Just another WordPress site

“गद्दारांच्या देशा,गुंडांच्या देशा,लाचारांच्या देशा ही आता महाराष्ट्राची ओळख होत चालली आहे”

शिवसेना संपवण्याचा डाव म्हणजे हिंदूंची शक्ती आणि मराठी अस्मिता संपवण्याचा डाव-उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र

 मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२८ फेब्रुवारी २४ बुधवार

५० खोके देऊन भाषेचे आणि संस्काराचे धन विकत घेता येत नाही.सध्या जे काही सुरु असून राजकारणी म्हणा किंवा आणखी कुणी म्हणा कुसुमाग्रजांची नाव घेण्याची पात्रता आहे का ? सध्याच्या घडीला भाषा विचित्र होत चालली आहे.सध्या तर अनेकांना मराठी भाषेचा शब्दकोष हाती घेण्याची वेळ आली आहे असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.मराठी भाषा दिवसानिमित्त एक खास कार्यक्रम बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले आहे.सध्या काही चांगले वाचायला,ऐकायला मिळत नाही. टीव्ही लावला की काही प्रतिक्रिया चांगल्या असतात बाकी सगळ्याबाबत काय बोलायचे ? बोलतांना लोक चांगले बोलून जातात.प्रत्यक्ष कृतीत मात्र भलतेच काहीतरी करतात.सत्तेसाठी जे काही चालले आहे ते पाहून काय बोलावे ? मूँह मे राम और बगलमें ईडी ही जी काय अवस्था आहे त्यात मी तर म्हणेन की ईडी यांची घरगडी झाली आहे.धाकदपटशा दाखवून सत्ता लुटायची आहे.चंदीगडचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला ते बरे झाले.आमचीही अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालयाने या घटनाबाह्य सरकारची हवा काढून त्यांना रस्त्यावर आणावे अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

आपला महाराष्ट्र आणि देश खालवत चालला असून एकट्या माझ्यासाठी ही लढाई नाही.मी महाराष्ट्रासाठी लढाईला उतरतो आहे.शिवसेना संपवण्याचा डाव म्हणजे हिंदूंची शक्ती आणि मराठी अस्मिता संपवण्याचा डाव आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाला पाहिजे असे आत्ता इथे काही लोक म्हणाले.मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून मी लढत नाही.मुंबई लुटली जाते आणि महाराष्ट्र ओरबाडला जात असेल तर मी काही त्यांच्या पालख्या वाहू का ? मी त्यांच्याबरोबर गेलो असतो तर मलाही खोके मिळाले असते.महाराष्ट्राचे वर्णन काय केले काय ? कणखर देशा,राकट देशा,दगडांच्या देशा.. आज त्या महाराष्ट्राची ओळख गद्दारांच्या देशा,लाचारांच्या देशा,गुंडांच्या देशा अशी झाली आहे असे होत असेल तर आपण फक्त मराठी भाषा दिन साजरा करायचा का ? ज्या राज्याची भाषा आहे ते राज्य वाचवणे आवश्यक आहे.छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र लाचार होऊ शकत नाही गद्दार होऊ शकत नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.