“महाराष्ट्रात भाजपाच्या आमदाराने गोळीबार करुन रामराज्य नाही तर मराराज्य आहे हे दाखवून दिले आहे”-उद्धव ठाकरे यांची टीका
गुजरातची चाकरी करणाऱ्या गद्दारांनो तुम्हाला छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही-उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार
भाजपा रामराज्य आणल्याचा दावा करते आहे व तसे होर्डिंग लावले जात आहेत मात्र महाराष्ट्रात भाजपाच्या आमदाराने गोळीबार करुन रामराज्य नाही तर मराराज्य आहे हे दाखवून दिले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून लगावला आहे.गणपत गायकवाड यांना गोळीबार करावा का लागला? कमळाबाई हतबल झाली आहे.बीजेपी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असे त्या पक्षाचे नाव झाले आहे.मी किती नावे ठेवू? भाड्याची जनता पार्टी,बेडुक जनता पार्टी,जुगारी जनता पार्टी किती नावे ठेवू? हे मकाऊला जाऊन जुगार खेळणारे आहेत.विरोधातल्या एखाद्याने पोलीस ठाण्यात कुणाला थोबाडीत ठेवून दिली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी आकांडतांडव केला असता.गुंडगिरी सुरु आहे, पोलीस ठाण्यात मारामारी केली.आता देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? मी ऐकले लापता आहेत कारण त्यांना उत्तर द्यायला तोंडच नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
गणपत गायकवाड म्हणाले की,माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली म्हणून मी चिडून गोळ्या घातल्या.पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काही करत नाहीत म्हणून गोळीबार केला आणि मला पश्चात्ताप नाही हे गायकवाडच सांगत आहेत मग भाजपा राहिली कुठे आहे शिल्लक? राजन साळवी, सूरज चव्हाण,किशोरी पेडणेकर यांच्या घरांमध्ये जी माणसे पाठवत आहात.आता गप्प का? ज्यांनी आदेश दिले आणि ज्यांनी कारवाई केली त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हेच भाजपा करते आहे.आज उद्योग मंत्री बसले आहेत,स्वतःचे उद्योग जोरदार सुरु आहेत.उद्योग मंत्री झाल्यावर किती उद्योग महाराष्ट्रात आणले?दावोसच्या खासगी दौऱ्याची खाज का सुटली होती?असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.काही कंपन्या इथल्याच होत्या,इथल्याच लोकांना तिथे नेऊन जाऊन करार केले.वेदांता फॉक्सकॉन,बल्क ड्रग पार्क,फिल्मफेअर गुजरातला गेले आणि गद्दारही गुजरातला नेले.गुजरातची चाकरी करणाऱ्या गद्दारांनो तुम्हाला छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.आपले पंतप्रधान गुजरात विरुद्ध देश अशी भिंत उभी करत आहेत.मला गुजराती समाजाविषयी काहीही तिरस्कार नाही.राम मंदिर बांधलंत चांगली गोष्ट होती.भाजपा तेव्हा होती कुठे? विश्व हिंदू परिषदेचे लोक होते. तुमचे सगळे झाले की फोटो काढायला आम्ही येतो असे भाजपाचे लोकांचे धोरण होते.महाराष्ट्र बंद करायचा झाला की शिवसेना रस्त्यावर उतरणार हे परीटघडीचे कपडे घालून पोलिसांना सांगणार आलो की आम्हाला आत टाका तुरुंगात चहा बिस्किट द्या.हे असले लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार? यांच्याकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही.मातोश्रीवर मुस्लिम बांधव माझ्याकडे येतात ते मला सांगतात तुमचे हिंदुत्व आणि भाजपाचे हिंदुत्व यातला फरक आम्हाला कळतो.
कुरुलकरबद्दल संघ आणि भाजपा का बोलत नाही? आपली गुप्त त्याने पाकिस्तानला पुरवली असतील आणि ते सिद्ध झाले तर भर चौकात फाशी द्या हे आमचे हिंदुत्व आहे.आमचे हिंदुत्व घरातल्या चुली पेटवणारे आहे तर भाजपाचे हिंदुत्व घरे पेटवणारे आहे.मिंधेला तर हे भाग्य लाभू शकत नाही.सरकार आपल्या दारी म्हणत तो आला की म्हणतात गद्दार आपल्या दारी आला असे लोक म्हणतात असाही टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.निवडणूक चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाला आहे मात्र शिवसेना हे नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही.नाहीतर आम्ही निवडणूक आयुक्ताला धोंड्या म्हणू.आमच्या शिवसेनेचे नाव कितीही पिढ्या आल्या तरीही आम्ही आमचे नाव बदलणार नाही.शिवसेनेत गुंड,पुंड आणि षंढ हे मिंधेसोबत आहेत.आमच्याकडे जे लोक आहेत ते शिवसैनिक आहेत असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.