मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार
मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे यामुळे मनोज जरांगेंविरोधात सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली आहे.मनोज जरांगेंना कोणाचे पाठबळ आहे याची चौकशी करा अशा मागणीला जोर धरला होता.आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केला यावरून सभागृहात प्रचंड खडाजंगी झाली.महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय अशी परिस्थिती आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार? असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केला.महाराष्ट्र बेचिराख करायची भाषा कोणी करत असेल तर त्या भूमिकेविरोधात विरोधक उभे राहतील असा आमचा विश्वास आहे.महाराष्ट्र बेचिराख करण्याची केवळ धमकी आहे का ? यामागची भूमिका काय ? त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का ? याबाबत गांभर्याने विचार करावा लागेल कारण आता मराठा समाजाचीही बदनामी होत आहे असेही ते म्हणाले.आम्ही शांततेत आणि शिस्तीत मोर्चे काढले पण त्याला आता गालबोट लागतय.अन्य कोणत्याही समाजाला नख न लावता मराठा समाजाचे आरक्षण आणि हित जपले पाहिजे अशी मागणी होती परंतु उपमुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरला,ऐकेरी उल्लेख केला.मान सन्मानाच्या बाबतीत फडणवीसांनी कधी ब्र काढला नाही.कायदा सुव्यवस्था,राज्य सरकार आणि भारताविरोधात फडणवीस कधी बोलत नाही पण तरीही उपमुख्यमंत्र्यांना निपटून टाकण्याची भाषा केली जाते.एका मंत्र्यापासून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचले हे चाललय काय ? असा संतप्त प्रश्न शेलारांनी विचारला.
या घटनेचा घटनाक्रम सरळ नसून देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाल बोलले.सकाळी ९ वाजता भाजपाला एका दिवसात संपवू असे एकजण म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली याविरोधात कटकारस्थान आहे का ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.महाराष्ट्रात पंतप्रधानांची सभा उधळून टाकू असे म्हटले जातय हा कटकारस्थानाचा भाग आहे या विषयाची गंभीर नोंद घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.आज या व्यक्तीला महत्त्व द्यायचे नाही.समाज आमच्याबरोबर आहे हे सगळे घडवणारे मनोज जरांगे राहतात कुठे हे शोधले पाहिजे.तो कारखाना कोणाचा आहे हे शोधले पाहिजे.तिथे आलेली दगडे कोणाच्या कारखान्यातील आहेत हे शोधले पाहिजे.या आंदोलनाला जेसीबी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले.या सगळ्यामागे एका व्यक्तीच्या समर्थनाची,पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल,एका कारखान्याच्या मालकाची असेल तर एसआयटी लावा अशी मागणी आशिष शेलारांनी यावेळी केली.आशिष शेलारांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षानेही भूमिका मांडली.काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.दरम्यान सभागृहात गोंधळ वाढू लागल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब केले व कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली.