Just another WordPress site

यशवंतरावांच्या विचाराच्या महाराष्ट्राचा बिहार झालाय-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटण येथील विजय निश्चय मेळाव्यात जयंत पाटील यांचे टीकास्त्र

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.६ फेब्रुवारी २४ मंगळवार

पोलीस माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराच्या महाराष्ट्राचा आज बिहार झाला असून राजकीय संस्कृती पूर्णतः बिघडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.शरद पवार राज्यकर्त्यांसमोर झुकत,वाकत अथवा मनासारखे वागत नाहीत म्हणूनच त्यांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप जयंतरावांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटण येथील विजय निश्चय मेळाव्यात ते बोलत होते.उल्हासनगर पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा धागा पकडत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांना राज्याचा कारभार आवरता येत नसल्याचा निशाणा जयंत पाटील यांनी साधला.भाजपच्या आमदाराने पोलीस ठाण्यातच  गोळीबार करत मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याने महाराष्ट्राचा बिहार झालाय हे सिद्ध होतय.सरकार जनतेचे की गुंडांचे असा प्रश्न उभा असून सर्वत्र झुंडशाही सुरु आहे.राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय अशी गंभीर परिस्थिती आहे.गद्दारी करून सत्तेत गेलेल्या प्रवृत्तीच्या मागे जनता गेलेली नसून संपूर्ण महाराष्ट्र शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. सत्ता व पैशातून पक्ष फोडायचे अशा खालच्या पातळीच्या  राजकारणामुळे महाराष्ट्राची अधोगती सुरु आहे.महागाई,बेरोजगारी प्रचंड वाढली आहे.केवळ धर्म, जातीवरच राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत तरी अशा परिस्थितीत जनतेचीच आता परीक्षा असून येत्या निवडणुकात महाविकास आघाडीला पाठबळ द्या असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रभू श्रीराम हे सर्वांचेच दैवत पण प्रभू रामाला समोर ठेवून निवडणुका घ्याव्या लागतात हे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त केली.माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी अवघ्या देशाची परिस्थिती बिकट बनल्याने त्याविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,दीपक पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.अयोध्येत राममंदिरात २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेवरून जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.सध्याचे शासन हे फक्त (उत्सवी) इव्हेंट सरकार बनले असून पूल,रस्तेच काय तर मंदिरांची उद्घाटनेही करण्यासाठी केवळ एकच व्यक्ती कार्यरत ठेवण्यात आलेली आहे. मंदिरांचा कळस बसला नाही तरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे परंतु तुम्ही-आम्ही घाबरून न जाता शायनिंग इंडियाच्या वेळी ज्या पद्धतीने या पक्षाच्या सरकारचा नामुष्कीचा पराभव केला त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांना स्थानिक जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्रातली जनता ही नक्कीच पोहोचलेली आहे येत्या निवडणुकात ते कोणाला कुठे पोहोचतील हे सांगता येणार नाही असा ठाम विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.कोणत्याही निवडणुका कशाही पद्धतीने लागल्या तरी आपली सार्वत्रिक तयारी ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,जनतेने झुंडशाहीला  उलथवून लावण्यासाठी सज्ज  राहावे असे आवाहन जयंत पाटील यांनी  केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.