मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अगदी काही तासांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे.शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत.शिवतीर्थ मिळविण्यासाठी दोन्ही गटांनी शर्थीचे प्रयत्न केले.अखेर मुंबई हायकोर्टाने ठाकरेंना दिलासा देत शिवसेनेच्या पारंपारिक मेळाव्यासाठी परवानगी देऊन शिंदे गटाला झटका दिला.आता शिंदे गटाचा मेळावा बांद्रा कुर्ला संकुलातील विशाल मैदानावर संपन्न होणार आहे.यात ठाकरेंवर कुरघोडी करण्यासाठी एकनाथ शिंदे आपल्या दसरा मेळाव्याला खास ‘ठाकरे ब्रँड’ असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे तसेच महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या.एका ठाकरेंना सोडून दुसऱ्या ठाकरेंच्या साक्षीने दसरा मेळाव्याचे प्लॅनिंग एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात सुरु असल्याचेही बोलले गेले.परंतु दरम्यानच्या काळात एवढ्या घडामोडी घडल्या की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे दसरा मेळाव्याच्या विशेष निमंत्रणामधून बाजूला गेली. आता दसरा मेळाव्याला शिंदे कुणाला निमंत्रित करतात?कोणते पाहुणे त्यांच्यासाठी विशेष आणि खास असणार?याची चर्चा सुरु असताना शेवटच्या काही तासांत याबद्दलची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा परंपेरची सुरुवात केली.गेली अनेक दशके देशाला पोखरुन काढणारी स्वार्थी प्रवृत्ती उपटून काढण्याची खरी सुरुवात या मेळाव्यातून झाली असे सांगत बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांची परंपरा मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांचा मेळावा बीकेसीमध्ये संपन्न होतोय तुम्ही आवर्जून या असे आवताण एकनाथ शिंदे यांनी दिलय.हे आवताण देताना त्यांनी स्वत:ला ‘विचारांचे वारसदार’ म्हणून संबोधलंय.गेल्या दोन महिन्यांपासून कुणाचे हिंदुत्व अधिक प्रखर?याची स्पर्धा दोन्ही गटात रंगलेली आहे.ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका शिंदे गट करतो आहे तर शिंदे गटाच्या नकली हिंदुत्वाचा बुरखा आम्ही फाडणारच असा निर्धार ठाकरेंनी केला आहे.एकंदरितच काय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन दोन्ही गट अधिक आक्रमक झालेले आहेत.या साऱ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर कुरघोडी करण्यासाठी थेट अयोध्येच्या संत महंतांनाच दसरा मेळाव्याला आमंत्रण देऊन खरे हिंदुत्ववादी आम्हीच आहोत आणि संत महंतांचा आशीर्वादही आम्हालाच आहे असे दाखविण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केलेला दिसतोय.
दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा इतिहास पाहिला तर शिवतीर्थावरील मंचावर अनेक राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.अगदी सामाजिक संघटना,मानवी हक्कांसाठी लढणारे नेते यांनाही निमंत्रणे दिली गेली आहेत.शिवसेनेच्या ऐतिहासिक परंपरेचा विचार सगळ्यांना कळावा असा त्यामागचा उद्देश होता.यंदाच्या साली ‘हिंदुत्व’ हा प्रमुख मुद्दा बनलेला असताना याच मुद्द्यावरुन एकमेकांवर कुरघोडी करण्याचा दोन्ही गटांचा मनसुबा आहे.त्याच उद्देशातून एकनाथ शिंदे यांनी अयोध्येतल्या संत महंतांना निमंत्रण दिले आहे.शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा संपन्न होतोय.शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरु आहे.गावोगावचा शिवसैनिक मेळाव्यासाठी अहोरात्र मेहनत करतोय.यंदा निष्ठेची ताकद दाखवायची या इर्षेने शिवसैनिक कार्य करत आहेत.जागोजागी भव्य होर्डिंग्ज लावले जात आहेत.शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये मेळाव्याची लगबग सुरु आहे.शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचा साक्षीदार होण्यासाठी शिवसैनिक सकाळपासूनच शिवतीर्थावर गर्दी करतील.कदाचित शिवसेनेच्या इतिहासातील उद्याचा दसरा मेळावा आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल असा अंदाज शिवसेना नेते बांधत आहेत.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याची तयारीही जोरदार सुरु आहे.बांद्रा कुर्ला संकुलात सभा होत असल्याने लाख-दीड लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे.ही गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी गेली १५ दिवस जिल्हा-तालुका पिंजून काढला आहे.प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था होईल अशी तयारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिंदे गटाने सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते.तसेच ३ हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण झालंय. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख,नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत.कसारा,कर्जतखोपोली,पालघर,विरार,डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस,टेम्पो ट्रॅव्हलर,सात आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असेल.दोन्ही सभांसाठी एकूण जवळपास दहा हजार वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.