मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार
महाराष्ट्रात सध्या भाजपाप्रणित महायुतीचे सरकार अस्तित्वात असून जून २०२२ मध्ये शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन राज्यात बहुमताचे सरकार स्थापन केले होते त्यानंतर जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवारांचा गटही या सरकारमध्ये सहभागी झाला.४० आमदार असलेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत तर ४१ आमदार असलेले राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत.दरम्यान या तिन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी सातत्याने आपापल्या नेत्याचा पुढचे मुख्यमंत्री म्हणून प्रचार करत असून या प्रचारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.भाजपाचे कार्यकर्ते नेहमी दावा करत असतात की,देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील असेच वक्तव्य अलीकडे केले होते तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदेच पुढचे मुख्यमंत्री होतील असे सांगतात तसेच अजित पवारांचे समर्थक भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करून अजित पवार यांचे होर्डिंग्स लावतात.परंतु या तिघांपैकी कोणता नेता पुढचा मुख्यमंत्री होईल असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यानंतर त्यांनी यावर सविस्तर उत्तर दिले असून फडणवीस यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राज्याच्या राजकारणातील अनेक मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल यात काहीच शंका नाही.आम्ही सध्या संख्याबळ वगैरे काही ठरवलेले नाही.संख्याबळ तर आमचेच जास्त असणार आहे त्याबाबत कोणाच्याही मनात शंका येण्याचे कारण नाही परंतु मी एक गोष्ट स्पष्ट करेन की केवळ संख्याबळाच्या आधारावर पुढचा मुख्यमंत्री ठरणार नाही.आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत.मुख्यमंत्रीपदाबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील शेवटी तिन्ही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,प्रत्येक नेता पदाधिकारी त्यांच्या प्रमुख नेत्याचे नाव घेत असतो.शेवटी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यायचे असते.माझा नेता मोठा झाला पाहिजे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते त्यामुळे उद्या माझ्या पक्षाचे लोक म्हणतील की देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत तसे बोलल्यावर आमच्या लोकांना त्याचा आनंद होणार.तुम्ही जर शिवसेनेच्या लोकांसमोर भाषणात सांगितले की,अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील तर लोक टाळ्या वाजवतील पण कमी वाजवतील त्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह येणार नाही कारण शिवसैनिकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असेच वाटत राहील तसेच अजित पवारांच्या समर्थकांना वाटत राहणार की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत.परंतु भविष्यात आम्ही तिघे एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची मोठी भूमिका असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.