Just another WordPress site

दसरा मेळाव्याची गर्दी जमविण्याकरिता ठाकरे – शिंदे गटांकडून हजारो एसटी,खासगी बसेसचे बुकिंग

 मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ठाकरे व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचे प्रयत्न सुरू असून वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची स्पर्धा सुरू आहे.लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत.यामध्ये सहा हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे.इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार असल्याने गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते.तीन हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत.मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख,नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत.कसारा,कर्जत,खोपोली,पालघर,विरार,डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस,टेम्पो ट्रॅव्हलर,सात आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असेल.दोन्ही सभांसाठी एकूण जवळपास दहा हजार वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे असे राज्यातील खासगी बसचालक-मालकांकडून सांगण्यात आले आहे.

एसटीचे २४ तासांसाठी किमान भाडे १२ हजार रुपये आहे.२४ तासानंतर ५६ रुपये प्रति किमी या दराने महामंडळ आकारणी करते.३०० किमी अंतराला सात आसनी इनोव्हा गाडीसाठी साधारण ५१०० ते ५७०० रुपये,१३ आसनी ट्रॅव्हलरसाठी सहा हजार ते साडेसहा हजार रुपये भाडे आकारण्यात येते.मिनी बससाठी ७२०० ते ७८०० असे दर आहेत,असे वाहन व्यावसायिक (टूर्स-ट्रॅव्हल्स) प्रशांत थोरात यांनी सांगितले. दोन हजार बस उभ्या राहतील अशी व्यवस्था कालिना परिसरात करण्यात आली आहे.वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदानांत प्रत्येकी एक हजार आणि सोमय्या मैदानात ७०० ते ९०० वाहने उभी करण्याचे नियोजन आहे.दसऱ्याची सुट्टी असल्याने त्या दिवशी मुंबईतील नोकरदारांच्या नियमित वाहनांची संख्या कमी असेल.त्यामुळे तात्पुरत्या वाहनतळांची क्षमता पूर्ण झाल्यावर पूर्व-पश्चिम महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कडेला अन्य वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने वाहने उभी करण्याच्या सूचना संबंधित चालकांना देण्यात आल्या आहेत असे सभांसाठी आरक्षित झालेल्या बसच्या चालकांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.