Just another WordPress site

“आता मला वाटते की मी अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे व काँग्रेस सोडणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे”-अशोक चव्हाण यांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला असून या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.तसेच काही वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की,अशोक चव्हाण हे १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील तसेच भाजपा अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अशोक चव्हाण यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेले असतांना अशोक चव्हाण यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येत या सर्व अफवांचे खंडण केले तसेच पक्ष सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.अशोक चव्हाण यांनी काही वेळापूर्वी मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभा सदस्यत्वाचा (नांदेडमधील भोकर विधानसभा) राजीनामा सोपवला त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी अशोक चव्हाण म्हणाले,मी काँग्रेसमध्ये असताना नेहमी प्रामाणिकपणे काम केले.माझी पक्षासह कोणाबद्दल कसलीही तक्रार नाही राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चव्हाण यांना विचारले की, असे काय घडले की तुम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला? पक्ष सोडण्याचा निर्णय कधी पक्का केला? यावर अशोक चव्हाण म्हणाले,प्रत्येक गोष्टीला काही कारण असलेच पाहिजे असे काही नाही तसेच प्रत्येक कारण सर्वांना सांगितलेच पाहिजे असेही काही नाही.सगळ्याच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत.मी कधीही माझ्या पक्षांतर्गत बाबी लोकांसमोर, माध्यमांसमोर मांडल्या नाहीत तसेच पक्षात काही उणीदुणी असतील तर मी ती कधीही चव्हाट्यावर मांडली नाहीत.पक्ष सोडण्याच्या निर्णयाबाबत अशोक चव्हाण म्हणाले,मी सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये आहे.आता मला वाटते की मी अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे व काँग्रेस सोडने हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.दरम्यान यावेळी माजी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले की,तुम्ही भाजपात जाणार का? भाजपा तुम्हाला राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चेत किती तथ्य आहे? यावर अशोक चव्हाण म्हणाले,मला भाजपाची कार्यप्रणाली माहिती नाही.मी अद्याप भाजपात जाण्याचा किंवा इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही.येत्या एक ते दोन दिवसांत मी माझी पुढची राजकीय दिशा जाहीर करेन असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.