Just another WordPress site

लोकांच्या दृष्टीने विचार महत्त्वाचा;चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त-शरद पवार यांचे भाष्य

पुणे- पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता व निवडणूक आयोगानेदेखील अजित पवार यांचाचा गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला.त्यानंतर आता शरद पवार नेमके काय करणार? लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतांना नव्या निवडणूक चिन्हाला लोकांपर्यंत कसे नेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान याच आव्हानावर शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केले आहे.आगामी निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलतांना त्यांनी लढवलेल्या पहिल्या निवडणुकीवर संदर्भ दिला असून ते काल दि.११ फेब्रुवारी रोजी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.पक्ष आणि चिन्ह गेले असून नवे कोणते चिन्ह मिळण्याची तुम्हाला अपेक्षा आहे हे नवे चिन्ह लोकांपर्यंत कसे घेऊन जाणार? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला.या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचे उदाहरण दिले.माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी पहिली निवडणूक बैलजोडी या निवडणूक चिन्हावर लढवली होती त्यानंतर आमचे चिन्ह गेले होते त्यानंतर आम्ही चरखा या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली तेही चिन्ह गेले होते त्यानंतर आम्ही हाताचा पंजा या चिन्हावर लढलो होतो आमचे तेही चिन्ह गेले होते त्यानंतर मी घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढलो त्यामुळे लोकांच्या दृष्टीने विचार हा महत्त्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त असते असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी पक्षफुटी आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरही त्यांनी भाष्य केले असून निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा आश्चर्यकारक आहे.निवडणूक आयोगाने आम्हा लोकांचे चिन्ह काढून घेतले.आमचा पक्षही दुसऱ्यांना दिला.ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांनी पक्षाची उभारणी केली त्यांच्याच हातातून पक्ष काढून घेण्यात आला.यापूर्वी भारताच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते पण ते निवडणूक आयोगाने करून दाखवले आहे असे शरद पवार म्हणाले.तसेच लोक या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाहीत याची मला खात्री आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.याआधी शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.यावेळी बोलताना त्यांनी भाजपा सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे.ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास दिला जातोय असा आरोप केला.हा आरोप करताना त्यांनी गेल्या १८ वर्षांत ईडीने केलेल्या कारवाईची आकडेवारीदेखील सांगितली.

Leave A Reply

Your email address will not be published.