कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ फेब्रुवारी २४ शनिवार
शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर शिवसेनेचे अधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातले हे पहिलेच अधिवेशन असून यावेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दमदार भाषण केले हे भाषण ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक झाल्याचे पाहण्यास मिळाले त्याबद्दल त्यांनी एक पोस्ट लिहिली व आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.”सगळा प्रवास झरकन डोळ्यांसमोरून निघून गेला.त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो.नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले.आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटुंबही पुरते हेलावून गेले.यावेळी माझ्या प्रत्येक सुख दुःखात सोबत असलेले माझे कुटुंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.” शिवसेना हेच माझे सर्वस्व होते,शिवसैनिक हेच माझे कुटुंब होते.आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केले पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती,नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शब्दांतून आपल्या भावनांना वाट करुन दिली.
‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती.किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले असे म्हणत एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेंच्या भाषणाचे कौतुक केले आहे.सदर महाअधिवेशनात शिवसेनेचे वरिष्ठ नेते,शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना श्रीकांत शिंदे यांच्याही डोळ्यात पाणी आले.आनंद दिघेसाहेब गेल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब शिवसैनिकांचा आधार बनले.एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपले कुटुंब मानले.काहीही झाल्यावर सर्वप्रथम पोहचणारे शिवसैनिक म्हणजे शिंदे साहेब… मी त्यांनी कायम शिवसैनिकांमध्ये पाहिले आहे असे म्हणतांना श्रीकांत शिंदेंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचे यावेळी पाहण्यास मिळाले.