मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार
मराठा आरक्षणासंदर्भातल्या विशेष अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे.आज दुपारी १ वाजता उद्धव ठाकरे हे सभागृहात उपस्थित राहतील तसेच आदित्य ठाकरेही त्यांच्यासह उपस्थित असतील.आज सभागृहात आल्यानंतर ते काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.मराठा समाज हा राज्यभरात २७ टक्के असल्याचे न्या.शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आढळून आले.सुमारे ५२ टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहे त्यामुळे राज्यातील २७ टक्के असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल अशी माहिती आयोगाने अहवालात दिली आहे.
विधिमंडळाच्या आज होणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार आहे.मराठा समाजाची लोकसंख्या २७ टक्के असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला असून त्याआधारे स्वतंत्र संवर्ग करून १० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे.दुसरीकडे ओबीसीच नव्हे तर अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी गडावर दिली असून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आठवडाभरापासून उपोषण करीत आहेत त्यामुळे विधिमंडळाचे नियोजित अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असतानाही सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलाविले आहे.राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत अहवाल सरकारला नुकताच सादर केला आहे.यापूर्वी दोनदा केलेला मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयात टिकला नव्हता.या पार्श्वभूमीवर आता होणारा कायदा टिकविण्याचे महायुती सरकारसमोर आव्हान असणार आहे.