मांडला मध्यप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ फेब्रुवारी २४ गुरुवार
मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे एका भीषण अपघातात १४ लोकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.बडझर घाट येथे एका पिकअप वाहनाचे नियंत्रण सुटल्यानंतर सदर अपघात झाला ज्यामध्ये १४ लोकांचा अपघातस्थळी मृत्यू झाला.मृतांमध्ये सहा पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे.पिकअप वाहनातील सर्व लोक डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावरुन परत येत होते.या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांवर शाहपुरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ज्यामध्ये काही रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.या पिकअप वाहनात एकूण ४५ प्रवाशी होते.आज दि.२९ फेब्रुवारी गुरुवार रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान बिच्छिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरील अपघात घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अमाही देवरी गावातील लोक डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी मांडला जिल्ह्यात गेले होते तिथून परत येत असतांना ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटले ज्यामुळे वाहन उलटून रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारावर २० फुटावर फेकले गेले.सदर अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विकास मिश्रा आणि पोलीस अधीक्षक अखिल पटेल शाहपुरा रुग्णालयात पोहोचले.या दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला असून दिंडोरी जिल्ह्यात घडलेली दुर्घटना अतिशय दुःखद असून मी शोकाकूल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो.बाबा महाकाल दिवंगत आत्म्यांना शांती आणि नातेवाईकांना हे दुःख पेलण्याची शक्ती प्रदान करो.मध्य प्रदेश सरकार मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांची आर्थिक मदत जाहीर करत आहे तसेच जखमींवर योग्य उपचार व्हावेत असे निर्देश मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी दिले आहेत.