“छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी”;..अशा कितीही धमक्या आल्या व प्रत्यक्षात त्या धमक्या अंमलात जरी आल्या तरी मी माझी विचारसरणी सोडू शकत नाही-छगन भुजबळ यांचे प्रतिउत्तर
नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.खुद्द छगन भुजबळ यांनीच माध्यमांना यासंदर्भातली माहिती दिली आहे.भुजबळांच्या नाशिक येथील कार्यालयात हे धमकीचे पत्र आले असून त्यामध्ये “तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी घेतली आहे”,असा उल्लेख असल्याचंही भुजबळांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले आहे त्यामुळे या मुद्द्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.छगन भुजबळांनीच माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,नाशिक येथील त्यांच्या कार्यालयात हे धमकीचे पत्र आलेले असून या पत्रात त्यांना जीवे मारण्याची सुपारी मारेकऱ्यांनी घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय त्यांना ठार करण्याचा कट रचण्यासाठी कुठल्या हॉटेलसमोर बैठक झाली त्यातील गाड्यांचे क्रमांक काय आहेत वगैरे अशी माहिती देण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.
आयुष्यात मला अशी खूप धमकीची पत्र आली तसे प्रयत्नही झाले पण आपण हे सगळ पोलिसांवर सोडून द्यायचे.आता घरी तर बसू शकत नाही आपण घेतलेली भूमिकाही बदलू शकत नाही.जे काही परिणाम व्हायचे ते होतील.आपण पोलिसांना याची सगळी माहिती पुरवलेली आहे. पोलीस या सगळ्याचा शोध घेतील.महाराष्ट्रात अलिकडे जे प्रकार महाराष्ट्रात घडतायत ते पाहाता आमच्या लोकांनी ताबडतोब ते पोलिसांना कळवले आहे.मोबाईल नंबर,गाड्यांचे नंबर असे सगळे आहे त्यात.कुठे बैठक झाली,कुणाचा मोबाईल नंबर अशी बरीच माहिती पत्रात आहे असे भुजबळ म्हणाले.दरम्यान पूर्वी सुपाऱ्या घेऊन होत असलेले गँगवॉर आपण गृहमंत्री असताना आटोक्यात आले होते असा उल्लेख भुजबळांनी केला आहे त्यामुळे हा थेट देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला मानला जात आहे.“हे धक्कादायक आहे हे खरच आहे.पूर्वी सुपाऱ्या घेऊन गँगवॉर व्हायचे.मी गृहमंत्री असताना ते आटोक्यात आले होते पण आता ठीक आहे.जे आहे ते आहे.पोलीस त्यावर नक्कीच कारवाई करतील ही धमकी नेमकी कशासाठी दिली हे त्यांना पकडल्यानंतर लक्षात येईल अशा कितीही धमक्या आल्या व प्रत्यक्षात त्या धमक्या अंमलात जरी आल्या तरी मी माझी विचारसरणी सोडू शकत नाही असे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.