कन्नड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा १२ फेब्रुवारीला दिला असून महाराष्ट्रात काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.अशोक चव्हाण १५ फेब्रुवारीला भाजपात प्रवेश करतील आणि त्यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे तर अशोक चव्हाण यांनी स्वतः भाजपात जाण्याबाबत काहीही सांगितलेले नाही.मला भाजपाची कार्यप्रणाली माहीत नाही त्यामुळे मी माझी भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करेन इतकेच विधान त्यांनी केले आहे.या सगळ्या घडामोडी घडतांना कन्नडच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.अशोक चव्हाण इतक्या लवकर तिकडे जातील असे वाटले नव्हते.काल-परवा पर्यंत नीट बोलत होते त्यामुळे असेच वाटणार ते तिकडे गेले पण कपाळावर शिक्का काय लागणार? गद्दार! मग आयुष्याची कमाई काय? इतके सगळे मिळवलेत पण गद्दारीत सगळे गमावले आहे.अशोकराव तुम्ही तिकडे गेलात म्हणून तुमच्यावर लगेच आरोप करणार नाही पण तुम्ही घोडचूक केली आहे जी तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहे.महाराष्ट्र दिल्लीशाहीची जी हुकूमशाही सुरु आहे त्याविरोधात तडफेने उभा आहे.हिंदू आमच्याबरोबर आहेत पण मुस्लिम बांधवही आहेत हे सगळे का येत आहात? माझा पक्ष चोरला,चिन्ह गद्दारांना दिले आहे.माझे हात रिकामे आहेत.तरीही इतकी गर्दी होते आहे ही माझी संपत्ती आहे त्यांच्याकडे भेकडांची सेना आणि गद्दारांची सेना आहे पण तुमची भाड्याची फौज आमच्या मर्दांशी टक्कर देऊ शकत नाही.
भाजपाने फक्त द्वेष पेरला आहे.विचार पेरलेले नाहीत.आदर्श दिलेले नाहीत त्यामुळे आदर्श घोटाळा करणाऱ्या अशोक चव्हाणांना बरोबर घेतले आहे.मित्राला दगा द्यायचा.जी शिवसेना २५ ते ३० वर्षे तुमच्याबरोबर होती त्या शिवसेनेला तुम्ही फोडले.खुर्चीसाठी फोडाफोडी सुरु आहे. अशोक चव्हाण हे लीडर नाहीत तर डीलर आहेत असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांचीशी आता डील केली असेही म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांत पाच जणांना भारतरत्न जाहीर केलेल्या पीएम मोदींवर सडकून टीका केली आहे.ते म्हणाले की,मोदीजींनी भारतरत्नाचा बाजार मांडला असून त्या त्या राज्यात दिले तर तिथली मते मिळतील.स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला याचा अभिमान आहे पण त्यांच्या आयोगाच्या शिफारशी का लागू करत नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली.स्वामीनाथन शिफारशी लागू केल्यास आम्ही तुमचा सत्कार करू असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.