्ताव केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट होणेसाठी महाराष्ट्र शासनाने त्वरीत पाठवावा अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.सूचक :- श्री. नरेंद्र निकुंभ अनुमोदक :- श्री. अशोक बेंडखळे

खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

पूज्य साने गुरुजी आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर ‌‘भारतरत्न’ देण्यात यावा यासह विविध १० ठराव ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आले.२ तारखेपासून सुरू झालेल्या संमेलनाचे रविवारी सायंकाळी सूप वाजले.समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावली.खान्देशला साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे.समाजात साहित्याचे स्थान हे कायम आदरणीय आणि पूजनीय राहिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ९७व्या साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी यशस्वी समारोप झाला.समारोपप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे ऑनलाईन लाईव्ह उपस्थित होते.संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी होते.व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे,भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,पालकमंत्री गुलाबराव पाटील,खासदार उन्मेश पाटील,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,महामंडळाच्या अध्यक्षा डॉ.उषा तांबे,उपाध्यक्ष रमेश वंसकर,कार्याध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे,कोषाध्यक्ष प्रकाश पागे,समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक,संमेलन सचिव राजेंद्र भामरे,सहसचिव डिगंबर महाले,कोषाध्यक्ष नीरज अग्रवाल,मराठी वाङ्मय मंडळ,अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी,उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे,रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ,शरद सोनवणे,सोमनाथ ब्रह्मे,महाव्यवस्थापक प्रमुख बजरंगलाल अग्रवाल,कोषाध्यक्ष प्रदीप साळवी,कार्यकारी सदस्य प्रा. डॉ.पी.बी.भराटे,बन्सीलाल भागवत,स्नेहा एकतारे,संदीप घोरपडे,वसुंधरा लांडगे,भैय्यासाहेब मगर,प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी,प्रा.श्याम पवार,प्रा. शीला पाटील,भय्यासाहेब मगर,सदस्य अजय केले उपस्थित होते.यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,महाराष्ट्राच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवताना डोळ्यांनाही ताण पडला त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली म्हणून उपस्थिती देऊ शकलो नाही अशी खंत व्यक्त करत त्यांनी साहित्यिक व कादंबरीकार यांना राजकीय कादंबरी लिहिण्यासाठी आजसारखे पोषक वातावरण व संधी त्यांना कधी उपलब्ध होणार नाही असे सूचक वक्तव्य करत त्यांना राजकारणावर लिहिण्याचे सांगितले.

साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री यांनी उपस्थिती द्यावी ही प्रथा व संस्कृती आहे मात्र नाईलाज असल्याने आपण खानदेशातील या मराठी साहित्य संमेलनाला अनुपस्थित राहिलो.खानदेशातील साने गुरुजी,कवयित्री बहिणाबाई चौधरी या महान विभूतींचा स्पर्श झालेला आहे व त्या ठिकाणी मराठी भाषेचा कुंभमेळा भरला होता.अमळनेर येथे ९७ वे साहित्य संमेलन पार पडत असताना शंभरावे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर भव्य दिव्य आयोजित केले जाईल.महाराष्ट्र शासन शंभराव्या साहित्य संमेलनाला परिपूर्ण सहाय्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली व यावेळी आपले सरकार राहील असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले.खानदेशभूमीमधील विशेषतः जळगाव व अमळनेर या ठिकाणी वाल्मीक ऋषि,महर्षी व्यास,संत सखाराम महाराज व अनेक संतांनी स्पर्श झालेली भूमी आहे यातच वाल्मिक ऋषी यांचे नाव अयोध्येचे विमानतळाला देऊन खानदेश व अयोध्या यांची एक नाद जोडली गेल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी समारोप भाषणात केला.

ग्रंथाला विशेष अनुदान देणार

साने गुरुजी यांच्या विचारांची परंपरा असून त्यांचा पदस्पर्श या भूमीला लाभलेला आहे.मराठी साहित्याची सर्व समाजाला जाग आणणारी आहे. आपण आपल्या साहित्यातून ती ओळख करून देत असतो असे प्रेरणा देणारे साहित्य संमेलन बळ देण्याचे काम करीत असतात.प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथाला विशेष अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले व तालुक्याच्या ठिकाणी साहित्य च्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहनही दिले जाईल व जिल्हा महामंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले व त्याचा प्रचार,प्रसार होईल असेही ते म्हणाले.अमळनेरला असलेले शंभर वर्ष जुने तत्त्वज्ञान केंद्र आहे.या केंद्राचा प्रस्ताव पाठवल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्याचा सकारात्मक विचार करेल असे शेवटी त्यांनी सांगितले व शेवटी त्यांनी साहित्यकरांना सांगितले की,राजकीय कादंबरी लिहिण्याचे आजचे वातावरण सगळ्यात चांगले आहे व साहित्यिकांना ही संधी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी ठराव करणार -डॉ.नीलम गोऱ्हेे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विधानसभेसह विधान परिषदेत ठराव करावा या ठरावानुसार केंद्राकडे पाठपुरावा करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी कटिबध्द आहे असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.साहित्य संमेलनाच्या सकाळ सत्रात झालेल्या अभिरुप न्यायालयातील अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षत्रे सज्ज आहेत का याचा उल्लेख करत अभिरूप न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी हा विषय प्रलंबित ठेवला असल्याचे सांगून किमान पुढील साहित्य संमेलनापर्यंत तरी मराठी भाषेला अभिजात म्हणून दर्जा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली यासाठी भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हा ठराव विधानसभेत मांडावा तर मी स्वत: विधानपरिषदेत हा ठराव मांडणार असल्याचे सांगितले. यासोबतच केंद्र सरकारतर्फे ग्रंथालयांसाठी ५ हजार ग्रंथांलयांना ४७ कोटी रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे यातून ग्रंथालये समृध्द होतील. समाजानेही यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

अमळनेरला पुस्तकाच्या गावाचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव मांडू- मंत्री दीपक केसरकर

मुख्यमंत्र्यांनी मराठी साहित्यिकांशी संमेलनात हितगूज करण्याची परंपरा होती परंतु त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने ते येवू शकले नाही. विदर्भ साहित्य परिषदेला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांना १० कोटी देण्याचा प्रस्ताव मांडणार आहे.एकत्रित साहित्य घेत असताना लहान-लहान संमेलने घ्यावीत.विश्व मराठी संमेलन,मराठी साहित्य संमेलन,अहिराणी साहित्य संमेलन हे सर्व एकत्र येत एकच मोठे शिखर संमेलन घ्यावे.मराठी भाषा टिकण्यासाठी मराठीतून मुले शिकवणे गरजेचे आहे.मुले मराठी शिकले तरच मराठी टिकेल.मंत्री अनिल पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार अमळनेरला पुस्तकाच्या गावाचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव मांडू,पूज्य साने गुरुजींना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव तयार करणार,लेखक,प्रकाशकांनी अनुदानासाठी मराठी भाषा भवनाकडे अर्ज करावे.अर्ज आले तरच त्यांना अनुदान देता येईल.मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एफएम रेडीओ केंद्राचा वापर करण्यात येईल मात्र साहित्यातून मनोरंजन व्हावे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

प्रारंभी संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना या संमेलनात घेतलेल्या विविध कार्यक्रामांचा आढावा घेतला. खासदार रक्षा खडसे,खासदार उन्मेश पाटील,पालकमंत्री गुलाबराव पाटील,मंत्री गिरीश महाजन,पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यासह आजी-माजी आमदारांनी या संमेलनासाठी निधी दिला.व्यासपीठावरील मान्यवर तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ तसेच मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्यासह संमेलन यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन प्रतिमा जगताप व डिगंबर महाले यांनी केले.

संमेलन यशस्वीतेसाठीझटले अमळनेंरकरांसह खान्देश शिक्षण मंडळाचे हजारो हात

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी खान्देश शिक्षण मंडळाचे व प्रताप महाविद्यालयाचे अनमोल सहकार्य मिळाले.मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र शांतीलाल झाबक,उपाध्यक्ष जितेंद्र प्रभाकर देशमुख,माधुरी प्रमोद पाटील,विश्वस्त वसुंधरा दशरथ लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.अनिल नथ्थु शिंदे,कार्योपाध्यक्ष प्रदिप कुंदनलाल अग्रवाल,सदस्य हरी भिका वाणी,डॉ.संदेश बिपीन गुजराथी,कल्याण साहेबराव पाटील,विनोद राजधर पाटील,सदस्य निरज दिपचंद अग्रवाल,योगेश मधुसुदन मुंदडे,चिटणीस प्रा.डॉ.ए.बी.जैन,सहचिटणीस प्रा.डॉ.धिरज आर. वैष्णव,पदसिध्द प्रा.डॉ.ए.बी.जैन,मुख्याध्यापक प्रतिनिधी बी.एस.पाटील,महाविद्यालय प्राध्यापक प्रतिनिधी आर.एम.पारधी,शिक्षक प्रतिनिधी विनोद मधुकर पाटील,प्रा.डॉ.धनंजय चौधरी,प्रा.डॉ. रमेश माने यांनी सहकार्य केले.त्याबद्दल अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्ष प्रा.उषा तांबे यांनी आभारही व्यक्त केले.
समारोपाच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम-जाऊ देवाचिया गावा-महानाट्यला प्रचंड प्रतिसाद-सभागृह हाऊसफुल्ल
`
साहित्य संमेलनात लेखक व प्रकाशक यांचा सत्कार

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी संमेलनाच्या समारोपप्रसंगी लेखक व प्रकाशक यांचा सत्कार करण्यात आला. सभामंडप -१ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर हा समारंभ झाला यात पुणे येथील नामवंत लेखिका डॉ.मीना प्रभू तसेच शहादा येथील गांधीवादी विचारवंत तथा नामवंत लेखक प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांचा यांचा अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याचवेळी नागपूर येथील चंद्रकांत लाखे व जळगाव येथील अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी व संगीता माळी यांचाही सत्कार करण्यात आला.

समारोपप्रसंगी बोलताना महामंडळाच्या अध्यक्ष प्रा.उषा तांबे म्हणाले की,शारदेच्या या सोहळ्याला मिळालेला प्रतिसाद पाहता ते यशस्वी झाल्याचे जाहीर करते.संमेलन यशस्वीतेसाठी अमळनेरच्या मराठी वाङ्‌‍‍मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, प्रताप महाविद्यालयाचे संस्थाचालक,प्राचार्य,प्राध्यापक यांनी खूप सहकार्य केले.१९५२ मध्ये झालेल्या साहित्य संमेलन पाहिलेले व्यक्ती आता नाहीत.या संमेलनाला सुधाताई साने येणार म्हटल्यावर आमचाही आनंद व्दिगुणीत झाला.संमेलनातील एकूण वातावरण पाहता साने गुरुजी अजूनही असल्याचे जाणवते.२०२५ मध्ये होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी ज्यांना प्रस्ताव पाठवायचे असतील त्यांनी ते ३१ मार्च २०२४ पर्यंत पाठवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अमळनेरकरांनी खूप प्रेम दिले : डॉ.रवींद्र शोभणे
संमेलनाध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे यांनी अमळनेरकरांनी खूप प्रेम दिले.संमेलनाध्यक्ष होण्यासाठी अनेकांनी माझ्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले त्या सर्वांचे आभार मानले.या संमेलनात ११ परिसंवाद ३ कविसंमेलने झाली.चांगले नियोजन व साहित्यिकांचा प्रतिसाद पाहता हे संमेलन यशस्वी झाले.संमेलनात मागील बाजूने रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणे सोपे आहे पण या संमेलनासाठी अनेकांनी कष्ट घेतले.अनेक मनस्ताप सहन केला त्याचाही विचार व्हावा.आतापर्यंत १९५२ चे संमेलन सोडले तर तालुकास्तरावर हे होणारे हे संमेलन पहिलेच ठरले असल्याचे डॉ.शोभणे यांनी सांगितले.

साहित्यिकांचे शताब्दिस्मरण परिसंवाद

महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राला गौरवशाली परंपरा लाभली आहे.साहित्यामुळे खऱ्या अर्थाने क्रांती झाली आहे.स्वांतत्र्य लढ्यात साहित्यिक व सहित्य यांचे योगदान मोठे होते.लेखकांनी आपल्या साहित्यातून शंभर वर्षापूर्वी देखील सामाजिक,जागतिक स्थैर्यावर लिखाण केले आहे असा सूर साहित्यिकांचे शताब्दिस्मरण या परिसवांदातून प्रकट झाला.

कविवर्य ना.धों.महानोर सभागृहात पार पडलेल्या परिसंवादेत प्रा.हंसराज जाधव,डॉ.एकनाथ पगार,डॉ.राजेंद्र मुंढे,मोनिका गजेंद्रगडकर,प्रा. प्रमोद बापट,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे यांचा सहभाग होता.अध्यक्ष प्रा.पी.बी.भहाटे होते.सूत्रसंचालन प्रा.धर्माधिकारी यांनी केले.प्रा.हंसराज जाधव म्हणाले की,महाराष्ट्रात जनजागृतीसह आंदोलक म्हणून शाहीर साबळे अशी ओळख आहे.शाहिर साबळे यांचा इतिहास महात्मा गांधी,साने गुरुजींपासून आहे त्यांनी त्याकाळी महात्मा गांधी व साने गुरुजींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.डॉ.एकनाथ पगार म्हणाले की,१६८ कथा लिहिणारे प्रा.जी.ए.कुलकर्णी मला महर्षी वाटतात त्यांनी विविधांगी साहित्य यांनी लिहिले आहे त्यांच्या लेखनातून अस्तित्ववादी लिखाण दिसून येते.मोनिका गजेंद्रगडकर म्हणाल्या की,श्री.पु.भागवत यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे.मोनिका गजेंद्रगडकर यांनी त्यांचे वडील विद्याधर पुंडलीक यांच्यावरही विवेचन केले.प्रा.प्रमोद बापट यांनी विद्याधर गोखले यांच्यावर विचार प्रगट केले. पत्रकार,वक्ता,संगीत नाटककार अशी त्याची ओळख असल्याचे ते म्हणाले.प्रा.ज्ञानेश्वर कांबळे यांनी गंगाधर गाडगीळ यांच्यावर विचार प्रकट केले.साहित्यिकासोबत ते अर्थतज्ञ म्हणूनही ओळखले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.