Just another WordPress site

“साम दाम दंड भेद या भाजपाच्या राजनीतीचे देशाला दररोज दर्शन होत असून सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भाजपाने जगाला दाखवून दिले आहे”-विकास लावंडे यांचे वक्तव्य

"आपली संसदीय लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात आहे"-विकास लावंडे यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार

ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला असून अशोक चव्हाणांच्या या कृतीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे तर परिणामी महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.दरम्यान अशोक चव्हाणांचा हा निर्णय अजित पवारांच्या बंडखोरीवेळीच झाला होता असा मोठा दावा शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लावंडे यांनी केला आहे त्यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली.अजित पवारांच्या या बंडाची तयारी सुरू होती तेव्हाच अशोक चव्हाणही काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याचे स्पष्ट झाले होते असे विकास लावंडे म्हणाले. याबाबत ते पोस्टमध्ये म्हणाले की,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला याबाबत त्यांची २७ की २८ जून २०२३ रोजी मुंबईत देवगिरी या शासकीय बंगल्यावर गुप्त बैठक झाली.ते पुढे म्हणाले,देवगिरीवर त्याच दिवशी अजितदादांनी मला बोलावून घेतले होते.दादांची माझी राजकीय सद्यस्थितीबाबत चर्चा चालू असतांना अशोक चव्हाण तिथे आले तेव्हा दादांनी मला आपण नंतर चर्चा करू असे सांगितले व मी तिथून बाहेर पडलो त्यानंतर त्यांची दोघांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली होती.अजितदादा आणि अशोक चव्हाण यांचा निर्णय तेव्हाच झालेला होता त्यानंतर लगेच २ जुलै २०२३ रोजी अजितदादा मित्र मंडळ राज्य सरकारमध्ये सामील झाले.

आता अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते.मला त्यात धक्कादायक काहीच वाटत नाही ते भाजपा किंवा कदाचित अजितदादा गटातसुध्दा जातील कारण अजितदादा मित्र मंडळ आणि अशोक चव्हाण हे ईडीग्रस्त असल्याने समदुःखी आहेत.जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपासोबत गेलेले बरे असे सध्या देशभर वातावरण आहे.साम दाम दंड भेद या भाजपाच्या राजनीतीचे देशाला दररोज दर्शन होत आहे.सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भाजपाने जगाला दाखवून दिले आहे.आपली संसदीय लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात आहे हे नक्की!” असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे.दरम्यान अशोक चव्हाणांनी राजीनामा देण्यामागचे खरे कारण अद्यापही जाहीर केलेले नसून प्रत्येक कृतीमागे कारणे नसतात असे ते म्हणाले तसेच काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद मला चव्हाट्यावर आणायचे नसून मी पक्षात होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले.पक्षाने मला भरपूर दिले तसेच मीही पक्षासाठी खूप काम केले अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.