Just another WordPress site

“गोळीबार करणे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत,आम्हाला ही घटना मान्य नाही”-भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाष्य

भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार

भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी या घटनेला शिंदे गट आणि भाजपामधील गँगवॉर असल्याचे म्हटले आहे.आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही घटना महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकणारी ठरू शकते अशी चर्चा होऊ लागल्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर भाष्य केले आहे.शिंदे-फडणवीस यांच्यात कोणतीही वर्चस्वाची लढाई नाही.शिंदे,फडणवीस आणि अजित पवार स्पर्धा न करता एकत्र काम करत आहेत अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

एखाद्या घटनेमुळे महायुतीत फरक पडत नाही.अनवधानाने काही घटना घडतात व या घटनेची सखोल चौकशी गृहखाते करत असून यापूर्वी महाराष्ट्रात अशा घटना १००० वेळा घडल्या आहेत पण त्या घटनांचे उदाहरण देऊन आजची घटना झाकता येणार नाही.गोळीबार करणे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत.आम्हाला ही घटना मान्य नाही.झालेला प्रकार दुर्दैवी असून पुढील काळात राज्याला गालबोट लागणार नाही अशी काळजी सर्वांनीच घेतली पाहीजे.गृहखात्याचा अहवाल आल्यानंतर पोलीस कारवाई करतीलच पण पक्षही कारवाई करणार आहे असेही बावनकुळे म्हणाले.दरम्यान महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या असल्या तरी त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत अशी माहिती राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी दि.२ फेब्रुवारी रात्री उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला होता त्यानंतर गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शंभूराज देसाई यांनी रविवारी दुपारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस डॉक्टरांकडे केली त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून लोकसभा मतदारसंघांचा दौरा करत असून ठिकठिकाणी सभा घेत आहेत.काल त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन सभा घेऊन भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली या टीकेलाही बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.उद्धव ठाकरे बावचळले आहेत.माविआ घाबरली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला भोपळाही फोडता येणार नाही हे सत्य त्यांना कळले आहे.महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार चांगले काम करत आहेत.मोदीजींनी मागच्या निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत.मोदीजींच्या वादळासमोर महाविकास आघाडी पत्त्यासारखी उडून जाईल अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.महायुती लवकरच आपल्या जागा जाहीर करणार असून प्रत्येक मतदारसंघात ५१ टक्के मतदान घेऊन जिंकून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार ५१ टक्के मतदान घेऊन जिंकेल तसेच महाराष्ट्र आणि विदर्भात मविआला एकही जागा मिळणार नाही असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.