पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ फेब्रुवारी २४ गुरुवार
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे पडसाद काल बुधवार रोजी महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी उमटले.शरद पवार समर्थकांकडून शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनातील अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला फोडण्यात आली त्यावरून अजित पवार आणि शरद पवार सर्मथकांमध्ये काही काळ वादावादी झाली त्यानंतर शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी भवनावरील घड्याळ चिन्ह हटविण्यात आले.दरम्यान शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध सभा घेत शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून आगामी निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्याचा निर्धार करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचा ताबा आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहील असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला होता त्यानंतर शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस भवनात निषेध सभा झाली.
भारतीय जनता पक्षाने देशावर त्यांचा एकछत्री अंमल राहावा या मानसिकतेतून देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांना उध्वस्त करण्याचे धोरण अवलंबले आहे.शरद पवार यांनी अथक परिश्रमातून उभा केलेला पक्ष अजित पवार यांनी एका रात्रीत भाजपच्या झोळीत टाकला असा आरोप यावेळी करण्यात आला.बैठकीनंतर भाजपच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला हातोडीने फोडली.दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अजित पवार समर्थकांनी राष्ट्रवादी भवनात धाव घेतली त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणने-सामने आले मात्र संतप्त भावनेतून हा प्रकार घडल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला त्यावेळी दोन्ही गटात किरोकळ वादावादी झाल्याची माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस भवनातील पक्षाचे नाव काळ्या कापडाने झाकण्यात आले असून घड्याळ हे निवडणूक चिन्हही हटविण्यात आले आहे.