Just another WordPress site

आगामी लोकसभा निवडणुक मविआ जागावाटपापेक्षा आमच्यासाठी जिंकणे महत्त्वाचे-संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२९ फेब्रुवारी २४ गुरुवार

आगामी लोकसभा निवडणुकीकरता जागावाटप करण्यासाठी महाविकास आघाडीची काल दि.२८ फेब्रुवारी बुधवार रोजी महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीला शिवसेना (उद्धव ठाकरे गट),राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट),काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.सदर बैठकीनंतर ठाकरे गटातील खासदार आणि मविआचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.यावेळी ते म्हणाले,मविआची आजची बैठक निर्णायक झाली असून आजच्या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.शरद पवार आणि उद्धव ठाकरे दूरध्वनीवरून या बैठकीची माहिती घेत होते.या बैठकीत तिन्ही पक्षांचे जागावाटप सुरळीतपणे पार पडले आहे.आमच्यात याक्षणी कोणतेही मतभेद नाहीत.वंचित बहुजन आघाडीचाही प्रस्ताव आला आहे.

संजय राऊत म्हणाले,वंचितच्या प्रस्तावाचा कागद सर्वांना मोठा दिसत असला तरी त्यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये केलेल्या कामाची माहिती आहे त्या संपूर्ण कामाची यादी वंचितने दिली आहे. त्यावर आम्ही सर्वजण चर्चा करत आहोत.शेवटी आम्हाला सर्वांना या देशात आणि राज्यात लोकशाही आणायची आहे आणि आपले संविधान टिकवायचे आहे हाच आमचा आणि वंचितचा मुख्य अजेंडा आहे.आजच्या बैठकीला मविआचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड,ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत,अनिल देशमुख आणि वंचितचे प्रतिनिधी उपस्थित होते.आम्ही सर्वांनी प्रत्येक जागेवर सविस्तर चर्चा केली.कोण कुठे जिंकेल यावर चर्चा केली.आमच्यासाठी जिंकणे महत्त्वाचे आहे.कोण,किती आणि कोणती जागा लढवत आहे ते महत्त्वाचे नसून चार पक्षांमध्ये ४८ जागांचे वाटप झाले आहे.आमच्याबरोबर इतर लहान पक्षही आहेत.

दरम्यान यावेळी संजय राऊत यांना वंचितच्या २७ जागेंच्या प्रस्तावावर प्रश्न विचारण्यात आला त्यावर संजय राऊत म्हणाले, वंचितने २७ जागांचा फॉर्म्युला सांगितलेला नाही त्यांनी केवळ इच्छा व्यक्त केली आहे.आमचा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. काँग्रेस महाराष्ट्रासह देशभर आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील महाराष्ट्रभर आहे त्यामुळे सर्वांचे ४८ जागांवर लक्ष आहे.त्या ४८ जागा आम्हाला आपसात वाटून घ्याव्या लागतील.ज्याची जिथे ताकद आहे त्यावर चारही पक्ष चर्चा करत आहोत. कालच्या आणि आजच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाणांसारखे अनुभवी नेते सहभागी झाले आहेत त्यांचेही मार्गदर्शन आम्हाला लाभत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.