Shiv Sena Dussehra Rallies: शिवसेना दसरा मेळावा, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानावर आज 'सामना'; उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार संबोधित

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मेळावा हा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडत आहे.दोन्ही मैदानावर शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमत आहेत.शिवसेना दसरा मेळावा यंदा अनेक अर्थांनी चर्चेत आहे.कधी नव्हे असे अभूतपूर्व बंड शिवसेनेत घडले आहे.एकनाथ शिंदे यांच्या रुपात घडलेले हे बंड आता थेट शिवसेनेवरच दावा सांगू लागले आहे.त्यामुळे शिवसेनेत दोन नेतृत्व तयार झाल्याचे चित्र प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे.त्यामुळे आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांनी आपापल्या मैदानांवर गर्दी खेचण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे.खास करुन प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार शिंदे गटाने गर्दी जमविण्यासाठी प्रचंड ताकद लावली आहे.त्यासाठी शेकडोंच्या संख्येत एसटी महामंडळाच्या बसेस आणि खासगी गाड्याही गावोगावी पाठविल्या आहेत.त्यातून लोकांना बिकेसी मैदानावर आणण्याची योजना आहे.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही त्यांच्या परीने ताकद लावली आहे.दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरु होते.दोन्ही गटांची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.आता केवळ प्रतिक्षा आहे ती आज संध्याकाळी दोन्ही मैदानांवर दोन्ही नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या भाषणाची.

शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसण्याची ही पहिलीच वेळ नव्हे.या आधीही शिसेनेत अनेक बंड झाली आहेत.यात छगन भुजबळ,नारायण राणे,राज ठाकरे यांचा समावेश आहे.मात्र एकनाथ शिंदे यांचे बंड काहीसे वेगळे आहे.एकनाथ शिंदे यांच्यासोबत थोडेथोडके नव्हे तर तब्बल 40 आमदार फुटले आहेत.त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला.हा धक्का इतका मोठा होता की राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची गेली.परिणामी आजच्या दसरा मेळाव्याबद्दल जोरदार आकर्षण वाढले आहे.