संत तुकाराम यांचा जीवनपट उलगडणारा महानाट्याविष्कार ;‘जाऊ देवाचिया गावा’ महानाट्याने रसिक झाले भावविभोर
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय दिवशीही गर्दीचा उच्चांक
पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता सादर झालेल्या ‘जाऊ देवाचिया गावा’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्याने रसिकगण भावविभोर झालेत.खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर झालेले हे महानाट्य पाहण्यासाठी रसिकांनी गर्दीचा उच्चांक मोडला.सभागृह रसिकांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल झाले होते.साडे सातला सुरू झालेले महानाट्य रात्री सव्वाबारापर्यंत चालले.
चार तासापर्यंत सभागृह होते हाऊसफुल्ल
सायंकाळी साडेसातला महानाट्यास सुरवात झाली.महानाट्य चार तास चालले.नाटकाचा समारोप होईपर्यंत सभागृह हाऊसफुल्ल होते. जवळपास चार हजार प्रेक्षकांनी हे नाटक प्रत्यक्ष पाहिले तर या नाटकाचे थेट प्रसारण ‘९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर’ या यू ट्यूब चॅनलवरून दाखवण्यात येत होते त्यावरूनही अनेक नागरिकांनी घरी बसून या महानाट्याचा लाभ घेतला.
असे आहेत महानाट्यातील कलावंत
या महानाट्याचे लेखन,दिग्दर्शन संजय भोसले यांनी केले असून त्यांनी संत तुकारामाची भूमिकाही साकारली आहे.या महानाट्यात १५० कलावंतांनी भाग घेतला आहे तर ७० कलावंतांनी आपल्या नृत्यकौंशल्यातून डोळ्याचे पारणे फेडले आहे.या महानाट्याची निमिर्ती डॉ.जर्नादन चितोडे अध्यक्ष वृंदावन चॅरीटेबल ट्रस्ट पुणे यांनी केली आहे.या महानाट्यात बैलगाड्या,पालख्या,घोडे यांच्या सहभागाने या महानाट्यात जिवंतपणा आणला होता.या महानाट्यास अशोक पत्की यांनी संगीत दिलेले आहे यात १२ गाणी दाखवण्यात आली आहेत.मयूर वैद्य यांनी कोरीओग्राफी केली आहे तर सतीश काळे यांनी गीते लिहीली आहेत.सुरेश वाडकर,आनंद भाटे,देवकी पंडित,रवींद्र साठे यांनी गायली आहेत.
आणि असा झाला अमळनेरला प्रयोग
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा प्रयोग अमळनेरच्या खान्देश शिक्षण मंडळाचे बजरंग अग्रवाल यांनी पुणे येथे पाहिला होता.संतश्रेष्ठ तुकाराम महारांजावरील या महानाट्याने बजरंग अग्रवाल यांच्या मनावर चांगलेच गारूड केले आणि त्यांनी ठरविले की, या महानाट्याचा एक प्रयोग आपल्या अमळनेकरांसाठी करावा.योगायोगाने ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन प्रताप महाविद्यालयात होत असल्याने त्यात हे नाटक सादर करण्याचे त्यांनी निश्चित केले आणि त्यानुसार संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी रविवार,४ फेब्रुवारीस ते सादर करण्यात आले यासाठी खान्देश शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
मराठी साहित्य संमेलनात गझल कट्टा रंगला
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी गझल कट्टा रंगला.गझलकारांनी एकसे बढकर एक गझल सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली.सभामंडप-३ बालकवी त्रंबक बापूजी ठोंबरे सभागृहात हा गझलकट्टा पार पडला.प्रतिमा सराफ,मुंबई,वृषाली अभिजित देशपांडे,नागपूर यांनी या गझल कट्ट्याचे संयोजन केले.डॉ.अविनाश सांगोलकर (सोलापूर) अध्यक्षस्थानी होते.मनोहर नेकर यांनी सूत्रसंचालन केले.
चोपडा येथील राज्यस्तरीय काव्यपुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गझलकार प्रा.योगिता पाटील बोरसे यांच्या
“सामान्य माणसांचा जयकार होत नाही,
सामान्य माणसांचा उद्धार होत नाही
विश्वास ठेवला की विश्वासघात होतो
परका कुणी कधीही गद्दार होत नाही”
या गझलेने रसिकांची सर्वाधिक पसंती मिळविली.मनोज वराडे यांची ‘कावळे जमलेत खुर्चीला शिवाया, नेमका वारस तिच्या नजरेत नाही’ ही गझलही रसिकांना भावली.डॉ.अविनाश सांगोलकर यांची ‘बनली जरी ही दुनिया जनावरांची, अविनाश तू तरीही अपवाद एक आहे’ ही गझल सभागृहात वेगळे वातावरण निर्माण करून गेली.यासोबतच बबन धुमाळ (पुणे), सुनीता कपाळे (छत्रपती संभाजीनगर),चंद्रशेखर भुयार यांच्यासह इतरही गझलकारांनीही आपापल्या गझल सादर करून गझलकट्ट्यास उपस्थित रसिक, प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
गझलकार आपल्या गझल सादर करीत असताना श्रोते कधी टाळ्यांनी दाद होते, तर कधी हात उंचावून कौतुक करीत होते.