नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा,शेतकऱ्यांना मदत,महागाई यासारख्या मुद्यांवरून राज्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षांत कलगीतुरा सुरू आहे.दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.एकीकडे हे चित्र असताना सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनी भंडाऱ्यात सुमारे वीस मिनिटे बंदद्वार चर्चा केली.त्यामुळे या चर्चेत काय शिजले याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात आहे.
भंडाऱ्याचे पालकमंत्री असलेले फडणवीस हे सोमवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या नियोजन समितीची बैठक घेतली.यानंतर नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकांतात चर्चा केली.यावेळी जिल्ह्यातील आमदार,अन्य नेते मंडळी आणि प्रमुख अधिकारी खोलीच्या बाहेर होते.भारत जोडो यात्रेवर भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रखर प्रत्युत्तर दिले.शेतकऱ्यांना मदतीसाठी आवाज उठवला.मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही नाना पटोले यांनी लक्ष्य केले.महागाईवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवण्यात येत आहे. राजकीय पक्षांना मुंबईतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसह शिक्षक मतदारसंघाचेही वेध लागले आहेत.या पार्श्वभूमीवर पटोले यांनी उपमुख्यमंत्र्यांशी काय चर्चा केली याचे कोडे अनेकांना पडले आहे.बैठकीत सहभागी होण्यापूर्वी नाना पटोले यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर तोफ डागली आणि फडणवीस यांचा ‘स्पायडरमॅन पालकमंत्री’असा उल्लेख केला.यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.